गांधीजींनी अनुभवला ‘रामराजा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीजींनी अनुभवला ‘रामराजा’
गांधीजींनी अनुभवला ‘रामराजा’

गांधीजींनी अनुभवला ‘रामराजा’

sakal_logo
By

पाऊलखुणा भाग- ७०
--

गांधीजींनी अनुभवला ‘रामराजा’

लीड
बापूसाहेब महाराज यांच्या राज्यकारभाराचा आणि कर्तृत्वाचा महात्मा गांधी यांनी ‘रामराजा’ अशा शब्दात गौरव केला होता. या एकाच शब्दात त्यांचे कर्तृत्व, त्यांची कर्तबगारी याची व्यापकता लक्षात येते. महात्मा गांधींनी स्वतः त्यांच्या कर्तबगारीचा अनुभव घेतला आणि नंतरच त्यांचा ‘रामराजा’ अशा शब्दात गौरव केला. महात्मा गांधी आणि महाराजांच्या भेटीच्या दोन प्रसंगाची नोंद मिळते.
--------------------
बापूसाहेब महाराजांच्या कार्यकाळात भारतात ब्रिटिशांविरोधात आंदोलन पेटले होते. याच्या केंद्रस्थानी महात्मा गांधी होते. त्यामुळे गांधीजींशी जवळीक असणारा अर्थातच ब्रिटिशांच्या नजरेत येणार होता. याची पर्वा न करता बापूसाहेब महाराजांनी गांधीजींचे केवळ आदरतिथ्यच केले नाही तर त्यांना पूर्ण सन्मान दिला. महाराजांच्या धाडसाचे, राजा म्हणून स्वतंत्र विचारक्षमतेचे दर्शन यातून घडते.
गांधीजींच्या भेटीचे दोन संदर्भ इतिहासाच्या नोंदीमध्ये आढळतात. हे प्रसंग समजून घेतले तर गांधीजींना महाराजांमध्ये रामराजा कसा दिसला याचा उलगडा होतो. महात्मा गांधी एप्रिल १९२७ ला महिनाभर आंबोलीत मुक्कामाला होते. गांधीजी तेव्हा दक्षिणेकडे दौऱ्यावर होते. यावेळी ते बेळगावला आले होते. त्यांना रक्तदाबाचा त्रास आणखी जाणवू लागला. डॉक्टरांनी कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. आंबोली हे त्यांच्यासाठी योग्य ठिकाण होते. तिथे राहायचे झाल्यास बापूसाहेब महाराजांशीच संपर्क साधणे संयुक्तीक होते.
गांधीजींच्यावतीने महाराजांसाठी बेळगावहून सावंतवाडीत तार पाठवून तशी विनंती करण्यात आली. महाराजांनीही तातडीने स्टेट इंजिनियरला बोलावले. आपला आंबोलीतील राजवाडा गांधीजींना राहण्यासाठी देण्याची सूचना केली. खरे तर खुद्द महाराजच आंबोलीला त्या कालावधीत राहायला जाणार होते. सामानसुमानही पुढे पाठवले होते; मात्र गांधीजी येणार असल्याने त्यांनी तो बेत रद्द केला.
गांधीजी जवळपास महिनाभर तिथे मुक्कामाला होते. या काळात स्वतः महाराज दर दोन-तीन दिवसांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला आंबोलीत जात आणि परत येत. त्या काळात गांधीजींसोबत त्यांचे सहकारी महादेवभाई देसाई मुक्कामाला होते. त्यांनी या महिन्याभरातील गांधीजी आणि महाराज यांच्यातील ऋणानुबंधांविषयी लिहिले आहे. या संदर्भानुसार श्रीमंत बापूसाहेब महाराज यांनी यावेळी गांधीजींवर जी छाप पडली तशी हिंदुस्थानात दुसऱ्या कोणत्याच राजाला पाडता आली नाही.
