बिगस्टोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिगस्टोरी
बिगस्टोरी

बिगस्टोरी

sakal_logo
By

05470
--
24944
वीट भट्टी उभारताना होणारा जेसीबीचा वापर.
25087
भट्टीला आग लावून पिचविली जाणारी वीट.
25088
मातीपासून तयार झालेल्या विटा अशाप्रकारे जमिनीवर वाळविल्या जातात.
24945
भट्टीत तयार झालेली वीट.
24946
वीट तयार करण्यासाठी लागणारे बगॅस.


वीट व्यवसाय टाकतोय कात

नवे बदल; यांत्रिकीकरणाची कास, कुंभार समाजासह इतरांचाही सहभाग

लिड
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीट व्यवसायाला खूप महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून हा व्यवसाय याठिकाणी केला जातो. काळानुरूप झालेले बदल पाहता आज पारंपरिक वीट व्यवसायाला काहीसा छेद देत जिल्ह्यातील व्यावसायिकांनी आधुनिक पध्दतीचा वापर करत कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. वीट व्यावसायिकांनी केलेला हा बदल आर्थिक, रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. वीट व्यवसायात नेमके काय आणि कसे बदल घडत गेले, याबाबत घेतलेला आढावा.
- रुपेश हिराप
...............
वीट व्यवसायाचा प्रारंभ
वीट व्यवसाय म्हटला की, कुंभार समाज डोळ्यासमोर येतो. मातीच्या वस्तू घडविणारा हा समाज रोजगारासाठी वीट व्यवसायात पाय रोवून होता. जिल्ह्यात साधारण पन्नास वर्षांपूर्वी या व्यवसायाची व्याप्ती वाढायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात मातीची घरे जास्त असल्याने या व्यवसायाला तितकेसे महत्त्व नव्हते; मात्र कालांतराने माणसाचे राहणीमान बदलत गेले आणि विटा, चिरे आदींची घरे उभी राहू लागली. त्यामुळे कुंभार समाजाच्या हाताला या व्यवसायातून रोजगार उपलब्ध झाला. हा व्यवसाय आज जिल्ह्यातील ठराविक गावांत मोठ्या प्रमाणात केला जातो. आज बांधकामाकरिता वेगवेगळे पर्याय उपलब्ध असले, तरी मातीपासून निर्माण होणाऱ्या विटेचे महत्त्व कायम आहे.
................
कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय
जिल्ह्यात कुंभार समाज अनेक गावांत विखुरलेला आहे. मातीच्या विटा, चुली, भांडी, गणेश मूर्ती बनविणे हा प्रामुख्याने त्यांचा व्यवसाय. वीट तयार करण्यातही खूप कसब लागते आणि ते कुंभार समाजालाच अवगत होते; मात्र आज ही कला इतर समाजांतील अनेकांनी आत्मसात केली आहे. असे असले, तरी कुंभार समाजाचे वीट व्यवसाय आणि मातीशी असलेले नाते कधीच पुसले जाणार नाही. वीट व्यवसायात अनेक बदल घडत आहेत. त्यामुळे काहीशा प्रमाणात हा व्यवसाय कुंभार समाजाच्या हातून निसटत आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक जण आजही या व्यवसायातून आपली गुजराण करत आहेत.
...............
अशी बनते वीट
वीट म्हटली की, ती मातीची असते, हे आपसूकच लक्षात येते; मात्र ती बनविण्यासाठी अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. त्याची सुरुवात माती परीक्षणापासून होते. वीट बनविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या मातीची गरज असते. मातीमध्ये बगॅस मिसळले जाते. हे बगॅस साखर कारखान्यांमध्ये मिळते. पारंपरिक पद्धत लक्षात घेता, माती भिजवून ठेवली जाते व नंतर ती मळून लाकडापासून बनविलेल्या एका विशिष्ट आकाराच्या साचातून वीट तयार केली जाते. त्यानंतर उन्हात सुकवून नंतर भट्टीच्या सहाय्याने भाजली जाते; मात्र या प्रक्रियेला जास्त कालावधी जातो. परिणामी उत्पादन कमी मिळते. आज याच पारंपरिक पद्धतीला काहीसा छेद देत आधुनिकीकरणातून वीट उत्पादन घेतले जात आहे.
...............
काय झालेत नवे बदल?
वीट व्यवसाय हा हंगामी व्यवसाय आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसानाचाही धोका आहे; मात्र मेहनतीच्या जोरावर आज अनेक व्यावसायिक हा व्यवसाय टिकवून आहेत. दहा वर्षांपूर्वी हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीनेच सुरू होता; मात्र नंतर त्यात एक-एक बदल घडत गेला. या व्यवसायात अवेळी पावसामुळे होणारे नुकसान आणि उत्पादन घेण्यासाठी मिळणारा कमी अवधी यामुळेच हे बदल आपसूकच घडत गेले. पूर्वी माती निवड झाल्यानंतर ती खोदून काढली जात असे. आज जेसीबीच्या साहाय्याने हे काम केले जाते. त्याचबरोबर पुढील कामे सुद्धा जेसीबीच्या साहाय्याने केली जातात. यात माती भिजविणे, परतणे या जास्त वेळ लागणाऱ्या कामांसाठी जेसीबीची मदत घेतली जाते. पूर्वी एका साच्यातून एकावेळी एक वीट तयार होत असे. आज त्या साच्यात बदल झाला असून, एकावेळेस दोन किंवा तीन विटा घालणारे साचे तयार करण्यात आले आहेत. या व्यवसायासाठी पाणी मोठ्या प्रमाणात आवश्यक असल्याने आणि त्याची कमतरता भासू नये, यासाठी आज माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन हा व्यवसाय केला जात आहे. एकूणच या व्यवसायत झालेले हे बदल उत्पादन वाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरले आहेत.
