
शूर योध्द्यांचा इतिहास समजणे गरजेचे
L26408
- बांदा ः येथे वार्तालाप कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस. सोबत शिवतेज संस्थेचे पदाधिकारी.
शूर योध्द्यांचा इतिहास समजणे गरजेचे
अभिनेते अनिल गवस ः बांद्यात ''शिवतेज संस्थे''तर्फे वार्तालाप
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच स्वराज्य राखण्यासाठी ज्या सरदारांनी, योद्धयानी प्राणाची आहुती दिली, त्यांचा इतिहास आताच्या पिढीसमोर येणे ही काळाची गरज आहे. अभिनेते चिन्मय मांडलेकर, प्रवीण तरडे यांनी सलग ऐतिहासिक चित्रपटांची मालिका आणल्याने इतिहासाला उजाळा मिळाला आहे. हंबीरराव मोहिते चित्रपट हा सर्वोत्कृष्ट असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सिने अभिनेते अनिल गवस यांनी दिली.
छोट्या पडद्यावर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे अभिनेते गवस यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने गंधर्व फोटो स्टुडिओत आयोजित केला होता. यावेळी पत्रकार निलेश मोरजकर यांनी गवस यांची मुलाखत घेतली. यावेळी संस्थेचे खजिनदार भूषण सावंत, केदार कणबर्गी, नारायण बांदेकर, प्रथमेश राणे, समीर परब, प्रशांत गवस, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, विनेश गवस आदी उपस्थित होते. यावेळी चित्रपट, संगीत, सामाजिक, राजकीय विषयावर गवस यांनी मनमोकळा संवाद साधला.
गवस म्हणाले, "एखाद्या विषयावर ऐतिहासिक चित्रपट किंवा मालिका बनविणे हे तितकेसे सोपे नाही. यासाठी त्या व्यक्तीरेखेचा परिपूर्ण अभ्यास करणे गरजेचे असते. कारण आपण जे दृश्य चित्रपटातून दाखवितो तेच ग्राह्य मानले जाते. ''तानाजी'', ''पावनखिंड'', ''शेर शिवराय'' या चित्रपटाना लोकांनी डोक्यावर घेतले. यामध्ये व्यक्तीरेखा साकारणाऱ्या कलाकारांनी देखील प्रचंड मेहनत घेतली."
ते पुढे म्हणाले, "हंबीरराव मोहिते चित्रपट हा उत्कृष्ट बनविण्यात आला आहे. आपण मालिकेत काम करताना हंबीरराव मोहिते यांची व्यक्तीरेखा साकारली होती. मालिकेला प्रेक्षक वर्ग असल्याने व मालिकेत रोज नवनवीन दाखवावे लागत असल्याने हंबीररावांचा इतिहास हा खोलपर्यंत दाखविण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे शूर योद्धा यांचा इतिहास, त्यांची युद्धनीती, गनिमी कावे हे आताच्या पिढीला समजण्यासाठी अशा ऐतिहासिक चित्रपटाच्या मालिकांची गरज आहे. भविष्यात ऐतिहासिक चित्रपट येणार असून आपणही एका विशिष्ट भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे."
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64412 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..