यात त्यांनी लिहीलय की, आंबोलीत हवापाणी जसे अनुकूल होते तसाच सावंतवाडीच्या महाराजांचा सहवासही मधुर होता. राजा महाराजांच्या पाहुणचाराचा रहाण्याचा आमच्यासाठी हा पहिलाच अनुभव नव्हता. याआधी अनेक राजेराजवाडे यांची जीवनशैली जवळून पाहण्याचे प्रसंग अनेक आले; पण बापूसाहेब महाराज यांच्या इतकी छाप कोणीच पाडू शकले नाही. याआधी खादी फेरीत सावंतवाडीत यायचा योग आला होता. या वेळेत प्रत्येकाकडून श्रीमंतांविषयी स्तुती शिवाय काही ऐकायला मिळत नव्हते. कोणी सांगत आमच्याकडे रामराज्य आहे तर कोणी म्हणत आमच्या राजासारखा दुसरा राजा हिंदुस्थानात सापडणार नाही. कुणी म्हणायचे आमच्या राजासारखा श्रीमंत दुसरा कोणी नाही तर काही म्हणायचे गीता पठणाशिवाय आणि देवपुजे शिवाय ते अन्नालाही शिवणार नाहीत. टीका अशी कुठेच ऐकायला मिळत नव्हती. कित्येक राजा राजवाड्यांच्या काळ्याबेऱ्या गोष्टी ऐकून कान किटून गेले होते; पण इथे चित्र उलटच. टीका काढणारासुद्धा सांगायचा की, ‘आमचा राजा म्हणजे साधुपुरुष आहे. अशा साधूकडून राज्यकारभार चालवला जाणे शक्य नाही.’ या ऐकिव गोष्टी होत्या; पण प्रत्यक्ष अनुभवाचा योग आंबोलीतील गांधीजींच्या मुक्कामाच्या निमित्ताने आला.
गांधीजींना या प्रजाजनांकडून ऐकलेल्या सगळ्या गोष्टी आधीच सांगून टाकल्या होत्या. महाराज आणि राणीसाहेब गांधीजीआंबोलीहुन निघण्याच्या आदल्या दिवशी त्यांना भेटायला आले. यावेळी गांधीजींनी सरळ या विषयाला हात घातला. ते म्हणाले, ‘‘महादेवाने आपल्याविषयी खूप चांगल्या गोष्टी ऐकवल्या आहेत; पण त्यातल्या काही गोष्टींबद्दल आपल्याशी बोलावेसे वाटते. असे सांगतात की संस्थांनच्या उत्पन्नातून आपण फक्त दोन हजार इतका पगार घेता आणि आपला दानधर्म याच रकमेतून चालवतात. ही गोष्ट खरी आहे का?’’ यावर महाराज म्हणाले, ‘‘मी अमुक एक रक्कम घेतो हे खरे आहे; पण ती दोन हजार नसून अडीच हजार आहे. दरबार भरवायचा असेल, व्हाईसरॉय, गव्हर्नर वगैरेंना भेटायचे असेल, थोडक्यात सांगायचे तर संस्थांनची कामे असतील तर मग खर्च संस्थांनकडून केला जातो.’’
अधिक स्पष्टीकरणासाठी गांधीजी म्हणाले की, ‘आपण निराधार मुलांचे पालनपोषण करीत असता ना? हे आपल्याच पैशातून करता ना? आता आंबोलीत आलात त्याचा खर्च संस्थांनच्या तिजोरीतून कि स्वतःच्या खर्चातून करायचा?'' यावर महाराज म्हणाले, ‘‘होय हा सगळा खर्च माझ्या पगारातून चालवितो.’’ त्यावर गांधीजी अत्यंत आनंदाने म्हणाले, ‘‘मी माझ्या बघण्यात राजा प्रजेचा नोकर बनल्याचा हा एकच दाखला आहे.’’
