''हयसरच पिकवंया सोना''- नाट्यनिपुण सिंधुदुर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''हयसरच पिकवंया सोना''- नाट्यनिपुण सिंधुदुर्ग
''हयसरच पिकवंया सोना''- नाट्यनिपुण सिंधुदुर्ग

''हयसरच पिकवंया सोना''- नाट्यनिपुण सिंधुदुर्ग

sakal_logo
By

swt७२३.jpg
२७४४७
श्रीनिवास नार्वेकर


''हयसरच पिकवंया सोना''

लीड
आपण सिंधुदुर्गातल्या नाट्यनिपुणतेबद्दल बोलत असताना काही नावं आपल्याला वगळताच येणार नाहीत, किंबहुना ती नावं घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण त्या नावांशिवाय सिंधुदुर्गातल्या नाट्यविषयाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. मराठी (पक्षी: प्रमाण मराठी) बोलीतल्या अनेक नाटकांना सिंधुदुर्गातल्या अनेक नाटककारांनी जन्म दिला, अनेक दिग्दर्शकांनी ती नाटकं उत्तम पध्दतीनं उभी केली, अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयानं रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं. ‘हयसरच पिकवंया सोना’ नावाचं मालवणी बोलीतलं पहिलं पूर्ण अंकी नाटक लिहीणारे शंकर शिंदे. नव्या पिढीला ही नावं, त्यांनी करुन ठेवलेलं काम कळणं गरजेचं आहे.
- श्रीनिवास नार्वेकर
-------------
सिंधुदुर्गातली बोली - मालवणी, जी तांत्रिकदृष्ट्या मूळ कुडाळी बोली म्हणून ओळखली जाते. त्या बोलीमध्ये नाटक, एकांकिका लिहीणाऱ्या नाटककारांचा, त्या बोलीतल्या नाटकांसाठी काम करणाऱ्या दिग्दर्शक, कलाकारांची आठवण येणं अपरिहार्य. केवळ जन्माने रत्नागिरीकर (राजापूर) असलेले शंकर शिंदे हे कामाने आणि नंतर आयुष्यभर मालवणमध्येच राहीले. मालवणमध्ये मेढ्यात त्यांचं वास्तव्य. ‘हयसरच पिकवंया सोना’ नावाचं मालवणी बोलीतलं पहिलं पूर्ण अंकी नाटक लिहीणारे शंकर शिंदे. नव्या पिढीला ही नावं, त्यांनी करुन ठेवलेलं काम कळणं गरजेचं आहे.
शंकर शिंदे यांनी लिहीलेल्या पहिल्या मालवणी बोलीतल्या पूर्ण तीन अंकी नाटकाला आज सुमारे ६० वर्षं होऊन गेली. सुमारे ४० हून अधिक नाटकं - तीही बव्हंशी मालवणी बोलीमध्ये लिहीणारे हे नाव आज बऱ्यापैकी विस्मृतीत गेलं आहे. एवढं विपुल नाट्यलेखन असूनही त्यापैकी किंतीतरी नाटकं रंगमंचावर आलीच नाहीत. त्यांची कितीतरी नाटकं आजही अप्रकाशित आहेत.
साल सुमारे १९६३. मालवणी बोलीतलं पहिलंवहिलं पूर्ण अंकी नाटक लिहीलं गेलं. त्यानंतरही शंकर शिंदे लिहीतच राहीले. न थकता लिहीत राहीले. त्यांच्या काही नाटकांचे प्रयोग होत राहीले. काही नाटकांचे अगदी एक दोन प्रयोग होऊन थांबले. पण त्यांनी आपलं लेखनकार्य सुरुच ठेवलं. थकायचं नाही, हा कोंकणी माणसाचा बाणा त्यांनी आपल्या लेखनात जपला.
