कामे अपूर्ण असताना टोल नको - नितेश राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitesh Rane
कामे अपूर्ण असताना टोल नको - नितेश राणे

कामे अपूर्ण असताना टोल नको - नितेश राणे

कणकवली - महामार्गाची शिल्लक कामे जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत टोल सुरू करू नये, ही आमची भूमिका आहे. खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांनी किंवा पोलिस प्रशासनाने ठेकेदाराला टोल सुरू करण्यापासून रोखले पाहिजे. रस्त्यावर बसून आपली पॅन्ट खराब करण्यापेक्षा आमदार वैभव नाईक यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवावेत, अशी टिका आमदार नितेश राणे यांनी आज येथे केली.

गेल्या आठ वर्षांच्या कालखंडामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. यामुळे आज देश प्रगतीपथावर आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी केंद्र सरकार प्रगत राष्ट्रांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीच्या काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळात देश भ्रष्टाचाराकडे वाटचाल करत होता; मात्र मोदी सरकारने भ्रष्टाचारमुक्त भारत आणि गरीब कल्याण योजना राबवून देशाची वाटचाल महासत्तेच्या दिशेने सुरू केली आहे, असा दावाही यावेळी राणे यांनी केला. केंद्राच्या आठ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.

यावेळी शिवसेनेने केलेल्या टोलमाफी रद्दच्या आंदोलनावर टीका करताना ते म्हणाले, ‘रस्त्यावर बसून आंदोलनापेक्षा आमदार नाईक यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवावेत. तेथे जनतेला खड्ड्यांतून चालावे लागत आहे. बंधाऱ्यांची कामे झालेली नाहीत. तेथे लक्ष द्यावे. जर त्यांना या मतदारसंघात माझ्याबरोबर लढायचे असेल, तर त्यांनी खुशाल लढावे. शिवसेनेने रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यापेक्षा, ज्यांना मोबदला मिळाला नाही, त्यांना मोबदला देण्यासाठी प्रयत्न करावा. आमची जी भूमिका आहे की, महामार्गासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या, अशा शिल्लक असलेल्या दहा टक्के शेतकऱ्यांना त्यांचा नुकसान भरपाईचा मोबदला मिळाला पाहिजे. याचबरोबर महामार्गावरून चालत असताना येणाऱ्या अडचणींसाठी स्कायवॉक असो, वेगावरील नियंत्रण असो व इतर जी कामे आहेत, ती व्हायलाच हवीत. जोपर्यंत ही कामे होत नाहीत, तोपर्यंत टोल सुरू करू नये, ही भूमिका आमची असून, खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांनी किंवा पोलिस प्रशासनाने ठेकेदाराला टोल सुरू करण्यापासून रोखले पाहिजे. देशात महामार्गावरील टोलला कोठेही विरोध नाही. टोल वसुली ही रस्त्याच्या भविष्यातील दुरुस्तीसाठी केली जात आहे. ही केंद्राची भूमिका आहे."

श्री. राणे म्हणाले, 'देशामध्ये २०१४ ते २०२२ या कालावधीमध्ये केंद्राने महत्त्वाचे निर्णय घेतले. विविध योजना राबवल्या. केंद्रात आजवर काँग्रेसच्या सरकारने जी काम केली नाहीत, ते काम मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत केले आहे. ऐतिहासिक राम मंदिर बांधण्याचा निर्णय करून येत्या वर्षभरात हे राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी सुरू होईल. काश्मीरबाबतचा ३७० कलम हटविण्याचा प्रश्न असो, मुस्लिम महिलांचा तीन तलाकचा कायदा रद्दचा निर्णय असो वा सर्जिकल स्ट्राइक असो, असे महत्त्वाचे निर्णय या सरकारच्या कालावधीत झाले आहेत.'

देशात प्रचंड प्रमाणात महागाई वाढत आहे; मात्र केंद्राकडून जनतेला दिलासा मिळत नाही, असे विचारले असता श्री. राणे म्हणाले, 'आपण जर बारकाईने पाहिले तर इतर देशांच्या तुलनेत भारताची प्रगती समाधानकारक आहे. इंधनाचे दरही केंद्राने कमी केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. राज्याला जीएसटीचाही परतावा दिला आहे.’

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी टोलमाफी होणारच

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालकांना टोल माफी व्हावी, ही सर्वांची मागणी आहे. केंद्रातील सरकारकडून ही टोलमाफी दिली जाईल, असा विश्वास मी सिंधुदुर्गवासीयांना देतो. केंद्रात नारायण राणे मंत्री आहेत. ते निश्चितच जिल्ह्याला टोलमाफी मिळवून देतील. सरकार आमचे आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही. कणकवलीतील उड्डाण पुलाचे काम पुन्हा एकदा होईल. त्याबाबत कार्यवाही सुरू झाल्याचे श्री. राणे यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63984 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top