
चिपळूण ः पालिकेच्या घंटागाडीवरील भोंगे बंद करा
घंटागाडीवरील भोंगे बंद करा, घंटा बसवा
इनायत मुकादमांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः घंटागाडीवर कर्णकर्कश आवाजात लावण्यात येणाऱ्या भोग्यांचा वापर बंद करण्याची मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केली आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, गेल्या काही वर्षापासून चिपळूण शहरातील घरोघरी गोळा होणारा कचरा घंटागाडीद्वारे उचलला जात आहे. कचरा गोळा करणाऱ्या प्रत्येक गाडीवर घंटा लावलेली असते. शहर विभागात फिरताना गाडीवरील घंटा वाजवून कचरागाडी आल्याचा संदेश दिला जात असे; मात्र मागील २ वर्षापासून कचरा गाड्यावरील घंटा काढून त्या ऐवजी भोंगे लावण्यात आले आहेत. घरोघरी कचरा गोळा करण्याकरिता रोज सकाळी ७ वा. पालिकेच्या मुख्य कार्यालयापासून शहरातील विविध प्रभागामध्ये या गाड्या फिरत असतात. या गाड्यांवरील भोग्यांचा आवाज इतका मोठ्या प्रमाणात असतो की, संपूर्ण परिसर कर्णकर्कश आवाजाने दुमदुमून जातो. त्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. सकाळच्या वेळेस घरातील वृद्ध व लहान बालके झोपेत असतात. या आवाजाने दचकून झोपेतून जागी होतात. या संदर्भात प्रशासनाला अनेकदा समक्ष भेटून भोंग्याचा वापर बंद करण्याबाबत तसेच पूर्वीप्रमाणे प्रत्येक वाहनावर घंटा बसवण्याबाबत विनंती केली आहे; मात्र प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65211 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..