
नारिंग्रे हायस्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया
नारिंग्रे हायस्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया
देवगड ः तालुक्यातील नारिंग्रे गावातील महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृहाची सोय असलेल्या एस. बी. राणे हायस्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रशालेत पाचवी ते दहावीसाठी प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी वसतिगृह कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याध्यापक सुधाकर मंडले यांनी केले आहे. विद्यार्थी वसतिगृहामध्ये भरपूर प्रकाश व वायुवीजन असलेल्या खोल्या आहेत. संगणक, टी.व्ही., जेवणाची व्यवस्था, झोपण्यासाठी गाद्या, कडक शिस्त, मुलांच्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिले जात असल्याचे सांगण्यात आले. अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती, अंध -अपंग व्यक्ती आणि विशेष मागास प्रवर्गातील मुलांना वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश देण्यात येत आहे. या संधीचा फायदा घेऊन जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांनी आपला विकास साधावा, असे आवाहन केले आहे. इच्छुकांनी मुख्याध्यापक सुधाकर मंडले किंवा वसतिगृह अधीक्षक संतोष जोईल यांच्याशी संपर्क साधावा.
.................
देवगडात १३७ दाखल्यांचे वाटप
देवगड ः तालुक्यातील कातकरी, आदिवासी समाजातील नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. येथील तहसीलदार कार्यालयात लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी घेण्यात आलेल्या शिबिरात एकूण १३७ दाखल्यांचे वाटप केल्याची माहिती नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकुर यांनी दिली. तालुक्यातील कातकरी, आदिवासी समाजातील नागरिकांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात शुक्रवारी शिबिर घेण्यात आले. दिवसभराच्या शिबिरात लाभार्थ्यांना ९४ जातीच्या दाखल्यांचे, तर ४३ भूमिहीन दाखले अशा एकूण १३७ दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील मुणगे, कुणकेश्वर, शिरगाव, मोंड, सौंदाळे आदी भागातील कातकरी, आदिवासी समाजातील बांधव उपस्थित होते. यावेळी सोशित मुक्ती अभियान संस्थेचे अध्यक्ष उदय आईर तसेच महसूल कर्मचारी उपस्थित होते.
................
सिंधुदुर्गनगरीत आज ‘स्वराज्यगुढी’
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी (ता. ६) जिल्हा परिषद येथे सकाळी नऊला शिवस्वराज्य दिन आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवशक राजदंड स्वराज्यगुढी विधिवत उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64742 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..