सुरक्षित पर्यटनाबाबत तडजोड नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षित पर्यटनाबाबत तडजोड नको
सुरक्षित पर्यटनाबाबत तडजोड नको

सुरक्षित पर्यटनाबाबत तडजोड नको

sakal_logo
By

24722
देवगड किनारपट्टीचे संग्रहित छायाचित्र.

सुरक्षित पर्यटनाबाबत तडजोड नको

ठोस पावले अपेक्षित; आवश्यक खबरदारीचा अभाव

संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः एकीकडे सिंधुदुर्गातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आजवर झालेल्या प्रयत्नांना पर्यटकांकडून वाढता प्रतिसाद मिळत असताना आता आवश्यक खबरदारी अभावी जिल्ह्यातील पर्यटन असुरक्षित बनत चालल्याचे दिसून येत आहे. केवळ निवास न्याहारी, अलिशान हॉटेल आणि पर्यटनस्थळांचा भौतिक विकास एवढ्यावरच समाधान न मानता येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षिततेचे काय? असा प्रश्‍न आता समोर येत आहे. यासाठी प्रशासनाने दबाव झुगारून कठोर पावले नाही उचलली तर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही.
सिंधुदुर्गाला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख मिळाली. गोव्याच्या धर्तीवर पर्यटक सिंधुदुर्गात यावेत, स्थिरावावेत आणि येथील अलौकिक नैसर्गिक सौंदर्याची लयलुट व्हावी यासाठी सुरूवातीपासून प्रयत्न झाले. येथील स्वच्छ समुद्रकिनारे, पराक्रमाची गाथा सांगणारे गडकिल्ले आणि प्राचीन मंदिरे याकडे पर्यटकांची अधिक ओढ असते. हाच धागा पकडून पर्यटनस्थळांचा विकास करण्यावर भर दिला गेला.
अलीकडच्या काही वर्षात पर्यटनाला चालना मिळून सिंधुदुर्गचे पर्यटन बारमाही बहरले. उन्हाळी आणि दिवाळी सुटीबरोबरच पावसाळी हंगामातील उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना अधिक पसंतीस उतरतात. या काळात जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळत असली तरी जोडून आलेल्या शासकीय सुट्ठीचा लाभ उठवण्यासाठी पर्यटनस्थळे गजबजत असल्याचे चित्र असते. पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झाल्यावर आपोआपच सभोवती सुरू होतो तो व्यवसाय. यासाठी लज्जतदार जेवण, खाडी किंवा समुद्रकिनारी नैसर्गिक वातावरणात वातानुकुलीत राहण्याची सोय अशा जाहिराती सुरू होतात. ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यामुळे पर्यटकांचा जिल्ह्याकडे अधिक ओढा राहतो. त्यातच बोटींग, साहसी पर्यटन प्रकार यालाही पर्यटकांची पसंती असते. खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे इच्छितस्थळावर जाण्याबरोबरच आंबा, काजू, मासळी याची चव चाखण्यासाठी पर्यटकांची अधिक धडपड असते.
पर्यटकांची वाढती संख्या पाहून स्थानिक पर्यटनस्थळ विकासाकडे लक्ष दिले जावू लागले, मार्ग सुधारले गेले, निवास न्याहारीच्या सोयी विस्तारल्या. यातून स्थानिक आर्थिक उलाढाल वाढली. त्यामुळे पर्यटन हंगामाला अधिक बळकटी आली. यातून केवळ भौतिक सुविधांच्या विकासावरच भर दिला गेला. मात्र, येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षितेचे काय? असा प्रश्‍न कधी कोणाला शिवला नाही. प्रशासनाने नियमांना अधिन राहून कुठे कठोर भुमिका घेण्याचे ठरवले तर पुढार्‍यांचे फोन खणखणतात. पर्यायाने यामध्ये शिथिलता येते आणि घडणार्‍या अप्रिय घटनांना कोणी सामोरे जात नाही.
सिंधुदुर्गात राज्याच्या विविध भागातून पर्यटक येतात. येणारे बहुतांशी पर्यटक खासगी वाहने घेऊन येत असल्याने आपोआपच वर्दळीत वाढ होते. त्यांना काही मदतीची आवश्यकता भासल्यास पर्यटन मार्गावर मदतकेंद्र नाहीत. केवळ हॉटल, पर्यटन प्रकल्प एवढेच पुरेसे नाहीत. तर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेवर भर देण्याची आवश्यकता आहे. यासाठी उत्तम आरोग्य सुविधा, दुर्घटना घडल्यास रूग्णवाहिका, पर्यटकांना मार्गदर्शन करणारे फलक आणि सुरक्षा व्यवस्था आवश्यक बाबी आहेत. गेल्या काही दिवसात सिंधुदुर्गात अपघाताचे प्रसंग घडले. यातून काहींना प्राण गमवावे लागले. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय असुरक्षिततेकडे झुकत चालल्याचे चित्र आहे. याचे दुरगामी परिणाम आगामी पर्यटन व्यवसायावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रशासन, पोलिस आणि सामाजिक संघटनांनी वेळीच पावले उचलण्याची आवश्यकता बनली आहे. गोवा राज्याशी तुलना करताना तेथील सुरक्षिततेचाही आढावा घेण्याची गरज आहे. येथील स्थानिक यंत्रणेनेही याकडे लक्ष दिल्यास दुर्घटना टाळता येऊ शकतील.
........................................
चौकट
नुसते प्रकल्प नकोत; सुरक्षितता हवी
अलीकडे समुद्रकिनारी साहसी पर्यटन प्रकल्पाद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र, यातील सहभागी पर्यटकांना कोणत्या सुविधा पुरवल्या जात आहेत, पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत काय? याची खातरजमा जिल्हा प्रशासनाने करावी. उंचावरून उतरणार्‍या पर्यटन प्रकल्पामध्ये त्याची देखभाल दुरूस्ती वेळेत होते की नाही, पर्यटकांना शिरस्त्राण पुरवले गेले आहे का? दुर्घटनेवेळी रूग्णवाहिकेची कोणेती सुविधा उपलब्ध आहे? याची नोंद ठेवल्यास पर्यटकांना असुरक्षित वाटणार नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62047 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top