
पान एक-सिंधुदुर्गात दमदार पुर्वमौसमी
27884
वैभववाडी ः जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी पूर्वमोसमी पाऊस झाला. वैभववाडी तालुक्याला तर झोडपून काढले.
सिंधुदुर्गात दमदार पूर्वमोसमी
---
विजांसह झोड; खरिपासाठी शेतकऱ्यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ८ ः किनारपट्टी वगळता जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांना विजांच्या कडकडाटांसह पावसाने झोडपून काढले. मॉन्सूनचे आगमन लांबले असले, तरी आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी तीनपासून पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चारपासून वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह धुवाधार पावसाला सुरुवात झाली. वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले. करूळ आणि भुईबावडा घाट परिसरात जोर अधिक होता. सह्याद्री पट्ट्यातील सर्वच गावांमध्ये जोरदार पाऊस सुरू होता. कणकवली तालुक्यातील फोंडा, नांदगाव, तळेरे भागातही चांगला पाऊस झाला. फोंडा परिसरातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला.
कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांतील काही गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर काही भागांत हलका पाऊस झाला. सावंतवाडी तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. देवगड तालुक्यात रिमझिम होता. मालवण आणि वेंगुर्ले तालुक्यात फक्त ढगाळ वातावरण होते. पाऊस पडला नाही. अनेक शेतकऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर भाताची पेरणी केली होती. ही पेरणी वाया जाण्याची शक्यता होती; परंतु आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. किनारपट्टी वगळता जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू होईल.
नद्या प्रवाहित
वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांतील सह्याद्री रांगांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातून वाहणाऱ्या नद्या प्रवाहित झाल्या. एक-दोन दिवसांत नद्यांचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे.
चौकट
भात बियाण्यांसाठी झुंबड
जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाचे वातावरण होते. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत जिल्ह्यातील कृषी केंद्रावर भातखरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड होती.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66127 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..