
चिपळूण ः सावर्डेच्या आठवडा बाजारात खरेदीला गर्दी
rat5p37.jpg
26884
सावर्डे ः येथे रस्त्याच्या कडेलाच आठवडा बाजार भरत असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो.
....
सावर्डेच्या बाजारात सुक्या मच्छीने खाल्ला भाव
यंदा दर महागले; भाज्यांच्या बियाण्याला शेतकऱ्यांची मागणी
चिपळूण, ता. ५ ः पावसाळा तोंडावर असताना सावर्डे येथील आठवडा बाजारात परिसरातील नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी होत आहे. पावसाळी लागणाऱ्या वस्तू विकत घेऊन त्याचा साठा करण्यावर नागरिकांचा भर आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे येथे रस्त्याच्या दुतर्फा रविवारी आठवडा बाजार भरतो. येथे चिपळूण, माखजन, संगमेश्वरसह वेगवेगळ्या भागातील व्यापारी येतात. सावर्डेसह या परिसरातील पंधरा गावांतील ग्रामस्थ येथे खरेदीसाठी येतात. सावर्डे परिसरातील अनेक गावे डोंगरभागात आणि दुर्गम ठिकाणी आहेत. तेथे दिवसातून एकदाच एसटी जाते. अशा गावांतून दैनंदिन वस्तू विकत घेण्यासाठी सावर्डे परिसरात पावसाळ्यात येणे शक्य होत नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी पावसाळ्यात लागणाऱ्या डाळी, कडधान्य, तांदूळ, ज्वारी, नाचणी आणि इतर किराणा मालाचा साठा करून ठेवतात. सुकी मच्छी ही पावसाळी चार महिने पुरेल इतकी विकत घेतली जाते.
पुढील आठवड्यापासून मॉन्सून सुरू होणार आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने तालुक्यात हजेरी लावली. त्यानंतरही सावर्डे परिसरातील आठवडा बाजार रविवारी भरला. नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली. सावर्डे बस स्थानकाच्या परिसरात रस्त्यावरच वेगवेगळ्या पदार्थांची विक्री सुरू होती. ग्रामस्थ रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून खरेदी करत होते. त्यामुळे सावर्डे आठवडा बाजारादिवशी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता.
माखजन येथे शनिवारी आठवडा बाजार भरतो, तरीही सावर्डे येथे रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड पाहायला मिळाली. पावसाच्या पार्श्वभूमीवर सुकी मच्छी नेण्यासाठी मच्छी बाजारातदेखील ग्राहक मोठी खरेदी करत होते. यंदा सुकी मच्छी महागली आहे. पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकरी बाजारातून भातबियाणे आणि विविध प्रकारच्या भाज्यांचे बियाणेही खरेदी करताना दिसून आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65049 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..