दिव्यांग श्रुतीचे बारावी परीक्षेत उज्ज्वल यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग श्रुतीचे बारावी परीक्षेत उज्ज्वल यश
दिव्यांग श्रुतीचे बारावी परीक्षेत उज्ज्वल यश

दिव्यांग श्रुतीचे बारावी परीक्षेत उज्ज्वल यश

sakal_logo
By

L२७९६२

- श्रुतीचे पेढा भरवून अभिनंदन करताना रुपाली पाटील.

दिव्यांग श्रुतीचे बारावी परीक्षेत उज्ज्वल यश
वेंगुर्लेची कन्या ः खर्डेकर महाविद्यालयातून कला शाखेत पहिली
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ९ ः वेंगुर्ले शहरात राहणाऱ्या दिव्यांग श्रुती पाटील हिने आपल्या मेंदूचा पक्षाघात व अंशतः अंधत्व अशा दोन्ही प्रकारच्या दिव्यांगत्वावर मात करत येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयातून कला शाखेतून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तिने कला शाखेतून ४२२ गुण (७०.३३) गुण मिळविले. श्रुतीच्या जिद्दीचे आणि तिची आई रुपाली पाटील यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रुतीची आई साहस प्रतिष्ठानच्या संचालिका रुपाली पाटील व बाबा खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक दीपक पाटील यांनी श्रुतीवर लहानपणापासून घेतलेले परिश्रम व श्रुतीची जिद्द यामुळे हे यश शक्य झाले आहे. श्रुतीला शिकविणे आव्हानात्मक होते. तिचे दिव्यांगत्व पदोपदी अडचणीचे बनले; मात्र, आईवडिलांनी धीर न सोडता यावरील उपायास महत्त्व दिले. नियमित अभ्यासक्रमात अभ्यास करणे शक्य नसल्याने तिच्यासाठी मोठ्या टाईपच्या अक्षरांची पुस्तके छापून घेतली. पहिलीसाठी तिला प्रवेश नाकारला होता; पण रुपाली डगमगल्या नाहीत. स्वतः वर्गात बसून श्रुतीचा अभ्यास करून घेतला. यामुळे तिला अभ्यासाची गोडी लागली, ती बारावीपर्यंत कायम आहे. आज श्रुतीने दिव्यांगत्वावर मात करत हे उज्ज्वल यश संपादन केले आहे.
ऐन परीक्षेदिवशीच श्रुतीची लेखनिक आजारी पडली. यामुळे पाटील दाम्पत्य काळजीत पडले. दुसरी लेखनिक शोधून आणून तिला स्पेलिंगचे धडे रुपाली यांनी दिले. या सर्व प्रयत्नांचे, परिश्रमांचे अखेर चीज झाले. श्रुती महाविद्यालयात कला शाखेत पहिली आली. तिचे हे यश सर्वांसाठी आदर्शवत आहे. व्यंग मुले जन्मल्यानंतर पालक मनातून ढासळतात; पण पाटील दाम्पत्याने आपल्या मुलीला आत्मविश्वास दिला. कला शाखेत प्रथम येत श्रुतीने त्यांच्या या प्रयत्नांचे सार्थक केले आहे.
...............
चौकट
समाजकार्यातही अग्रेसर
रुपाली पाटील स्वतःच्या मुलीसाठीच न झटता ''साहस प्रतिष्ठान''च्या माध्यमातून राज्यातील दिव्यांगांसाठी झटत आहेत. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. पती दीपक यांचीही त्यांना खंबीर साथ आहे. यावेळी ''सकाळ''शी बोलताना त्या म्हणाल्या, "श्रुतीला पहिलीमध्ये प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे तिला घरी शिकवले. मी स्वतः वर्गात जाऊन बसत होते. आता ती स्वतः अभ्यास करून यश मिळवित आहे. या यशाने डोळ्यात आंनदाश्रू आले; पण खूप कौतुकही वाटतेय."
..............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66283 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top