रत्नागिरी ः रत्नदुर्ग, पेठकिल्ल्यात 7 ऐतिहासिक समाधीस्थाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः रत्नदुर्ग, पेठकिल्ल्यात 7 ऐतिहासिक समाधीस्थाने
रत्नागिरी ः रत्नदुर्ग, पेठकिल्ल्यात 7 ऐतिहासिक समाधीस्थाने

रत्नागिरी ः रत्नदुर्ग, पेठकिल्ल्यात 7 ऐतिहासिक समाधीस्थाने

sakal_logo
By

24779
रत्नागिरी ः शहरातील रत्नदुर्ग किल्ला परिसरात सापडलेली समाधिस्थाने.

रत्नदुर्ग, पेठकिल्ल्यात ७ ऐतिहासिक समाधिस्थाने
शोधमोहिमेचे यश; १६५० ते १८२० मध्ये बांधणी केल्याचा अंदाज
राजेश कळंबटे ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः शहराजवळील रत्नदुर्ग व पेठकिल्ला परिसरात ऐतिहासिक समाधिस्थाने शोधमोहीम अभ्यासकांनी सुरू केली आहे. तेथे सात समाधिस्थाने आढळून आली आहेत. त्यावर छत्री, कळस, शरभ शिल्प कोरलेले आहे. यावरून तालेवार घराण्यातील पराक्रमी सरदारांच्या असतील, असा अंदाज असून त्यांची बांधणी १६५० ते १८२० मध्ये झाली असावी, अशी शक्यता अभ्यासक महेश कदम आणि प्रसाद घोडगे यांनी व्यक्त केली आहे.
गेले काही दिवस रत्नागिरीमधील जुन्या समाधिस्थळांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कदम आणि घोडके यांनी ही मोहीम हाती घेतली आहे.
कोकणात पश्चिम किनारपट्टीवर वसलेले ऐतिहासिक रत्नागिरी शहर व बंदर. या बंदरातून परदेशात समुद्रमार्गे मोठा व्यापार चालत असे, म्हणून याच्या संरक्षणासाठी रत्नदुर्ग किल्ला उभारण्यात आला. आताच्या मांडवी भागात, तेव्हाचे जकातघर होते. किल्ले रत्नागिरी, पेठ किल्ला, मौजे रहाटाघर, मौजे झाडगाव या चार वस्त्या एकत्र करून रत्नागिरी गावाची निर्मिती झाल्याचे संदर्भ आहेत. या भागाचा इतिहास सुमारे सातशे वर्षे मागे जातो. येथील परिसरात भटकंती करताना ठिकठिकाणी मंदिरे, वाडे, समाधी, बारव यांच्या रूपाने ऐतिहासिक ठेवा विखुरलेला दृष्टीस पडतो. बहामनी राजवटीच्या कालखंडात साधारणपणे १४७० ते १४७५ दरम्यान बांधलेला व १६७० मध्ये शिवरायांच्या काळात विस्तार झालेला रत्नदुर्ग किल्ला आहे. याचे रत्नागिरी व पेठकिल्ला असे दोन भाग आहेत. किल्ल्यावर लागणाऱ्या सर्व साहित्याचा पुरवठा करणारा भाग म्हणजे पेठ, म्हणून याला ‘पेठकिल्ला’ असे म्हणतात.
या परिसरात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक समाधिस्थाने आढळून आली आहेत. यातील काही किल्ल्यावर तर काही पेठकिल्ला परिसरात आहेत. सध्या शोध लागलेल्या समाधींची संख्या सात असून अजूनही काही असण्याची शक्यता आहे. यातील काही समाधिस्थळे छत्री, कळस, कोरलेले शरभ शिल्प यामुळे सुबक दिसतात. ही स्थाने दुर्लक्षित असल्यामुळे सध्या मोडकळीस आली आहेत. समाधीच्या बांधणीवरून याचा कालखंड मराठाकालीन म्हणजे १६५० ते १८२० मधील असावा. १५२६ मध्ये आदिलशाहीचे मातब्बर सरदार तुकोजीराव सावंत साळुंखेनी रत्नदुर्ग जिंकून घेतला. तेव्हा या परिसरात मोठे युद्ध होऊन त्यांचे बंधू व पुत्र धारातीर्थी पडले, असा उल्लेख इतिहासात असल्याचे कदम यांनी सांगितले.
--
चौकट
इतिहास उजेडात आणण्यासाठी
भैरी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने असणाऱ्या वीरगळीमुळे या भागात अनेक लढाया झाल्याचे सिद्ध होते. या समाधींबाबत अभ्यास सुरू असून लवकरच त्या कोणाच्या आहेत व त्यांचा इतिहास उजेडात आणण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे रत्नागिरी शहराचा ऐतिहासिक समाधींच्या रूपाने असणारा अज्ञात इतिहास समोर येण्याची शक्यता कदम यांनी वर्तवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62247 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top