कृषी पर्यटन मेळाव्यातून २५ लाखांची उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

krushi paryatan
कृषी पर्यटन मेळाव्यातून २५ लाखांची उलाढाल

कृषी पर्यटन मेळाव्यातून २५ लाखांची उलाढाल

ओरोस - जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नुकाताच कुडाळ येथे आयोजित केलेला सिंधू कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन व पर्यटन मेळावा यशस्वी झाला. या कार्यक्रमाला सुमारे ७० ते ८० हजार नागरिकांनी भेट दिली. आर्थिक उलाढाल सुमारे २५ लाखांची झाली. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेला अचानक आदेश देत सिंधू कृषी, पशु व पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यास सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासक असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी हे प्रदर्शन घेण्याचे निश्चित केले.

यासाठी जिल्हा परिषद स्वनिधिमध्ये वार्षिक बजेटमध्ये आर्थिक तरतूद केलेल्या ३० लाख रुपये निधीचा वापर केला होता. तर याला जोड म्हणून पालकमंत्री सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून १० लाख रुपये आर्थिक तरतूद करीत पर्यटन महोत्सव आयोजित केला होता. त्यामुळे हा कार्यक्रम सिंधू कृषी, पशु व पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सव तसेच राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘सिंधू सरस’ असा झाला. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर हा कार्यक्रम भरगच्च असा नियोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विविध पैलू होते.

जिल्हा परिषदेची संकल्पना असलेल्या सिंधू कृषी, पशु व पक्षी प्रदर्शनाने राष्ट्रीयस्तरावर नाव कमावले आहे. गेली तीन वर्षे आर्थिक तरतूद असताना हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. पहिल्या वर्षी आचासंहितेमुळे तर पुढील दोन वर्षे कोरोनामुळे जिल्हा परिषद हा कार्यक्रम घेऊ शकली नव्हती. मात्र, त्यापूर्वी झालेले हे प्रदर्शन राज्यस्तरीय आयोजित करण्यात येत होते. त्याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत होता. लाखोंच्या संख्येने शेतकरी भेटी देत होते. तर कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत होती. या महोत्सवात गायी, बैल, तसेच आधुनिक शेती अवजारे यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असायचे.

यावर्षी १७ ते २० मे या कालावधीत झालेले प्रदर्शन व पर्यटन महोत्सव उष्णतेच्या लाटेत झाला. त्यातच पावसाने दोन वेळा हजेरीही लावली होती. त्यामुळे यापूर्वी जिल्हा परिषदेच्या झालेल्या प्रदर्शनाव्यतिरिक्त वेगळे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनावर पडली होती. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी ती विशेष लक्ष देत पेलली. यासाठी त्यांनी पूर्ण यंत्रणा नियोजनबद्ध कामाला लावली होती. त्याचे फळ म्हणजे हे प्रदर्शन यशस्वी पार पडले; मात्र, प्रदर्शनाचे टायमिंग चुकल्याने अपेक्षित उपस्थिती व आर्थिक उलाढाल होऊ शकली नाही. मुळात प्रदर्शनासाठी ही योग्य वेळ नाही, असे खासगीत अधिकारी वर्ग सांगत होता; परंतु पालकमंत्री सामंत यांचे आदेश असल्याने ते डावलता येत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने प्रदर्शन यशस्वी करण्याचा निर्धार केला.

महोत्सवाचे नियोजन उत्तम होते. तसेच शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरतील अशा असंख्य सुविधा देणारे स्टॉल होते. सुमारे १८० स्टॉल उपलब्ध होते. यामध्ये मत्स्यपालन, आधुनिक फळ रोपे, वनस्पती, आधुनिक बियाणे, शेती अवजारे, उपकरणे, गृहपायोगी वस्तू, सुके मासे, बांबू रोपे, बांबू पासून बनविलेल्या वस्तू, लहान मुलांसाठी खेळण्याचे पार्क, आधुनिक शेती, शेळी, मेंढी पालन, बांबू लागवड यावर तज्ज्ञ मार्गदर्शकांचे परिसंवाद आयोजित केले होते. त्यामुळे भेट दिलेल्या शेतकऱ्यांना खूप काही सुविधा व माहिती घेता आली.

नियोजन उत्तम, टायमिंग चुकला
प्रशासक प्रजित नायर यांच्या योग्य नियोजनामुळे कृषी, पशु व पक्षी प्रदर्शन व पर्यटन महोत्सव यशस्वी पार पडला. सर्व सूत्रे प्रशासनाच्या हाती असल्याने ऐनवेळी आवश्यक बदल करण्याची लवचिकता होती. त्याचा वापर करीत प्रशासनाने चुका तत्काळ सुधारत उत्तम नियोजन केले. मात्र, टायमिंग चुकल्याने अपेक्षित म्हणजे या प्रदर्शनाची जुनी उंची प्रशासन गाठू शकली नाही. प्रदर्शनाचा कालावधीत उष्णतेची लाट होती. त्याचप्रमाणे गावोगावी कार्यक्रम होते. त्यामुळे नागरिकांना म्हणा अथवा शेतकऱ्यांना या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देता आली नाही. परिणामी जिल्हा परिषदेच्या यापूर्वी झालेल्या प्रदर्शनाने गाठलेली उंची यावेळी गाठता आलेली नाही.

सिंधू कृषी, पशु व पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सवाला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. सहभागी बचतगटांनी विक्रीला आणलेला माल प्रदर्शन कालावधी संपण्यापूर्वी संपला होता. काही बचतगटांचे हॉटेल स्टॉल होते. त्यांचीही मोठी उलाढाल झाली.
- राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63588 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top