बोगस विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या भरारी पथकांची नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या भरारी पथकांची नजर
बोगस विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या भरारी पथकांची नजर

बोगस विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या भरारी पथकांची नजर

sakal_logo
By

बोगस विक्रेत्यांवर आता भरारी पथकांची नजर
कृषी विभाग सतर्क ः बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच त्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी, जास्त दराने विक्री होत नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ८ तालुक्यांमध्ये ८ भरारी पथके नियुक्ती केली आहेत. तर जिल्हास्तरावर १ भरारी पथक नियुक्त केले आहे.
खरीप हंगाम २०२२ करिता बियाणे, खते व कीटकनाशके या कृषी निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होईल, यासाठी तसेच गुणवत्ता नियंत्रणाकरिता प्रत्येक तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी हे या भरारी पथकांचे अध्यक्ष असून, पंचायत समिती कृषी अधिकारी हे सचिव आहेत. जिल्हास्तरावरही भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी हे त्यांचे अध्यक्ष आहेत.
खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर बियाणे, खते व कीटकनाशके खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मार्केटमध्ये अनेक नवीन कंपन्या आणि विविध ब्रँडच्या माध्यमातून बियाणे उपलब्ध झाले आहे. यात काही कंपन्यांकडून बोगस बियाणे विक्री होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खरिपाचा हंगाम आल्यामुळे शेतकरी, कृषी विभाग यांच्यासह बियाणे विक्रेत्यांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे. मागील वर्षी बोगस बियाणी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात भरारी पथके बोगस विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सज्ज ठेवली आहेत.
सध्या जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यांची १७९, खत विक्रेत्यांची २७०, कीटकनाशके विक्रेत्यांची १५५ केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री करण्यात येते. या सर्व केंद्रांची टप्प्याटप्प्याने तपासणी करण्यात येणार आहे. तालुकास्तरीय भरारी पथकांना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची दर महिन्याला तपासणी करण्याचे अधिकार या भरारी पथकांना आहेत. तसेच विक्री केंद्रावर काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्या विक्री केंद्रावर तत्काळ विक्री बंद करण्याचे अधिकार पथकांना आहेत. अशा विक्री केंद्रांवर जप्ती आणण्याचे अधिकारही या पथकांना देण्यात आलेले आहेत. तसेच अशा बोगस बियाणे, खत, कीटकनाशके विक्रेत्यांच्या विक्री परवान्यावर कारवाई करण्यासाठी त्यांचे अहवाल जिल्हा कार्यालयास सादर करण्याच्या सूचना भरारी पथकांना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बियाणे, खते, कीटकनाशके याबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी. त्या तक्रारीची तत्काळ चौकशी केली जाईल. कृषी विक्रेत्यांकडून बोगस बियाणे, खत, कीटकनाशके विक्री करण्यात आल्यास त्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येते व अहवाल आल्यानंतर त्यावर सुनावणी करून त्या परवानावर कारवाई करण्यात येते.
खरीप हंगाम सुरू झाला की, शेतकऱ्यांची या हंगामासाठी लागणारे बी-बियाणे, खते खरेदी करण्याची धावपळ सुरू होते. त्यामुळे पेरणीच्या मानसिक दबावाखाली त्याची बाजारात फसवणूक होऊ शकतो. शेतकरी बळीराजा आहे. तथापि तो बाजारात व्यापारांचा बळी ठरू नये, म्हणून शेतकऱ्याने बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना सावधानता बाळगली पाहिजे.
त्यामुळे खते, कीटकनाशके, बी- बियाणे खरेदी करताना नागरिकांनी फुटलेले, गळके डबे, सिलपॅक नसलेल्या बाटल्यांतील कीटकनाशके खरेदी करू नयेत. मुदत संपली नसल्याची खात्री करावी. प्रमाणित व मान्यता प्राप्त कंपनीची कीटकनाशके खरेदी करावीत. बियाण्याच्या पिशवीवर उत्पादकाचे नाव प्रमाणित आहे का? त्याची नोंद, वजन, किंमत इत्यादीसह खताचे नाव, प्रकार तपासून पाहावे आदी प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.
..............
कोट
शेतकऱ्यांनी बियाणे, खते व कीटकनाशके खरेदीची पक्की बिले घ्यावीत व वापरताना सुरक्षा उपायांचे काटेकोर पालन करावे. कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावर कृषी निविष्ठा तक्रार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा तक्रार कक्ष सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत कार्यरत असणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे याबाबत काही तक्रारी असल्यास तक्रार कक्षाशी संपर्क साधावा.
- दत्तात्रय दिवेकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64122 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top