
पान एक-दोन डंपरमधील धडकेत चालक ठार
25910
मळगाव : येथे बुधवारी पहाटे झालेल्या अपघातातील डंपर. (छायाचित्र ः रोहन गावडे)
दोन डंपरमधील धडकेत
मळगावजवळ चालक ठार
सावंतवाडी, ता. १ ः मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या डंपरला मागून धडक दिल्याने चालक जागीच ठार झाला. परशुराम शोखप्पा चिन्नीराठोड (वय १९ मूळ रा. हंगरागुड, विजापूर-कर्नाटक, सध्या रा. गुढीपूर, ता. कुडाळ) असे त्याचे नाव आहे. झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव-मांजरेकरवाडी येथे आज पहाटे चारच्या सुमारास अपघात झाला. यात डंपरच्या केबिनचा चक्काचूर झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः कुडाळ येथून गोव्याच्या दिशेने चिरे वाहतूक करणाऱ्या डंपर (जीए ०३ एन ७८०७) मागील टायर फुटला. परिणामी चालकाने तो महामार्गाच्या डिव्हायडरच्या बाजूने उभा केला होता. पहाटे कुडाळ येथून गोव्याच्या दिशेने वाळू वाहतूक करणारा डंपर (एमएच ०७ एक्स ०५८५) चालकाला या उभ्या डंपरचा अंदाज आला नाही. त्याची जोरदार धडक या डंपरला बसली. धडक दिलेल्या डंपरच्या केबिनचा चक्काचूर झाला. त्यात अडकून चालक जागीच ठार झाला. या वेळी झालेल्या प्रचंड आवाजामुळे शेजाऱ्यांनी तेथे धाव घेतली. उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी सावंतवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह पोलिस घटनास्थळी आले. महामार्ग पोलिस अधिकारी अरुण जाधव पथकासह घटनास्थळी आले. डंपरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. दोन्ही डंपर एकमेकांत अडकलेले होते. दोन जेसीबी बोलावून तब्बल एक तासानंतर डंपर बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने केबिनमध्ये अडकलेल्या मृतदेह बाहेर काढण्यात आला. उपनिरीक्षक आनंद यशवंते यांच्यासह गुरुनाथ भागवत, धनंजय नाईक यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान, पोलिसांनी मृत चिन्नीराठोड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63850 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..