
मालवणात 500 श्वानांचे निर्बिजीकरण
swt२६१३.jpg KOP२२L२४५५४
मालवण ः पालिकेच्या माध्यमातून भटक्या श्वानांवर निर्बिजीकरणाबाबतची माहिती देताना डॉ. राहुल बोंबटकर, सचिन देऊलकर, सुप्रिया दळवी, महेश काळसेकर आदी. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)
मालवणात ५०० श्वानांचे निर्बिजीकरण
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती ः प्रत्येक सहा महिन्यांनी सलग पाच वर्षे उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ ः येथील पालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण कार्यक्रमातंर्गत आतापर्यत सुमारे ५०० श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. शहरातील फक्त २० टक्के श्वानांचे निर्बीजीकरण झाले असून अद्याप ८० टक्के निर्बिजीकरण शिल्लक असून यासाठी प्रत्येक सहा महिन्यांनी सलग पाच वर्षे हा उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी राहुल बोंबटकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आडारी येथील हॉटेल कल्पतरू येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन कोल्हापूरचे सचिन देऊलकर, पाल संस्थेच्या सुप्रिया दळवी, रोटरी क्लबचे महेश काळसेकर आदी उपस्थित होते.
डॉ. बोंबटकर म्हणाले, "७ मे ते २६ मे या कालावधीत शहरातील ५०० श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. यात ३१५ मादी व १८५ नर श्वानांचा समावेश आहे. ५०० श्वानांच्या निर्बिजीकरणाच्या माध्यमातून आपण श्वानांच्या नवीन १५०० पिल्लांची उत्पत्ती होण्यापासून वाचविले आहे. श्वानांच्या निर्बिजीकरणामुळे आता निर्बिजीकरण केलेल्या श्वानांना पिल्ले होणार नाहीत. प्रजनन काळात श्वानांची आक्रमकता कमी होणार आहे. त्याचबरोबर श्वानांचे ग्रुप तयार होण्याचे प्रमाण कमी होईल. श्वानांना लस दिली असल्याने रेबीजपासून बचाव होणार आहे. त्याचबरोबर श्वान नागरिकांच्या तसेच वाहनांच्या पाठीमागे लागणे, चावणे आदी घटनांचे प्रमाणही कमी होणार आहे."
ते म्हणाले, "शहरात सद्यस्थितीत २५०० हून अधिक श्वान असण्याची शक्यता आहे. त्यापैकी ५०० श्वानांचे निर्बिजीकरण केले आहे. श्वानांचा दर सहा महिन्यांनी प्रजनन काळ असतो. त्यामुळे वर्षभरात श्वानांचे दोनदा प्रजनन होऊन त्यांची संख्या वाढत जाते. त्यामुळे श्वानांच्या निर्बिजीकरणाचा उपक्रम शहरात पाच वर्षे राबवावा लागणार आहे. निर्बिजीकरणासाठी पालिकेने कायमस्वरूपी जागेची व्यवस्था करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राण्यांना मारणे किंवा त्यांचे स्थलांतर करता येत नाही. त्याचबरोबर त्यांना अन्नापासून वंचित ठेवता येत नाही. ही मोहिम राबविताना श्वान ताब्यात घेतल्यावर त्यांच्या पाठीवर मार्करने नंबर लिहिण्यात आला आहे. जेणेकरून श्वान कोणत्या भागातून ताब्यात घेतला हे समजणार आहे. निर्बिजीकरण केंद्रात श्वानांचे निर्बिजीकरण केल्यानंतर तीन दिवसांनी त्या श्वानाला सोडून देण्यात येते."
श्वानांना किनारपट्टीवर सोडू नये
पाल संस्थेच्या पवार म्हणाल्या, "शहरात एखाद्या श्वान मादीला पिल्ले झाल्यानंतर त्यातील मादी पिल्लांना किनारपट्टीवर सोडले जाते. त्यामुळे किनारपट्टीवरील मादी पिल्लांची संख्या जास्त आहे. किनारपट्टीवरील क्षारयुक्त पाण्यामुळे श्वानांना त्वचेचे आजार होत आहेत. त्यामुळे श्वानांना किनारपट्टीवर सोडण्याच्या घटनांबाबत विचार व्हायला हवा."
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61820 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..