आता इतकं प्रचंड लेखन करुनही त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या नाटकांबद्दल फारसं कोणाला का माहीती नाही किंवा कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न का केला नाही, असा प्रश्‍न पडणं साहजिक आहे. मला दोन कारणं संभवतात, एक म्हणजे जोपर्यंत बाहेरुन कोणी येऊन आपल्यातल्या माणसाबद्दल काही लिहीत-सांगत नाही, तोपर्यंत आपण त्या माणसाची फारशी दखल घेत नाही आणि दुसरं, जे अधिक योग्य असू शकतं, ते हे की, शंकर शिंदे एकूणच फार अलिप्तपणे जगत राहीले. लेखनाच्या अनुषंगाने बाहेरच्या जगाशी त्यांनी फारसा कोणाशी कधी संपर्क ठेवला नाही. पण खरं तर अशी अनेक माणसं असतात, जी स्वत:च्या विश्‍वात जगत असतात. समाज म्हणून आपली जबाबदारी असते, त्यांचं काम महत्वाचं असेल, तर ते पुढे आणण्याची.
सुमारे ३० नाटकं, पाच एकांकिका, कथा-कवितांचं लेखन शिंदेंनी केलं. म्हटलं तर त्यांना शाळेत असल्यापासूनच लेखनाची आवड निर्माण झाली होती. या वयात आपल्या लेखनाला, आपण जे काही काम करतो, त्याला प्रोत्साहन देणारं कोणीतरी हवं असतं, ते योग्य वेळी मिळालं, तर कदाचित आपल्याला आयुष्याची एक दिशाही मिळून जाते. शंकर शिंदेंच्याही बाबतीत तसं झालं. त्यांच्या ओळकर नावाच्या शिक्षकांनी त्यांच्या लेखनगुणांचं कौतुक केलं आणि तिथून त्यांच्या लेखनप्रवासाला अधिक बहर आला. मग शाळेच्या हस्तलिखितांपासून सुरु झालेला हा प्रवास शिंदेंच्या एकूण आयुष्यात कायम राहीला.
''संशय पिशाच्च'' नावाच्या स्वतः लिहीलेल्या नाटकांत त्यांनी स्वत:च भूमिका केली होती. कन्याशाळेतील मुलींसाठी म्हणून पुरुषपात्रविरहित एकांकिका त्यांनी लिहीली. दिलेले दान, राजाराणी, पहिली प्रीत, सासयेच्या जीवार जावय सुबेदार, आस असे ही मातृत्वाची यासारखी त्यांची नाटकं चांगल्यापैकी गाजली. त्यांचे प्रयोग सिंधुदुर्गाव्यतिरिक्त मुंबईमध्येही झाले. नभोनाट्याच्या मागणीवरुन त्या प्रकारातलं लेखनही शिंदेंनी केलं. आपल्या नाटकांमधून त्यांनी प्रामुख्याने सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत कौटुंबिक, आदर्श विचारपध्दती मांडण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. त्या प्रयत्नांना चांगले यशही आले.
ज्या नाटकाच्या नावानं या लेखाचं शीर्षक आहे, ‘हयसरच पिकवंया सोना’ हे शंकर शिंदे यांचं चांगल्यापैकी गाजलेलं नाटक. पण त्याही पलिकडे या नाटकाला पहिलं पूर्ण तीन अंकी नाटक म्हणून वेगळा इतिहास आहे. या नाटकामध्येही त्यांनी सामाजिक भान जपत निसर्गाच्या अडचणींवर मात करुन आपल्या कोंकणच्या मातीतच समर्थपणे मेहनत करुन सोनं पिकवण्याचा प्रयत्न करु या, असा संदेश त्यांनी दिला.
काळाच्या पडद्याआड गेलेली सिंधुदुर्गातली अशी अनेक नावं आहेत, ज्यांनी सिंधुदुर्गातल्या नाट्यसृष्टीला हलती आणि जागती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या कलाकारांची बूज आपणच राखायला हवी, आपल्या मातीतलं हे सोनं आपणच जपायला हवं, असं मला नेहमीच वाटंत आलेलं आहे. आपल्याला हे जमेल?

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65599 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top