सत्ता गेल्यावर गाठ शिवसेनेशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ता गेल्यावर गाठ शिवसेनेशी
सत्ता गेल्यावर गाठ शिवसेनेशी

सत्ता गेल्यावर गाठ शिवसेनेशी

sakal_logo
By

24866
सावंतवाडी : येथील शिवसंपर्क मेळाव्यात बोलताना खासदार अनिल देसाई. शेजारी इतर.

24867
मेळाव्याला उपस्थित शिवसैनिक. (छायाचित्रे ः रुपेश हिराप)


सत्ता गेल्यावर शिवसेनेशी गाठ

अनिल देसाई : सावंतवाडीत मेळाव्यात भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ : शिवसेनेत शिस्त आणि ताकद आहे. ही सांघिक ताकद दिल्लीश्वर ओळखून आहे. केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून वाट्टेल तो ससेमिरा लावा. मात्र, दिवस मोजकेच आहेत. सत्ता निघून गेल्यावर गाठ मात्र शिवसेनेशी आहे. त्यावेळी तुमची काय अवस्था होईल हे लक्षात ठेवा, असा गर्भित इशारा शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी भाजपचे नाव न घेता आज येथे दिला. येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी हा शिवसेनेचाच असेल, असा प्रयत्न सर्वांनी या अभियानाद्वारे करा आणि कामाला लागा, असे आवाहनही देसाई यांनी केले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसंपर्क अभियान येथील रवींद्र मंगल कार्यालयात पार पडले. या वेळी देसाई बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन महामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर, ज्‍येष्ठ नेते अण्णा केसरकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राजन पोकळे, विक्रांत सावंत, सागर नाणोसकर, रुची राऊत, जयेंद्र परुळेकर, जानवी सावंत, बाबूराव धुरी आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘‘आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या माध्यमातून शिवसंपर्क अभियान राज्यभर सुरू आहे. याला जनतेचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारात टोलेजंग नेते असतानाही नेतृत्व मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. आज कोण काय बोलतो, काय करतो याची पर्वा शिवसेना करत नाही. शिवसेना संपली, शिवसेना संपेल अशा वल्गना करणाऱ्या अनेकांना उद्धव ठाकरे यांनी पाहिले. कोणाला कसे परतायचे, कसा पटवायचे हे उद्धव ठाकरे यांना चांगले ठाऊक आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी दीपक केसरकर यांचे काम उत्तम आहे. या मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद आहे. केसरकरांचे कार्य जवळून पाहिले आहे. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे नेतृत्व करताना चिपी विमानतळ, मेडिकल कॉलेज आदी विकासात्मक कामे पोटतिडकीने त्यांनी मांडली. अलीकडे नगरपालिका निवडणुकीमध्ये काहीसे अपयश आले तरी येणारा निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी हा शिवसेनेचाच असला पाहिजे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा. केंद्रातील सत्ताधारी केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून अनेक प्रताप करत आहेत; परंतु त्यांची सत्ता गेल्यावर गाठ मात्र शिवसेनेचीच असणार आहे त्यांनी ध्यानात ठेवावे.’’
पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गात आजपर्यंत झाली नव्हती अशी विकासकामे शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लावली; परंतु ते जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कमी पडलो, याचा फायदा आज विरोधक उठवत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून होणारा विकास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता काम करणाऱ्या नेतृत्वाला या ठिकाणी संधी देण्याची गरज आहे; मात्र काम न करणाऱ्याने पदापासून दूर व्हावे यासाठी संपर्क प्रमुख या नात्याने अरुण दुधवडकर यांनी कठोर निर्णय घ्यावेत. आमदार केसरकरांनी मंत्रिपदाच्या काळात कोट्यवधीचा निधी या ठिकाणी आणला. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे मनावर घेतलं तर या ठिकाणी केसरकरांना सर्वच शक्य आहे.’’ जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जयेंद्र परुळेकर, जानवी सावंत आदींनी विचार मांडले.
---
पराभवाचा नेमका अर्थ काय?
आमदार केसरकर म्हणाले, ‘‘मतदारसंघात काम करताना अनेक विकासात्मक योजना राबवल्या. मात्र, आम्ही आणलेल्या निधीचे श्रेय विरोधक घेत आहेत. आमदार म्हणून निवडून येत असताना सावंतवाडीमध्ये ५००० मतांचे मताधिक्‍य मिळते; परंतु नगराध्यक्ष पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार २०० मताने पराभूत होतो. याचा अर्थ नेमका काय? त्यामुळे आपापसात भांडायचं, त्याचा फायदा विरोधकांनी घ्यायचा हे यापुढे होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62285 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top