
चिपळूण -चिपळूण शहरात बुलेटची दहशत
L25586ः संग्रहीत
.....
फटफटीच्या आवाजाने वाढल्या कटकटी
चिपळुणात दुचाकींच्या आवाजाने कानठळ्या; सामाजिक शांतता बिघडली
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ ः फटाकेसदृश आवाज करत धडधडत धावणाऱ्या दुचाकींचा शहरात हैदोस वाढला असून, या बुलेटबाजांमुळे रस्त्यावरून जाणारे पादचारी, विशेषत: वृद्ध नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी याला आवर घालावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून तरुण चालक फटाकेसदृश आवाज काढतात. यामुळे हे वाहन रस्त्यावरून जाताना इतरांचे लक्ष वेधून घेते; मात्र अनेकदा लोक दचकतातही. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिला आवाजामुळे घाबरतात, यातून रस्ते अपघातांची शक्यता बळावते. सध्या चिपळूण शहरातील रस्त्यांवर अशा बुलेटबाजांची धूम सुरू आहे. इतर वाहनांच्या तुलनेत महागडी असूनही बुलेटची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. नोकरदार, महाविद्यालयीन युवक, व्यावसायिकांची बुलेटला पसंती आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात बुलेटस्वारांचा मोठा वाटा आहे. काही टारगट युवकांनी गेल्या काही दिवसांपासून नियमांना धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी हैदोस घालणे सुरू केले आहे. शाळा-महाविद्यालये, दवाखाने आणि गृहप्रकल्प असलेल्या क्षेत्रात बुलेटचालकांकडून मर्यादा ओलांडली जाते. अनेकदा गर्दीत फटाके फोडल्याचा आवाज करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यात गंमत वाटण्याची विकृती वाढत आहे. यावर आळा घालण्यास पोलिस विभाग अपयशी ठरत आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार दिवसेंदिवस अधिक वाढू लागला आहे.
.............
चौकट
गॅरेज मालकांवरही कारवाई व्हावी
दुचाकीतून बुलेट फटाका फुटल्यासारखा आवाज यावा, म्हणून गॅरेजमध्ये नेऊन त्यात तांत्रिक बदल केला जातो. हे बदल नियमांचे उल्लंघन आहे. यासाठी बुलेटस्वारांसह अवैधपणे तांत्रिक बदल करून देणाऱ्या गॅरेजचालकांवर वाहतूक पोलिसांसह तत्सम यंत्रणेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
................
कोट
फटाकेबाज बुलेट चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी. बुलेटवर फक्त चलन कारवाई न करता ती काही दिवसांसाठी जप्त करण्यात यावी. जेणेकरून हा प्रकार होणार नाही, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
- उसामा महालदार, चिपळूण
......................
कोट
बाजार, गजबजलेले चौक, महाविद्यालये, शिकवणी वर्ग आणि उद्यानांजवळ बुलेटचालक फटाकेबाजांचा हैदोस अधिक असतो. महिला, तरुणींचे लक्ष वेधण्यासाठी हे सर्व उपद्व्याप केले जातात. यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
- रश्मी तटकरे, चिपळूण
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63310 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..