..............
आर्थिक गणिते...
वीट व्यवसाय सोपा वाटला, तरी तो व्यापाचा आहे. या व्यवसायात उतरताना सुरुवातीला मातीची रॉयल्टी सरकार दरबारी भरणे आवश्यक असते. जो कुंभार हे काम करणार, त्यांना आगावू रक्कम देणे गरजेचे असते. त्यानंतर ज्या ठिकाणी माती काढणार, त्या जमीन मालकाचे पैसे द्यावे लागतात. त्यानंतर भट्टीसाठी जळावू लाकूड, कात भट्टीवरील उकडलेल्या खैराच्या लाकडाचे साल विकत घ्यावे लागते. याबरोबरच मजुरीचा खर्च लक्षात घेता तयार झालेल्या एका विटेपासून व्यावसायिकाला दोन ते अडीच रुपये निव्वळ नफा मिळतो.
.............
विटेचे धार्मिक महत्त्व
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध रीती-परंपरा आजही पाळल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात आज विटेला महत्त्व आहे. जिल्ह्यातील काही गावांत ग्रामदेवतेची मूर्ती दगडाची असल्याने तसेच देवतेचे मंदिर चिरा दगडांनी बांधलेले असल्याने तेथे ग्रामस्थांनी घर बांधताना चिरा दगड वापरू नये, अशी प्रथा आहे. त्यामुळे या भागात पर्याय म्हणून विटांकडे पाहिले जाते. सावंतवाडी तालुक्यात सोनुर्ली, मळगाव, निरवडे, वेत्ये आदी गावांत विटांचेच बांधकाम केले जाते. जिल्ह्यात अन्य काही गावांतही अशीच प्रथा आहे.
...............
मोठी मागणी
मातीपासून बनविलेल्या विटेला बांधकाम क्षेत्रात मोठी मागणी आहे. मोठमोठ्या इमारतींचे बांधकाम करताना विटेची वाहतूक सहज करता येते, तसेच भट्टीत भाजलेली वीट दगडाप्रमाणेच कठीण असते. बांधकामही अचूक होत असल्याने विटेला मोठी मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या गोवा राज्यात येथील विटेला मोठी मागणी आहे. तेथील बांधकाम व्यावसायिक आगावू रक्कम देऊन येथील वीट व्यावसायिकांकडे बुकींग करून ठेवतात. सद्यस्थितीत जागेवर सहा रुपयाने ही वीट उपलब्ध होते.
.....................
चौकट
वीट व्यवसायावर गदा
शासनाने माती उत्खननाच्या परवानगीमध्ये बदल करण्याचे धोरण हाती घेतले आहे. यात आजपर्यंत मिळणारी ‘लुज परमिशन’ बंद होणार असून, माती, दगड, चिरा उत्खनन करण्यासाठी लिजवर उत्खनन करावे लागणार आहे. यात वीट व्यावसायिक भरडले जाणार आहेत. हा व्यवसाय एका जागेवर बरीच वर्षे होणारा नाही. एकूणच मातीपासून वस्तू घडविणारा कुंभार समाज किंवा वीट व्यवसायावर यामुळे गदा येणार असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
...................
कोट
वीट व्यवसाय हा हंगामी व्यवसाय आहे. अनेक वर्षांपासून या व्यवसायात आहे. पूर्वी कुंभार समाजाच्या लोकांकडून हा व्यवसाय करून घेत होतो; मात्र जास्त वेळेत कमी उत्पादन येऊ लागल्याने आज परराज्यातील कामगारांकडून हा व्यवसाय करून घेतो. कुंभार समाजातील काही लोकही आपल्याकडे आहेत; मात्र परराज्यातील कामगार जास्त उत्पादन घेण्यात फायदेशीर ठरतात. आज बरेच काम जेसेबीच्या साहाय्याने होत असल्याने मनुष्यबळ कमी लागते.
- अजित चौकेकर, वीट व्यावसायिक, न्हावेली
..................
कोट
वीट व्यवसायाला पावसाचा मोठा धोका असतो. गतवर्षीपासून मे महिन्याच्या सुरुवातीलाच पडलेल्या अवेळी पावसाने वीट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. एकीकडे शासन रॉयल्टी भरून घेते; मात्र नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाईसाठी शासन आमचा कधीच विचार करत नाही. त्यामुळेच वीट व्यावसायिकांनाही इतरांप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी. जेणेकरून बेरोजगार तरुणही रोजगारासाठी या व्यवसायात उतरू शकतात.
- भरत गावकर, वीट व्यवसायिक, सोनुर्ली
....................
कोट
आज कुंभार समाजाकडून होणारा विटेचा व्यवसाय कमी झाला, तरी पारंपरिक पद्धतीने तयार होणारी वीट मजबूत होती. आज जास्त उत्पादनासाठी परप्रांतीयांकडून तयार करून घेतलेली विट मजबूत नसते; मात्र आज कुंभार समाजही या व्यवसायासाठी उपलब्ध होत नसल्याने पर्याय म्हणून परप्रांतीय व इतर आधुनिक पद्धतींचा वापर करावा लागतो.
- नरेंद्र मिठबावकर, वीट व्यावसायिक, वेत्ये
--
पॉईंटर
व्यवसायावर एक नजर
- सिंधुदुर्गसह गोवा राज्यात विटेला मागणी
- परराज्याच्या कामगारांची व्यवसायात उडी
- पारंपरिकतेसह अधुनिकतेची कास
- व्यवसाय आव्हानात्मक, फायदा कमी
- ग्राहकाला जाग्यावर सहा रुपयाने वीट पोच
- खर्च वगळता केवळ अडीच रुपये नफा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62431 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top