महापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापूर
महापूर

महापूर

sakal_logo
By

(फोटो - २६९३०)
कोल्हापूर ः सकाळ माध्यम समूहातर्फे रविवारी झालेल्या महापुरावरील चर्चासत्रात बोलताना पाणीप्रश्नाचे अभ्यासक प्रदीप पुरंदरे. यावेळी व्यासपीठावर ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. जय सामंत, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)

महापुराचा सर्वंकष अभ्यास व्हावा
प्रदीप पुरंदरे ः धरणातील पाणीसाठ्याचे ‘पूर आरक्षण’ आवश्यक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः जागतिक तापमान वाढीमुळे पावसाचे वेळापत्रक बदलत चालले आहे. त्यातुलनेत धरणातील पाण्याचे नियोजन बदललेले नाही. आता महापूर नियंत्रणासाठी धरणातील पाणीसाठ्याचे ‘पूर आरक्षण’ केले पाहिजे. धरणातील गाळ, नदी पात्रात असणारे पाणी या सगळ्याची अचूक माहिती घेऊन धरणातील पाण्याचे नियोजन असले पाहिजे. ‘रिव्हर बेसिन ऑर्गनायझेशन’ करून महापूर नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली पाहिजे. यासाठी महापुराचा सर्वांगीण अभ्यास व्हावा, असे स्‍पष्ट मत पाणीप्रश्नाचे अभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी आज येथे व्यक्त केले. सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या महापूर चर्चासत्रात ते बोलत होते. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात चर्चासत्र झाले. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. जय सामंत अध्यक्षस्थानी होते.
श्री. पुरंदरे म्हणाले, ‘‘राज्यात ७ हजार १९८ धरणे आहेत. त्यातील १.७ टक्के धरणांचे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन केले जाते. वातावरणीय बदलामुळे पावसाचे गणितही बदलत आहे. त्यानुसार आता धरणातील पाणीसाठ्याचे नियोजनही बदलले पाहिजे. धरणांचे बांधकाम ज्या काळात झाले त्या काळातील पावसाचे स्वरूप वेगळे होते. आता वेगळे आहे. त्यामुळे आता १५ ऑक्टोबरपर्यंत धरणे का भरायची? जलनियोजनासाठी आपण ‘रिव्हर बेसिन ॲप्रोच’ स्वीकारला; पण महापूर नियंत्रणासाठी आपल्याला ‘रिव्हर बेसिन ऑर्गनायझेशन’ करावी लागेल.’’
सकाळ माध्यम समूहाचे संचालक संपादक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘महापूर थांबवणे कोणाच्या हातात नसले तरी त्याची तीव्रता कमी करणे शक्य आहे. यासाठी महापुराच्या मानवनिर्मित कारणांचा शोध घेतला पाहिजे. त्यावरील उपायांची सर्वांगीण चर्चा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. महापूर म्हटले की अनेकांच्या अनेक सूचना असतात. त्यातील शास्त्रीय आणि व्यावहारिक सूचनांचा विचार केला पाहिजे. आपण अलमट्टीला खलनायक ठरवतो आणि नदी पात्रात अतिक्रमण, नाले-ओढ्यातील अतिक्रमण करतो. डेव्हलमेंट प्लॅनमधील अशा चुकीच्या गोष्टींना आपण विरोध केला पाहिजे.’’
पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड म्हणाले, ‘‘२०२१ मध्ये आलेल्या महापुरानंतर शासनाने कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. राधानगरी धरणाच्या गेटचे काम अद्याप झालेले नाही. धामणी धरणाच्या कामाला अत्ताच सुरुवात झाली. नदीला मिळणारे ९५० नाले कुठे गेले? त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. नदीमधील गाळ काढणे आवश्यक आहे.’’
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. जय सामंत म्हणाले, ‘‘महापुराचा विचार करताना नदीच्या उगमापासूनचा विचार केला पाहिजे. तेथील जैवविविधता आणि नैसर्गिक भूरूपे टिकल्यास नदीचा प्रवाह अखंडित राहील. उसाच्या शेतीमुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप झाली असून, डोंगर सपाटीकरणामुळे भूसख्‍खलनाचा धोका वाढला आहे. याबाबत आत्तापासून प्रयत्न होणे आवश्यक आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाने त्यासाठी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे.’’ यावेळी पूरग्रस्त भागातील लोकांनीही सूचना मांडल्या. ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी आभार मानले..

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65138 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top