
रत्नागिरी- पर्यावरण दिन विशेष
(पर्यावरण दिन विशेषः लोगो
------------------
rat4p9.jpg
26539
- कासव संवर्धनाच्या कामाची मुहूर्तमेढ सह्याद्री निसर्गमित्रने वेळास गावी रोवली. आज त्याचे मोठ्या महोत्सवात रूपांतर झालेले दिसते आहे.
...
कासवांच्या अंड्यांची चोरी ते कासव संवर्धन
पर्यावरण रक्षणाची वाटचाल; वेळासचा निसर्गमित्रने केला कायापालट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : पर्यावरणाच्या रक्षणाची जाणीव होण्यासाठी काहीतरी टोचणी लागावी लागते. आपल्या वर्तणुकीने निसर्गावर अन्याय करत असल्याची टोचणी लागली की त्यातून काम उभे राहते. यासाठी जाणिवा सजग हव्यात. सह्याद्री निसर्गमित्रचे भाऊ काटदरे आणि त्यांच्या चमूने कोकणात निसर्ग संवर्धनाबाबत आणि मुळात कोकणातील निसर्गाचे देणे काय गमावले जाते, याचे डोळस निरीक्षण करून ३० वर्षांपूर्वी मोहीम सुरू केली. पहिली मोहीम होती, सागरी गरुडांचा शोध व त्यानंतर कासव संवर्धन. गेल्या ३० वर्षांत कासव संवर्धनातून कासव महोत्सव अशा पर्यटनवाढीकडे या मोहिमेने वाटचाल केली आहे. कासव संवर्धनाबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच किनारी आता जागृती होत असून मोठ्या प्रमाणावर अंडी संरक्षणाचे काम सुरू झाले. याचे श्रेय निसर्गमित्रांनाच आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला याबाबत भाऊ काटदरे यांच्याशी ''सकाळ''ने संवाद साधला. ही मोहीम कशी सुरू झाली, याबाबत बोलताना काटदरे म्हणाले की, सुमारे ३० वर्षांपूर्वी, कोकणची जैवविविधता वाचविण्याच्या उद्देशाने १९९२ साली सह्याद्री निसर्ग मित्रची स्थापना केली. ''ठेवू दूरदृष्टी, रक्षु निसर्ग सृष्टी''चा नारा देत, कोकणातील जैवविविधतेचा अभ्यास सुरु झाला. पक्षीनिरीक्षण हे उद्दिष्ट धरून सह्याद्रीच्या शिलेदारांनी संपूर्ण कोकण किनारपट्टी पालथी घातली. याचवेळी सागरी गरुडांची संख्या घटत असल्याचा अहवाल कार्यकर्त्यांच्या नजरेस आला. कार्यकर्त्यांना मात्र हा पक्षी अनेक वेळा दिसून येत असे, मग हा पक्षी नष्टप्राय कसा, या प्रश्नाचे उत्त्तर शोधण्यासाठी सागरी किनारपट्टीही सह्याद्री निसर्ग मित्रच्या शिलेदारांनी पालथी घातली. त्यातून सागरी गरुडाची एक-दोन नव्हे, तर ४० घरटी आढळली. म्हणजे हा पक्षी संपत चालला नव्हता, हे स्पष्ट झाले.
वर्षानूवर्षे एकच घरटे वापरणाऱ्या या पक्ष्याच्या विणीचा अभ्यासही निसर्ग मित्रने केला. याचदरम्यान वेळासच्या किनाऱ्यावर सागरी कासवांच्या संवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आले. दरवर्षी कोकणच्या किनाऱ्यावर येऊन सागरी कासवांच्या माद्या अंडी देऊन जात होत्या. मात्र, ही अंडी एकतर माणसांकडून खाल्ली जायची किंवा कोल्हे-कुत्रे यांच्या भक्ष्यस्थानी पडायची. स्थानिकांच्या सक्रिय सहभागातून सागरी कासवाची अंडी हॅचरीमध्ये सुरक्षित केली जाऊ लागली. कासव महोत्सवाचे वेळी या अंड्यातून बाहेर पडलेली पिले समुद्रात जाताना पाहण्यासाठी देश, विदेशातून पर्यटक येऊ लागले. यातून स्थानिकांना रोजगार मिळू लागला. आता वेळासची ओळख कासवांचे गाव म्हणून झाले आहे आणि तेथील महोत्सवही पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.
....
चौकट
चोरणारे हात संवर्धनासाठी सरसावले
वेळाससारख्या ठिकाणीच नव्हे, तर किनारपट्टीला कासवाची अंडी खाल्ली जात. कासव संवर्धनात ही मोठी अडचण होती. मात्र, निसर्ग मित्रने काम सुरू झाल्यानंतर कासवांची अंडी चोरणारे हात संवर्धनासाठी सरसावले आणि बघता बघता सागरी कासव संवर्धन मोहीम महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीवर पसरली. सागरी कासव संवर्धन मोहीम बारा वर्षे यशस्वीरित्या राबल्यानंतर या संस्थेने ती स्थानिकांकडे आणि वनविभागाकडे सुपूर्द केली आहे.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64624 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..