
स्वराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी सज्ज होवूया!
२७१८६
रायगड ः येथे सोमवारी राजसदरेवरून मार्गदर्शन करताना युवराज संभाजीराजे छत्रपती. (सर्व छायाचित्रे ः दीपक सपाटे)
२७१९१
रायगड ः सोहळ्यात सहभागी झालेल्या युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्यासमवेत युवराज संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती.
स्वराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी सज्ज होऊया!
संभाजीराजे छत्रपती ः सरकारने शिवभक्तांसाठी काय केले?
सकाळ वृत्तसेवा
रायगड, ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही, असे सांगत शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे शिवभक्तांना केले. सरकारने शिवभक्तांच्या सोयी-सुविधांसाठी काय केले, असा सवाल करत शिवभक्तांची व्यवस्था होत नसेल, तर स्वराज्याचा लढा येथूनच सुरू होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. राजसदरेवर कार्यक्रम झाला. संभाजीराजे म्हणाले, ‘‘शिवाजी महाराज यांनी स्वराज्य का निर्माण केले, याचे चिंतन केले पाहिजे. देशाला पहिले स्वातंत्र्य शिवछत्रपतींनी मिळवून दिले. शिवचरित्रातून काय घ्यायचे, हे शिकायला हवे. स्वराज्य स्थापन करताना त्यांनी प्रस्थापित लोक घेतले नाहीत. निष्ठावंत व प्रामाणिक मावळ्यांना घेऊन स्वराज्याचे स्वप्न साकार केले. शिवरायांच्या विरोधात मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही होती. शिवरायांना अडविण्यासाठी बाप-लेकांत भांडणे लावण्याचा प्रयत्न त्या काळीही झाला. घरातच फूट पाडण्याचा तो प्रयत्न होता.’’
ते म्हणाले, ‘‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे यंदाचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. शाहू महाराज जसे समाज सुधारक तसे शिवभक्तही होते. त्यांनी शिवाजी महाराज व ताराराणी यांचा रथोत्सव सुरू केला. त्यांनीच शिवछत्रपतींचा जगातील पहिला पुतळा उभारला. त्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला ब्रिटनच्या युवराजाला वाकवले. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गड संवर्धनाचे काम करत असताना राष्ट्रपतींना गडावर आणण्याचे ठरवले होते. गतवर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गडावर आणले.’’
शहाजीराजे यांनी बुद्धी कौशल्याने शत्रूला चकवून शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी रान मोकळे केले. दोघांनी कधीच
स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. वाकायचं नाही, हा धडा त्यांनीच दिला. पुरंदरच्या तहात शिवराय दोन पावले मागे गेले. सन्मान राखला जात नाही, जिथे बंधने घातली जातात, तिथे थांबायचे नाही, हा त्यांचाच वारसा आहे. शिवरायांना कोणाचे मांडलिकत्व नको होते, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी कॉन्झर्व्हेटिव्ह ऑफिसर वरुण भामरे यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत म्हणाले, ‘‘शिवभक्तांवर बंधने वाढत आहेत. संभाजीराजे प्रत्येक मावळ्यांच्या हृदयात असून, शिवभक्त त्यांच्या पाठीशी आहेत.’’
राज्याचा दौरा करणार
मी राजसदरेवरून काय बोलणार, माझ्या मनात काय दडलंय, अशी माध्यमांत चर्चा होती. राजसदर देशाला दिशा दाखविण्याचे काम करते. त्यामुळे राजसदरेवरून मी राजकीय वक्तव्य करणार नाही. महाराष्ट्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात तो जखडला आहे. ते प्रश्न समजावून घेण्यासाठी राज्याचा दौरा काढून सर्वांना भेटायला येणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65357 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..