संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

१० वीच्या बॅचने दिले ग्रीन बोर्ड
लांजा ः एस. एन. कानडे आयडियल हायस्कूल देवळे या प्रशालेच्या 1995-96 च्या 10 वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर (स्नेहसंमेलन) चा कार्यक्रम नुकताच पार पडला. तब्बल 27 वर्षांनी एकत्र आल्यानंतर या सर्व मित्रमंडळींनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला.आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला ग्रीन बोर्ड दिले. शालेय शिक्षणानंतर विद्यार्थी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने देशभर फिरत असतात. तर मुलीची लग्नं होऊन त्या सासरी गेलेल्या असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पुन्हा एकत्र येणे शक्य होत नाही. म्हणूनच स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने 1995-96 च्या 10वीच्या बॅचच्या 30 ते 35 विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना एकत्र आणण्याचे महत्वपूर्ण काम केले ते ऋषिकेश शेट्ये, नितीन साळवी, महेश पवार, संजय घुमे, दत्ताराम खेडेकर, राजश्री देवरूखकर व सर्व मित्र-मैत्रिणींनी. माजी मुख्याध्यापक (कै.) बी. डी. कुंभार यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. सुरवातीला शाळेच्या आवारातील श्री मारुतीची पूजा करण्यात आली तसेच वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर सरस्वती मूर्तीसमोर दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला ग्रीन बोर्ड दिले. यासाठी शाळेच्या सध्याच्या व्यवस्थापनाने खूप छान सहकार्य केले.
----------------------
साखरपा गावात ६ विंधन बोरिंगचे काम पूर्ण
साखरपा ः साखरपा गावात सहा विंधन बोअरिंग विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. गावातील पाणीटंचाई दूर व्हावी या उद्देशाने या विहिरी पाडण्यात आल्या आहेत. साखरपा गावात उन्हाळ्यात मोठी पाणीटंचाई जाणवते. याकडे लक्ष देत सभापती जयसिंग माने यांनी सेस फंडातून सहा विंधन बोअरिंग विहिरी मंजूर केल्या होत्या. या सहापैकी पाच विहिरींना पाणी लागल्यामुळे गावातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विहिरींचे उद्घाटन सभापती जयसिंग माने यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच विनायक गोवरे, उपसरपंच राजाभाऊ वाघधरे, दीपिका सुतार, सुप्रिया चव्हाण, रूही वाघधरे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
-----------------------
दापोलीतील नाट्यकर्मींची भरारी
दाभोळ ः राज्य संगीतनाट्य स्पर्धेत लक्षवेधी ठरलेलं, "गोपिका रमणू स्वामी माझा" हे दापोलीचं नाटक पुणे येथील भरतनाट्य मंदिरात सादर होणार आहे. रत्नागिरी येथे झालेल्या संगीत राज्य नाट्यस्पर्धेत लक्षवेधी ठरलेलं हे नाटक शनिवारी (ता. 28) मे रोजी, दुपारी 1 वा. पुणे येथील भरत नाट्यमंदिरात सादर होणार आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन विलास कर्वे यांनी केलं असून, पदरचना आणि संगीत दिग्दर्शन हे निळकंठ गोखले यांनी केलं आहे. संगीत अलंकार देविदास दातार हे कृष्णाची भूमिका करणार असून, नूतन परांजपे, पूजा लागू, गौरी खरे, वीणा कर्वे आणि यापूर्वी झालेल्या संगीत राज्य नाट्यस्पर्धेतील रौप्य पदक विजेते डॉ. शिवप्रसाद दांडेकर हेही या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. नाटकातील सुमधूर चाली असलेल्या पदांना, आनंद वैशंपायन यांची ऑर्गन, चैतन्य गोडबोले यांची तबला आणि नागेश किरडवकर यांची मृदंगसाथ आहे. दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा, दापोली या संस्थेचा सांस्कृतिक विभाग या नाटकाचा प्रयोग सादर करणार आहे. नवीन संहितेसाठी लेखनाचा, ऑर्गन साथीचा प्रथम क्रमांक आणि संगीत दिग्दर्शनाचा द्वितीय क्रमांक याचबरोबर उत्तम संवाद, अभिनय, गायन, नृत्य हे सर्व या नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत. मुकुंदराव मराठे, ज्ञानेश पेंढारकर, मधुवंती दांडेकर, डॉ. नीरज देशमुख, सुरभी बर्वे-बोडस या प्रथितयश कलाकारांनी या नाटकाचं कौतुक केलं असून, पुणे येथील प्रयोगाला शुभेच्छा दिल्या आहेत.
....
धोका टाळण्यासाठी पूर्णगड येथे प्रशिक्षण
पावस् ः आगामी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर संभाव्य धोका टाळण्यासाठी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्यावतीने पूर्णगड येथे प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये समुद्रकिनारा व अन्य भागांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात आपत्ती निर्माण होत असते. त्याचा सामना करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याने परिसरातील लोक संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशिक्षित व्हावे या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस ठाणे हद्दीत मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णगड खाडीकिनारी पोलिस पाटील, सागर सुरक्षादल सदस्य, पोलिसमित्र यांना प्रशिक्षण देऊन समुद्रकिनारी प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) घेण्यात आले आहे. या वेळी पोलिस पाटील संतोष पाथरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून समुद्रकिनारी व खाडीकिनारी पावसाळ्यामध्ये काम करताना चांगल्याप्रकारे फायदेशीर ठरणार आहे व संभाव्य धोका टाळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे सांगितले.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61855 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top