यावरही महाराज म्हणाले, ‘‘असे आणखीही मिळतील. म्हैसूरचे महाराजही आपल्या खासगी खर्चासाठी अशीच ठरावीक रक्कम घेतात.’’ त्यावर गांधीजी हसत म्हणाले, ‘‘मग तुमच्या पाहूणचारातून त्यांच्या पाहुणचाराला जाण्यामध्ये काहीच कठीण वाटायला नको.’’ त्यावर महाराज म्हणाले की, ‘शिंदे सरकार संस्थांनच्या उत्पन्नातून काहीच घेत नसत. ते स्वतःचा खर्च आपल्या खाजगी उत्पन्नातून चालवीत असत.’ यावर गांधीजींचे उत्तर खूप बोलके होते. ते म्हणाले, ‘खासगी उत्पन्नातून म्हणजे संस्थानातून घेतलेल्या पैशातूनच ना? मला एवढेच सांगायचे आहे की, आपल्याप्रमाणे स्वतः मेहनत करून मोठ्या नोकराप्रमाणे मजुरी मिळवून तिच्यावर खर्च चालवणारा राजा क्वचितच पाहायला मिळेल.’’ यानंतर बऱ्याच गप्पा झाल्या. गांधीजींनी राणीसाहेबांच्या साध्या रहाणीबद्दलही गौरवोद्गार काढले. खादी प्रसाराबाबतही चर्चा झाली. संध्याकाळ होत आली होती. महाराज ढोपरापर्यंत पॅन्ट चढवून व बूट घालून फिरण्याच्या खाकी पोशाखात होते. खरंतर महाराज व राणीसाहेब आले तेव्हा त्यांना बसायला खुर्ची दिली होती; पण दोघेही खाली जमिनीवरच अंथरलेल्या सतरंजीवर एखाद्या मित्राप्रमाणे गांधीजींसमोर बसले होते. संध्याकाळ होताच त्यांनी गांधीजींना सोबत बाहेर फिरायला बोलवले. त्यांच्या आग्रहामुळे महिन्याभरात प्रथमच गांधीजी आंबोली पहायला महाराजांसोबत मोटारीतून बाहेर निघाले. डोंगररांगांच्या सान्निध्यात, निसर्गरम्य भागात महाराजांनी मोटर थांबवली. दोघेही चालू लागले. यावेळी गांधीजी म्हणाले, ‘‘दार्जिलिंगसारखी भव्य निसर्ग स्थळे येथे आहेत. दार्जिलिंगच्या भव्यतेत भयानकतेचाही काही अंश असल्याचे दिसते; पण तुमच्या या आंबोलीच्या टेकडीत मित्रत्व ओतप्रोत भरलेले आहे. टेकडीकडे पाहून ममत्व, प्रेमभाव उत्पन्न होतो.’’
या भेटीत महाराजांनी दुसऱ्या दिवशी महादेव भाई आणि गांधीजींच्या सोबत असलेल्या देविदास यांना नारायणगड दाखवायचे निमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते महाराजांसोबत मोटारीने निघाले. रस्त्यात राम मंदिर दिसताच महाराजांचे मस्तक सहज, धार्मिक, विनम्र भावनेने खाली वाकले. इंग्रजी भाषेवर त्यांचे असलेले प्रभुत्व कोणालाही जाणवायचे; पण विलायतेतील फक्त चांगले आहे तितकेच त्यांनी आचरणात आणल्याचे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होते. महाराजांची मोटार नारायणगडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जवळ पोचली. पुढचा प्रवास पायी होता. चढ-उतार व खडकाळ वाटेवरून महाराज सफाईदारपणे चालत होते. वाटेतील वाघाची गुहा, विविध वनौषधी, फळाफुलांची माहिती देत होते. ते गडावर चढले आणि आजूबाजूच्या भागाची माहिती देऊ लागले. ते म्हणाले, ‘‘ते पहा दोन गड. एक मनसंतोष, दुसरा मनोहरगड. या दोघांमध्ये २०० वार अंतर असल्याचे पुस्तकात वर्णन आहे; पण मी वर चढून दगड फेकून बघितला. तो समोरच्या गडावर जाऊन पडला. याचा अर्थ हे अंतर २०० वार नाही. मग नकाशा मागवून पाहिला असता ते अंतर २०० वार नसून २०० फूट असल्याचे कळले. तो पलीकडचा भाग म्हणजे आमची व कोल्हापूर संस्थानची हद्द. तो पहा पलिकडच्या भागात एक गाव दिसतोय. गावात २० घरे आहेत. त्यांना शाळा हवीयं.’’ इतक्या लांबून बघूनही त्या गावचे प्रश्न सतत डोक्यात ठेवणाऱ्या या राजाला सलाम करावा तितका थोडाच म्हणावा लागेल.
