सिंधुदुर्गातील गावे होणार स्वच्छ, हरित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गातील गावे होणार स्वच्छ, हरित
सिंधुदुर्गातील गावे होणार स्वच्छ, हरित

सिंधुदुर्गातील गावे होणार स्वच्छ, हरित

sakal_logo
By

24917

जिल्ह्यातील गावे होणार स्वच्छ, हरित

ग्रामसभांचा निर्धार; संयुक्त राष्ट्र संघाच्या आवाहनाला प्रतिसाद

विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २८ ः जिल्ह्यातील बहुतांश गावे आता स्वच्छ आणि हरित दिसणार आहेत. त्याचबरोबर जलसमृद्ध व आरोग्यदायीही होणार आहेत. नुकत्याच झालेल्या विशेष ग्रामसभेत तसे ठराव घेण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाच्या नागरिकांना शांतता आणि समृद्धी देण्याच्या प्रयत्नांना व भारत सरकारच्या आवाहनाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील सर्व ४३१ ग्रामपंचायतींनी देशाने निश्चित केलेले किमान एक तरी धोरण राबविण्याचा निर्णय घेतला असून, यात सर्वाधिक पसंती स्वच्छ आणि हरित गाव बनविण्याला दिली आहे.
२०३० पर्यंत नागरिकांना शांतता व समृद्धी देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने कंबर कसली आहे. यामध्ये भारतानेही पुढाकार घेतला आहे. यासाठी देशाने ९ ध्येय निश्चित करीत देशातील ग्रामपंचायतींना २४ एप्रिलला ग्रामसभा घेत यातील किमान एक ते कमाल तीन धोरणे राबविण्याचा ठराव घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा यशस्वी झाल्या. यावेळी केंद्राच्या आवाहनाला पाठबळ देण्याचे ग्रामसभेत निश्‍चित केले आहे. यामध्ये सर्वाधिक ग्रामसभांनी स्वच्छ व हरित गाव ही संकल्पना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. या पाठोपाठ आपले गाव जलसमृद्ध करण्याचा निर्णय झाला असून, तिसऱ्या क्रमांकावर आरोग्यदायी गाव ही संकल्पना निवडली आहे.
ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र आता रस्ते, पाणी, दिवाबत्ती या सुविधा पुरविण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. या सर्व सुविधा पुरवितानाच आपल्या गावाने पृथ्वीरक्षणासह गावातील गरिबीचे उच्चाटन करण्याचे व्यापक काम आता ग्रामपंचायतींना करावयाचे आहे. २०३० पर्यंत जगातील सर्व लोकांना शांतता व समृद्धी देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने कंबर कसली आहे. त्याला पोषक काम ग्रामपंचायतींनी करणे गरजेचे असून, संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने केंद्राने देशातील ग्रामपंचायतींना तशा प्रकारचे आवाहन केले आहे. या माध्यमातून ‘आयकॉनिक व्हिलेज’ होण्याची स्पर्धा आता ग्रामपंचायतींमध्ये सुरू झाली पाहिजे.
जगातून गरिबीचे उच्चाटन करणे, पृथ्वीचे रक्षण करणे व २०३० पर्यंत जगातील सर्व लोकसंख्येला शांतता व समृद्धी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २०१५ साली १७ ध्येय निश्‍चित केली आहेत. भारत या करारावर स्वाक्षरी करणारा प्रमुख देश आहे. भारतात ही ध्येये साध्य करण्यासाठी पंचायत राज संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती विकास आराखडे तसेच विविध विकास योजना व लोकसहभागाच्या माध्यमातून या १७ ध्येयांची पूर्तता करण्यासाठी त्यांचे स्थानिकीकरण आवश्यक आहे. यासाठी केंद्राने ९ संकल्पना निश्‍चित केल्या असून, विषयाधारीत भूमिका स्वीकारण्याबाबत निश्‍चित केले आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रत्येक ग्रामपंचायतीने ९ पैकी किमान एक संकल्पना निवडून पुढील वर्षभर त्यावर काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायती जास्तीतजास्त तीन संकल्पना निवडून त्यावर वर्षभरात काम करू शकतात. निवडलेल्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये विविध योजना-उपक्रम हाती घेणे, त्याला व्यापक प्रचार-प्रसिद्धी देणे, जास्तीतजास्त लोकांना या उपक्रमात सहभागी करून घेणे व इतर अनुषंगिक बाबींचे नियोजन करण्याचे आदेश शासनाने ग्रामपंचायतींना दिले आहेत. दरवर्षी २४ एप्रिल हा दिवस देशपातळीवर ‘पंचायत राज’ दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी यावर्षी ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश दिले होते. या ग्रामसभेत दिलेल्या ९ ध्येयांपैकी किमान एका ध्येयाची निवड करून त्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानामध्ये सुधारणा केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून शाश्‍वत विकासाच्या ध्येयांची पंचायतराज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१५ मध्ये निश्‍चित केलेल्या १७ पैकी ९ ध्येये केंद्राने घेतली आहेत. पैकी किमान एक ते जास्तीतजास्त तीन ध्येये घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीला काम करायचे आहे. संघाच्या १७ पैकी ९ ध्येयांची निवड केंद्राने केली आहे. यामध्ये गरिबीमुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ आणि हरित गाव, पायाभूत सुविधांयुक्त, स्वयंपूर्ण गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव हे ९ विषय घेण्यात आले आहेत.
---
चौकट
२६४ ग्रामपंचायतींचे ठराव संकेतस्थळावर
जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपांचायतींमध्ये यासाठी विशेष ग्रामसभा झाल्या. या ग्रामसभांमध्ये केंद्राने ठरविलेली धोरणे स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील २६४ ग्रामपंचायतींनी घेतलेले ठराव केंद्राच्या संकेतस्थळावर अपलोडही केले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतीचे ठराव अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात सर्वाधिक स्वच्छ व हरित गाव याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य गावे आता स्वच्छ आणि हरित होण्यास प्राधान्य मिळणार आहे. त्या पाठोपाठ जलसमृद्ध गाव व आरोग्यदायी गाव बनविण्याचे ठराव झाले असल्याने स्वच्छ व हरित तसेच जलसमृद्ध व आरोग्यदायी गाव पाहावयास मिळणार आहेत.
.............
कोट
केंद्राच्या निर्देशानुसार विशेष ग्रामसभा झाल्या. ग्रामसभेत केंद्राने निश्‍चित केलेल्या ९ धोरणांपैकी किमान एक धोरण स्वीकारण्याचा ठराव घेतला आहे. यापैकी सरकारच्या संकेतस्थळावर २६४ ठराव अपलोड झाले आहेत. यात स्वच्छ व हरित गाव या संकल्पनेला सर्वाधिक प्राधान्य आहे.
- विनायक ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62393 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top