साहित्य सदर- संत कवयित्री प्रेमाबाई व इतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्य सदर- संत कवयित्री प्रेमाबाई व इतर...
साहित्य सदर- संत कवयित्री प्रेमाबाई व इतर...

साहित्य सदर- संत कवयित्री प्रेमाबाई व इतर...

sakal_logo
By

swt६२७.jpg
२७११३
वृंदा कांबळी


संत कवयित्री प्रेमाबाई व इतर...

लीड
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातील एक दुर्लक्षित असलेली कवयित्री म्हणजे संत प्रेमाबाई. ही संत तुकाराम परंपरेतील बहिणाबाईंची शिष्या असे काही अभ्यासकांचे मत आहे. महिपतीबुवा ताहराबाहकरानी प्रेमाबाईंचे चरित्र अत्यंत रसाळ भाषेत वर्णन केले आहे.
- वृंदा कांबळी
------------
प्रेमाबाईचे चरित्र पाहिले तर ते करूण रसाने ओतप्रोत भरलेले आहे. तिला लहान वयातच वैधव्य आले. आपल्या दहा वर्षाच्या मुलासोबत ती राहात होती. ती सर्वांभूती परमेश्वर मानीत होती. भगवद्भक्ती करीत होती. ती याचक, भिकारी , भुकेलेले यांना दान देऊन तृप्त करीत असे. गंगा स्नान, कृष्णमूर्तीचे ध्यान व भागवत श्रवण हा तिचा नित्यनेम होता. हरीकथेत भक्तीप्रेमात ती तल्लीन होऊन जाई. लोक तिला प्रेमाबाई म्हणत. एकदा तिच्या घरी भुकेलेले साधू संत आले. त्यांच्यासाठी ती स्वयंपाक करू लागली. पण भागवताचे श्रवण आज खंडीत होणार म्हणून ती दुःखी झाली. एकीकडे भुकेलेल्याला अन्न देणे हा धर्म पाळत असताना दुसरीकडे भागवत श्रवण चुकता नये यासाठी तिने आपल्या दहा वर्षाच्या मुलाला भागवत श्रवणासाठी पाठविले. "आज भागवतात काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐक व मला येऊन सांग " असे सांगून मुलाला पाठविले. सर्वाना जेऊ घातले. वैष्णव तृप्त झाले. इतक्यात मुलगा आला. आज भागवतात काय सांगितले ते मला सांग. असे म्हणताच, मुलाने यशोदेने कृष्णाला उखळाला बांधल्याची कथा रसभरीत वर्णन केली. ती कथा ऐकता ऐकता ती इतकी तद्रूप झाली की तिचे अष्टभाव जागृत झाले. "यशोदेने श्रीकृष्णाला उखळाला बांधले तर मी जाते त्याला सोडवायला" असे म्हणून तिने तेथेच देह ठेवला.
प्रेमाबाईची तीन चार पदेच उपलब्ध आहेत. तिच्या पारंपारिक गीताना खूप लोकप्रियता मिळाली. "गडे हो कृष्ण गडी आपुला
यमुना डोही बुडाला"
गडे हो कृष्ण गडी आपुला
यमुनेचा राजा झाला
टाकुनी काळा कांबळा
कसे पितांबर कासेला
टाकी मयूर पिच्छाला
जडीत मुकूट तो ल्याला"
अशा सहज सुंदर रचना तिने केल्या.
प्रेमाबाईंची आणखी एक सुंदर व लोकप्रिय रचना आहे.
मुरली तुझी गोड कान्हा मुरली तुझी गोड.
मुरलीनादे भुलविसी
गोपी झाल्या रोड रे
कदंबाच्या झाडाखाली
पाणी वाहे भूमीवरी
कालिया मोठा अवजड भारी
मोडीसी त्याची खोड रे.
प्रेमाबाई म्हणे श्रीहरी
विनविते नानापरि
बुडाले मी संवसारी
यातुनि मजला सोड रे."
या पद्य रचनेत गोडवा आहे. गोकुळातील कृष्णलीलांचा संदर्भ देऊन मला संसारातून सोडव असे ती कृष्णाला सांगते आहे. तिची अशी ही रचना रचनेच्या दृष्टीनेही वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे लक्षात येते. प्रेमाबाईच्या जीवनाचा व तिच्या काव्यरचनेचा विचार करता तिला लहान वयातच वैधव्याचे दुःख सहावे लागले. मुलाला वाढवताना एका विधवेला सामाजिक बंधनात राहून अनेक समस्याना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे तिच्या मनात वैराग्य निर्माण झाले. ती कृष्णभक्तीत रममाण झाली. आणि कृष्णभक्तीत तल्लीन होऊन तेथेच तिने आपला देह ठेवला. तिची काव्यरचनाही कृष्णभक्तीपरच आहे. तिची काव्ये रसाळ आहेत. लयबद्धता त्यात आहे. स्त्रीसुलभ कोमल भाव त्यात प्रकट झाले आहेत.
प्रेमाबाईसारख्या एकाकी जीवन जगलेल्या स्त्रियांच्या जगण्यातील ताणे बाणे, तिचे दुःख, तिची असहायता इत्यादी भाव उत्कटतेने तिच्या काव्यातून उमटले आहेत.
इसवी सन १८०९ सालातील संतुबाई नामक कवयित्रीचा उल्लेख आढळतो. तिच्या नावावर काही अभंग असल्याचा उल्लेख मराठी वाड़्मय कोषकार नोंदवतात. महाराष्ट्र सारस्वतातही संतुबाईच्या नावाचा उल्लैख आढळतो. तिनेही रसाळ पदांची निर्मिती केली होती. संतुबाई ही कवयित्रीही निम्नस्तरीय समजल्या जाणाऱ्या वर्गातील होती. मध्ययुगीन कालखंडात वारकरी संप्रदायात अशा अनेक कवयित्री होऊन गेल्या. ज्यानी आपल्या जन्मजात प्रतिभासामर्थ्याने काव्यनिर्मिती करून मराठी साहित्याचे एक दालन समृद्ध केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65339 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top