
दाभोळ-घरात पाणी शिरते हा दावा अमान्य
बंधाऱ्यांमुळे पाणी घरात शिरल्याचा दावा अमान्य
टेटवलीतील ग्रामस्थाच्या आरोपाचे कृषी विद्यापीठाकडून खंडन
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २९ : डॉ. बाळासाहेब कोकण कृषि विद्यापीठाच्या वाकवली येथील संशोधन प्रक्षेत्रातील टेटवली येथे बांधण्यात आलेल्या २ बंधाऱ्यांमुळे आपल्या घरात पावसाळ्यात दरवर्षी पाणी शिरून नुकसान होत असल्याची तक्रार ग्रामस्थ प्रकाश तांबे यांनी केली आहे. या तक्रारीची दखल अद्याप घेण्यात न आल्याने त्यांनी संतापही व्यक्त केला आहे. मात्र, हा आरोप कृषी विद्यापिठाने फेटाळून लावला आहे.
दापोली तालुक्यातील वाकवली प्रक्षेत्रातील टेटवली-बौद्धवाडीत प्रकाश तांबे यांचे घर आहे. हे घर टेटवली मोहल्ल्यातून जाणाऱ्या नदीकिनारी बांधले आहे. तांबेच्या घरापुढे सुमारे ३५० मीटर अंतरावर कृषी विद्यापीठाने बंधारा बांधला आहे. भरपूर पाऊस पडल्यावर बंधाऱ्यातील बॅकवॉटर आपल्या घरात शिरते व घराचे दरवर्षी अतोनात नुकसान होते, अशी तक्रार तांबे यांनी विद्यापीठ, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांकडे केली आहे. मात्र, या तक्रारीला अद्याप उत्तर देण्यात आलेले नसल्याचे तांबे यांचे म्हणणे आहे. दरवर्षी पावसाळ्यात २ ते ३ वेळा पुराचे पाणी आपल्या घरात शिरते. यामुळे घरातील धान्य, बिछाने व इतर साहित्य बाधित होते. पुराचे पाणी घराला लागत असल्याने घराचे जोतेही बाधित झाल्याने घराला धोका आहे. शिवाय घरातील वृद्ध आई-वडील, लहान मुले व पत्नीच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे त्यांना सुरक्षितस्थळी हलवावे लागते. आपले सर्व कुटुंबीय मोलमजुरी करत असून आर्थिक स्थितीही हलाखीची असल्याने दुसऱ्या ठिकाणी जागा घेऊन घर बांधणे शक्य नाही. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा, अशी विनंती तांबे यांनी केली आहे. दरम्यान, टेटवलीतील २ बंधाऱ्यांमुळे तांबे यांच्या घरात पाणी जात असल्याचा दावा कृषि विद्यापीठाने फेटाळला आहे.
------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62785 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..