
टोल प्रश्नाबाबत गडकरींना भेटू
24813
कुडाळ ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत नागेंद्र परब, मंदार शिरसाट आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
टोल प्रश्नाबाबत गडकरींना भेटू
पालकमंत्री उदय सामंत ः कोरोना खबरदारीबाबत सतर्कता
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः जिल्हावासीयांच्या टोल माफी प्रश्नाबाबत वेळप्रसंगी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केले. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा देशपातळीबरोबर मुंबईतही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
येथील एमआयडीसी विश्रामगृहावर पालकमंत्री सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसंपर्क अभियानाला चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे. शेवटचे दोन दिवस असताना जिल्ह्यात या अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.’’
तारकर्ली येथे झालेल्या बोट दुर्घटनेबाबत त्यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोटींग बंद करण्याचा निर्णय मेरिटाइम बोर्डाने घेतला आहे. जलक्रीडांसाठी वादळी वाऱ्याला तोंड देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अद्ययावत बोटी नाहीत. जिल्हा प्रशासन, पोलिस अधीक्षकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. येथील उद्योजकांना कमीत कमी त्रास होईल, असे निर्णय या ठिकाणी घेण्याबाबतच्याही सूचना दिल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे बऱ्यापैकी काम झालेले आहे. टोलमाफीबाबत जिल्हावासीयांच्या भावना मोठ्या प्रमाणात आहेत. यासंदर्भात महामार्गाचे अधिकारी श्रीवास्तव यांच्याशी जिल्हावासीयांना टोल माफी करावी याबाबत चर्चा केली आहे. यातून मार्ग न निघाल्यास पर्यटनदृष्ट्या हा जिल्हा महत्त्वाचा असल्यामुळे वेळप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिल्हावासीयांच्या भावना त्यांना सांगणार आहे. टोल प्रश्नासाठी राजकीय श्रेय घेण्यापेक्षा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घेतले पाहिजेत.’’ यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट आदी उपस्थित होते.
-------------------
चौकट
मच्छीमारांना आवाहन
येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात समुद्र किनारी सर्व मच्छीमार बांधवांनी मेरीटाईम बोर्डाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. वादळी वारे असताना मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये. याबाबतच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. संबंधित विभाग याबाबत अलर्ट असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62176 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..