
‘कोकणचा साज...’ चाकरमान्यांना करतेय अंतर्मुख
rat१p८.jpg
25776
रत्नागिरीः ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ लोकनाट्यातील कलाकार मंडळी.
---------------
‘कोकणचा साज...’ चाकरमान्यांना करतेय अंतर्मुख
सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणारे लोकनाट्य; करमणुकीपलीकडचे वास्तव
शिरीष दामले ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः कोकणची समस्या फक्त ब्रेन ड्रेन (बुद्धिमान माणसे मुलखाबाहेर जाणे) एवढीच नाही तर कोकणातील कमावते तरुण हातही मुलखाबाहेरच आहेत. येथील कामे, सेवा परप्रांतीय करू लागले आहेत. येथील जमिनी परप्रांतियांनी कायदेशीर मार्गाने बळकावल्या आहेत. या विदारक परिस्थितीवर भाष्य करत ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याने कोकणवासीयांना अंतर्मुख केले आहे. कोकणातील मोठा समुदाय मुंबईत आहे. या लोकनाट्यावर भाष्य करणारा व्हिडिओ मुंबईत लोकप्रिय झाला आहे. कोकणातील सामाजिक प्रश्नाला भिडणारा हा व्हिडिओ मुंबईतील तरुणांना जागे करतो आहे, हे या कलाकृतीचे नाट्यबाहेरील यश.
लोककलांचे दस्तावेजीकरण करणारा चाकरमानी कोकणात येतो. येथील लोककलांचा एकेक प्रकार चित्रित करता करता संपूर्ण कोकण त्याच्या डोळ्यासमोर उभे राहते. लोककलांची परंपरा, भजन, जाखडी, नमन, पारावरचे नाटक यातून एक कोकणी सामाजिक वास्तव उभे राहते. विनोदी बोचऱ्या पद्धतीने भाष्य करता करता हे लोकनाट्य नेमक्या समस्येवर जाऊन ठेवते. आजवर मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड यासह रत्नागिरी जिल्ह्यात या लोकनाट्याचे २८५ प्रयोग झाले आहेत. लोककलांचा धांडोळा घेत त्या रंगमंचावर मांडत कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण वृत्तीही या नाटकातून मांडली जाते. खास खवचट कोकणी विनोद आणि स्वतःवर हसण्याची खास वृत्ती अशा कोकणी प्रवृत्तीचे आणि इरसाल नमुन्यांचे दर्शन यातून घडते.
‘कोकनी शेतकऱ्यांनी जमनी इकल्या, तेथे इमले नि यवसाय हुबं हायत आनि आमी काय करताव, त्याच यवसायावर वॉचमनची नोकरी करताव. सोता यावसाय करया आमच्या पोरांना धाड का भरली? आज्यांनी जमनी इकल्या असतील, आता तुमी इकू नका. भांडणा बांदावरनं असतील, ती भावकीतच मिटवा. आंबा, काजूच्या पलीकडं जरा बघा. केरलात जावन बगा. त्यानी नारलापासनं काय काय तयार केलंय. तं बेलटीचा पन (करवंटी) उपेग करतात. आम्ही मातूर दळभद्री, आम्ही ती जालताव. कोकनात कोकम हाय, फनस हायत, जांबला हायत, आपला निसर्ग फलाफुलांनी संपन्न हाय, त्याचा फायदा घ्या,'' असे जळजळीत आणि नेटके भाष्य नाटकात आहे. त्यामुळे करमणुकीपलीकडे हे नाटक कसे पोचते, याचा पडताळा या नाटकातील सामाजिक भाष्य असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यावर उमटणाऱ्या शेकडो प्रतिक्रियांतून आला.
-------------
कोट
कोकणातील युवक कामाधंद्याच्या निमित्ताने मुंबई-पुण्यात जातायत आणि कोकणातील लोककला, सणवार यांचं ज्ञान नवीन पिढीला खूप कमी होतंय. ते दर्शन आणि ओढा वाढावा या दृष्टीने चालू केलेला हा प्रयोग आणि त्याचा योग्य परिणाम रसिकांपर्यंत पोचल्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रियांनी खूप समाधान वाटतंय.
- सुनील बेंडखळे, मुख्य सूत्रधार
चौकट
सामाजिक बांधिलकीही जपली
लोककलेतून केवळ जनजागृती करून न थांबता सामाजिक बांधिलकीही लोकनाट्यातील कलाकारांनी जपली आहे. गुहागरमधील शाळेच्या मदतीसाठी प्रयोग केला, तसेच तिवरे धरणग्रस्तासाठी प्रयोग करून त्यातून सुमारे एक लाखाची मदत देण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63656 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..