
सावंतवाडीत घराच्या पडवीला आग
27793
सावंतवाडी ः घरानजीकच्या पडवीला लागलेली आग.
27794
सावंतवाडी ः धुराचे लोट बाजारपेठेतूनही दिसत होते. (छायाचित्र ः रोहन गावडे)
सावंतवाडीत घराच्या पडवीला आग
चितारआळीतील प्रकार; इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून अडीच लाखांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः येथील चितारआळी परिसरात घरानजीकच्या पडवीला न्हाणीघरातील आगीची ठिणगी उडून आग लागली. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. यात पडवीत ठेवलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून मुन्ना मुद्राळे यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. अखेर नागरिकांनी अग्निशामकाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. त्यानंतर दुपारी झालेल्या जोरदार पावसाने आग पूर्णतः विझली.
श्री. मुद्राळे यांचे येथील चितारआळी परिसरात घर आहे. घराशेजारीच असलेल्या पडवीत पाणी तापविण्यासाठी असलेल्या न्हाणीतील आगीची ठिणगी उडून आग लागली. या वेळी शेजाऱ्यांसह घरातील व्यक्तींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. यात संपूर्ण पडवी जळून खाक झाली. यात श्री. मुद्राळे यांच्या १० ते १२ जुने टीव्ही संच, सुमारे १ लाख रुपयाच्या विद्युत रोषणाईच्या माळा, स्पीकर, पडवीतील प्लास्टिकची पाण्याची टाकी, प्लस्टिकचे समान, जुने लाकूड सामान आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तसेच शेजारील काही झाडे देखील आगीने होरपळली.
दरम्यान, सकाळी चितारआळीच्या दिशेने मुख्य बाजारपेठेतून धुराचे लोट दिसू लागल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यात राष्ट्रवादी कॉ़ंग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, भाजपचे आनंद नेवगी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश भोगटे, रवी जाधव, विलास जाधव, उमेश कोरगावकर, नीलेश कुबडे, विजय मुद्राळे, दुर्गादास भांबरे, राकेश दळवी, संतोष वडगावकर, रोहित गावडे, नगरपरिषद कर्मचारी श्री. नाटेकर, दीपक म्हापसेकर, आप्पा मुधळे व इतर नागरिकांनी मदतकार्यात भाग घेतला.
--
अग्निशामक बंब नेण्यास अडथळे
नागरिकांनी अथक परिश्रमाने मिळेल तेथून पाणी घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले; मात्र आग नियंत्रणात न आल्याने अखेर पालिकेचा अग्निशामक बंब मागविण्यात आला. त्याठिकाणी बंबाची गाडी नेण्यास अडचणी आल्याने लांब पाईप जोडून अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. पडवीत लाकूड व प्लास्टिक साहित्य असल्यामुळे आग बराच काळ धुमसत होती. त्यानंतर दुपारी झालेल्या पावसाने आग आटोक्यात आली. यात श्री. मुद्राळे यांचे जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66025 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..