रत्नागिरी : बारशूतील पेट्रोकेमिकलचा सिंधुदुर्गालाही धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेट्रोकेमिकल
बारशूतील पेट्रोकेमिकलचा सिंधुदुर्गालाही धोका

रत्नागिरी : बारशूतील पेट्रोकेमिकलचा सिंधुदुर्गालाही धोका

सावंतवाडी : बारशू (जि. रत्नागिरी) येथे होणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होणार नाहीत तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होईल. केवळ रोजगाराचे गाजर दाखवून हा प्रकल्प माथी मारला जात आहे. भविष्यात रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्हा या प्रकल्पामुळे धोक्यात येईल, अशी भीती शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे व्यक्त केली. शिवसेनेत असताना औष्णिक प्रकल्पावर भरभरून बोलणारे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आज मूग गिळून गप्प का? तर या प्रकल्पामुळे रोजगाराची वल्गना करत असाल तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या खात्यातून गेल्या नऊ महिन्यात या ठिकाणी किती उद्योगांना चालना मिळवून दिली, असा सवालही डॉ. परुळेकर यांनी केला.

रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प विरोधात परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘बारशू येथे होणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पासाठी स्वागत सभा आयोजित करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना संजीवनी ठरेल अशी वल्गना त्यांच्याकडून केली जात आहे. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील एकूण २ हजार गावातील तब्बल ५० हजार युवक-युवतींना रोजगार देणार असे भासविले जात आहे. मुळात रोजगाराच्या नावाने गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे, रिफायनरी प्रकल्प हा ऑटोमेशियन प्रकल्पामध्ये मोडतो. या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त काम हे मशनरी तसेच वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून केले जाते. त्यामुळे या ठिकाणी शिपाई, माळी आदी कामासाठी रोजगार मिळणार आहे; पण तेथेही परप्रांतीय कामगारांची भरती करतील. त्यामुळे याठिकाणी बेरोजगारांची घोर फसवणूक होणार आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प हा रेड कॅटेगरीमध्ये सर्वात टॉपचा रासायनिक प्रकल्प आहे. त्यामुळे पाणी, वायू प्रदूषण होण्याबरोबरच श्वसनाचे आजार, कॅन्सरचे विकार निर्माण होणार आहेत.

या प्रकल्पामुळे रोजगार नाही तर प्रत्यक्षात बेरोजगार उपलब्ध होणार आहेत. ही बेरोजगारी म्हणजे मच्छीमारी संपुष्टात येणार आहे. आधीच येथील पारंपरिक मच्छीमार अडचणीत असताना या प्रकल्पामुळे मोठी हानी होणार आहे. दुसरीकडे सौदी अरेबियातील मल्टीनॅशनल कंपनी व अबुधाबी पेट्रोल केमिकल कंपनी यांच्या माध्यमातून हा प्रकल्प या ठिकाणी उभारला जात आहे. समुद्रावाटे कच्चे तेल आणून या ठिकाणी पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी गॅस तयार करून तो पुन्हा परदेशात पाठवला जाणार आहे. त्यामुळे कोकणाला या प्रकल्पाचा काहीच फायदा होणार नाही.’’

मूग गिळून गप्प का?
डॉ. परुळेकर म्हणाले, ‘‘शिवसेनेत असताना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी औष्णिक प्रकल्पाविरोधात भरभरून बोलत होते; मात्र आता ते मूग गिळून गप्प का? दुसरीकडे नारायण राणे केंद्रात मंत्री झाले. त्यांच्याकडे असलेल्या लघु, सुक्ष्म व मध्यम खात्याच्या माध्यमातून येथील किती उद्योगांना आतापर्यत चालना मिळाली?’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63629 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SindhudurgKokanRatnagiri
go to top