यानंतर महादेवभाईंनी आणखी ऐकिव गोष्ट विचारली की, ‘महाराज मी ऐकलय तुम्ही दारूला शिवलही नाही. हे खरं आहे का?’ यावर महाराज म्हणाले, ‘मी दारू पीत नाही; पण सदैव मद्यत्यागी होतो असे म्हणता येणार नाही. विलायतेत असाताना मात्र मी दारुला कधीच स्पर्श केला नाही. माझ्या गव्हर्नेस मिस मॉक्सन यांना मी विलायतेत जाताना दारूला स्पर्श करणार नाही असे वचन दिले होते. तिथे कधीच मद्यपान केले नाही. महायुद्धात मेसापोटेमिया येथे असताना तेथे थंडीने गारठून जायचो. अशावेळी गरम पेय घेण्याची गरज भासायची. एकदा माझ्या गव्हर्नेसला पत्र पाठवून परिस्थिती सांगितली व व्हिस्की घ्यावी का? म्हणून विचारले. त्यांनी परवानगी दिली. पुढे एकदा माझ्या दोन नोकरांच्या तोंडाला दारुचा वास येत असल्याने
मी रजा दिली. मग मी विचार केला की दारू प्यायले म्हणून नोकराला जर मी रजा देत असेन तर स्वतः कसे काय याचे प्राशन करावे? तेव्हापासुन मी पुन्हा कधी दारुला स्पर्श केला नाही.’’ महाराजांचे कतृत्व याच दौऱ्यात गांधीजींनी खूप जवळून पाहिले. प्रजा राजाबद्दल जे बोलायची ते खरे असल्याचे त्यांना दिसले. इथेच बापूसाहेब महाराज त्यांच्यासाठी ‘रामराजा’ झाले.
------------------
चौकट
गांधीजींची पाद्यपूजा
आंबोलीतील मुक्कामानंतर पुन्हा एकदा गांधीजी सावंतवाडी संस्थानात आले होते. १९२८ ची गोष्ट आहे. गांधीजींना बेळगावहून वेंगुर्लेत जायचे होते. वाटेत सावंतवाडीत मुक्कामाची सोय करण्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवले; मात्र त्यांना राहण्यासाठी सोयीस्कर अशी जागा काही सापडेना. सरकारी गेस्ट हाउसचा पर्याय समोर आला. त्यामुळे कार्यकर्ते संस्थानच्या दिवाणांना भेटले; मात्र ब्रिटिशांच्या रोषाच्या शक्यतेने दिवाणांनी गेस्ट हाऊस उपलब्ध करण्यास नकार दिला. यामुळे कार्यकर्ते थेट महाराजांकडे गेले. त्यांनी संस्थानच्या ताब्यातील एका भव्य वाड्यात त्यांची उतरण्याची सोय केली. या ही पुढे जात गांधीजींना आपल्या वाड्यात आमंत्रित केले. तेथे त्यांची पाद्यपूजा केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62681 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top