
रत्नागिरी-मिरकरवाडा बंदरात चोऱ्या, टोळक्याचा पर्दापाश
-rat29p17.jpg
25128
रत्नागिरी ः मिरकरवाडा बंदरात चोरी करताना सीसीटिव्हीत कैद झालेला चोरटा.
मिरकरवाडा बंदरात चोऱ्या
करणाऱ्या टोळक्याला पकडले
जमावाकडून तिघांना चोप; सीसीटीव्ही कॅमेरात कैद
रत्नागिरी, ता. २९ ः येथील मिरकरवाडा बंदरावर चोऱ्या करणाऱ्या टोळक्याचा छडा लागला आहे. बंदरावरील राजिवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी सोसायटीच्या पेट्रोल पंपावरील पितळीची टाकी चोरणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्याला पकडल्यानंतर जमावाने बेदम चोप देऊन त्याच्या सहकाऱ्यांची नावे वदवून घेतली. त्यातील इतर दोघांना बंदरावरील मलबारी जेटी येथे पकडून धुलाई केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आला आहे.
मिरकरवाडा बंदरावरील उभ्या असलेल्या नौकांवरील जाळी, जाळ्याच्या पितळी व तांब्याच्या कड्या, शिसे, डिझेल तसेच बंदरावरील गोडाऊनमध्ये आणि पेट्रोलपंपावरील वेगवेगळे साहित्य चोरीस जात होते. पावसाळी बंदीच्या पार्श्वभूमीवर १० मेपर्यंत मच्छीमार नौका बंदरात आणून उभ्या केल्या जातात. नौकांचे साहित्य गोडाऊनमध्येही ठेवले जाते. या ठिकाणच्या वस्तू चोरीस जात होत्या. दरवर्षी १५ मे नंतर अशा चोऱ्यांना वाढत असत, परंतु चोरटे हाती लागत नव्हते. या वेळी मात्र हे चोरटे राजिवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी सोसायटीच्या आवारातील नौकेच्या इंजिनवरील पितळीची टाकी चोरण्यासाठी आले आणि त्यांचे बिंग फुटले.
बंदरावरच्या या पेट्रोलपंपाच्या आवारातून पितळीची टाकी चोरून नेताना चोरटे येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. बुधवारी (ता. २५) दुपारी ३ च्या सुमारास ही चोरी झाली. या चोरीची शहर पोलिसांकडे तक्रार झाली. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चोरट्यांपैकी एकजण पुन्हा पेट्रोलपंपाजवळ आला असता, त्याला सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले. ही माहिती मच्छीमारांना कळल्यानंतर ते सोसायटीच्या कार्यालयाजवळ आले आणि चोरट्याला बाहेर आणून चोप दिला. त्यावेळी त्याने आपले नाव सलमान डॉन असल्याचे सांगितले. मच्छीमारांकडून चोप देताना त्याच्या साथीदारांची नावे विचारून घेण्यात आली. त्याने सरजील, अरमान, जुनैद अशी साथीदारांची नावे सांगितली. याचवेळी त्याने चोरलेला माल गुरुनामक व्यक्तीला आणि रामआळीतील भांड्याच्या दुकानात विकतो अशी माहिती दिली. हे चोरटे मिरकरवाडा गावातीलच आहेत.
-----------------------------
चौकट
साथीदारांचा शोध अन् पिटाई!
नौकांचे साहित्य चोरणाऱ्या टोळीचा छडा लागल्यानंतर त्याच्या साथीदारांचा शोध सुरू झाला. रात्री पहिल्या चोरट्याच्या साथीदारांमधील दोघेजण पुन्हा सोसायटीच्या पेट्रोलपंपाजवळ घुटमळत असल्याचे दिसून आले. त्यांनाही मच्छीमारांनी पकडून जवळच्या मलबारी जेटीवर नेऊन चोप दिला. ही माहिती राजिवडा महिला मच्छीमार तालुका सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलिस ठाण्यात फोन करून तातडीने पोलिसांना पाठवा असे सांगितले. परंतु पोलिसांना यायला वेळ झाला. तोपर्यंत चोरट्यांची पिटाई सुरूच होती.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62800 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..