
राजर्षी शाहू महाराज पत्रकार परिषद
उमेदवारी नाकारल्याने छत्रपती
घराण्याचा अवमान होत नाही
---
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज; संभाजीराजेंनी विचारविनिमय न केल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः सर्वच राजकीय पक्षांनी छत्रपती घराण्याचा नेहमीच सन्मान केला आहे, त्यांनी कधीही अवमान केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संभाजीराजे यांचे जे काही ठरले होते, तो कच्चा मसुदा होता, तो अंतिम नव्हता. त्यानंतर वाटाघाटी फिस्कटल्या. त्यामुळे त्या दोघांत काय झाले, हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. राज्यसभेची उमेदवारी न देणे आणि छत्रपती घराणे याचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यामुळेच त्यांना अडचणी झाल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
ते म्हणाले, की संभाजीराजे यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या हालचाली जानेवारीपासून सुरू होत्या. त्याचवेळी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करायला अवधी होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांना कदाचित असा सल्ला मिळाला असेल, की तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि महाविकास आघाडीचाही पाठिंबा घ्या. पण, त्यात कितपत तथ्य आहे, हे मला माहिती नाही. फडणवीस यांच्याबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही त्यांनी भेट घेणे अपेक्षित होते. त्यांच्याकडे मतांचा कोटाही अधिक होता. संभाजीराजेंना कदाचित सहानुभूती मिळाली असती. पण, त्यांनी तसे केले नाही. २००९ नंतर संभाजीराजेंनी जे काही समाजकारण व राजकारण केले, त्यासंबंधी त्यांनी माझ्याशी कुठलाही विचारविनिमय केला नाही. त्यांचे निर्णय हे व्यक्तिगत होते. या प्रक्रियेतही नेमके असेच घडले. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या दोघांमध्ये जी काही चर्चा झाली, त्याचा कच्चा मसुदा तयार झाल्याचे पत्र व्हायरल होत आहे. मात्र, हा कच्चा मसुदा अंतिम नव्हता. त्या दरम्यान वाटाघाटी फिस्कटल्या. शिवसेनेकडून कोल्हापुरातील संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली, या निर्णयाकडे आपण कसे पाहता? असे विचारले असता शाहू महाराज म्हणाले, की हा निर्णय अतिशय चांगला असून, गेली अनेक वर्षे पवार हे शिवसेनेत सक्रिय आहेत. या निर्णयानंतर मी स्वतः त्यांचे अभिनंदन केले. खासदारकी हवी असेल तर त्या पक्षाचे नियमही सोबत येतातच. शिवसेनेत जायचे असेल तर शिवबंधन बांधावेच लागेल. हा त्या पक्षाचा निर्णय असतो. त्यामुळे तो पाळावाच लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
आपण अजूनही शिवसेनेतच असल्याचे सांगून त्या वेळी विक्रमसिंह घाटगे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. संभाजीराजे यांनीही चंदगड भागात विशेष प्रयत्न केल्याचे शाहू महाराज यांनी नमूद केले.
--------------------
स्वराज्य ही संघटना नव्हे, तो पक्षच
स्वराज्य ही संघटना नसून, तो एक पक्षच असून, तो वाढवायचा असेल तर दूरदृष्टी ठेवून संभाजीराजेंना काम करावे लागेल, असेही शाहू महाराजांनी सांगितले. राज्यसभेचे खासदार होणार होता, तर मग संघटना काढली कशाला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शिवबंधन बांधावेच लागेल
ज्या पक्षाकडून उमेदवारी हवी असेल आणि त्यांनी तशी ‘ऑफर’ केली तर त्यांचे नियम, अटी मान्य करायला नको, या प्रश्नावर शिवबंधन तर बांधावेच लागेल, असे त्यांनी नमूद केले.
---------------
मर्सिडीजशिवाय चालत नाही
छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या वेळी घोड्यावरून लढाया केल्या. आता आमचे मर्सिडीजशिवाय काही चालत नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62370 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..