
पान एक-हत्ती समस्येवर उपाय शोधा
२७११५
मुंबई ः हत्तींचा उपद्रवप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी बैठक घेतली. त्यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत व वनविभागाचे अधिकारी.
हत्ती समस्येवर उपाय शोधा
मुख्यमंत्र्यांचे आदेश; हत्ती नुकसानभरपाईत वाढ होणार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः दोडामार्गातील वन्यहत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यांत अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. या परिसरात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीपोटी भरपाई निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले. आजरा, चंदगड, तिलारी परिसरातील हत्तींचा प्रवेश बंद करण्याबाबत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा झाली.
दोडामार्ग तालुक्यातील केर, मोर्ले, हेवाळे या व इतर गावांत गेल्या २२ वर्षांपासून असलेल्या हत्तींच्या उपद्रवाच्या गंभीर प्रश्नाबाबत मुख्यमंत्री ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच दखल घेतली होती. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांना दोडामार्ग येथे पाठविले होते. त्याअनुषंगाने आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या वर्षा बंगल्यावर सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. दोडामार्गमधील वन्यहत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यांत अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले.
आजरा, चंदगड, तिलारी या परिसरातील हत्तींचा प्रवेश बंद करण्याबाबत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा झाली. बैठकीला पर्यावरणमंत्री ठाकरे, लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार विनायक राऊत व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई, क्लेमेंट बेन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक मल्लिकार्जुन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) नागपूर, वाय. एल. पी. राव आदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65389 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..