
बांदा-संकेश्वर मार्ग जाणार कोठून?
सावंतवाडी - बांदा ते संकेश्वर या राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या दोन टप्प्याच्या कामाला येत्या पंधरा दिवसांत सुरुवात होणार आहे. त्याबाबतची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे; मात्र या दोन टप्प्यात आजरा फाट्यापर्यंत म्हणजेच कोल्हापूर आणि कर्नाटकच्या हद्दीतीलच काम होणार आहे.
आंबोलीपासून बांद्यापर्यंतचा प्रोजेक्ट रिपोर्टबाबत अद्यापही काहीच हालचाल नसल्याने हा रस्ता नेमका सावंतवाडीतून जाणार की बावळाट मार्गे, याबाबतची साशंकता कायम आहे. याला राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर उपविभाग २ च्या उपअभियंता पी. जी. बारटक्के यांनीही दुजोरा दिला.
बांदा-संकेश्वर या राष्ट्रीय महामार्गाबाबत २०१७ पासून हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रत्यक्षात हा मार्ग सावंतवाडीतून जाणार की बावळाट मार्गे बांद्याला जोडणार, यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही.
महामार्ग विभागाकडून माजी आमदार शिवराम दळवी यांना खुलासा वजा पत्र पाठवून हा मार्ग सावंतवाडीतूनच जाणार असल्याचे स्पष्ट केले होते; मात्र त्यानंतर आतापर्यंत या महामार्गाच्या संबंधित तिसऱ्या टप्प्याच्या प्रोजेक्ट रिपोर्टबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. एकूणच यासंदर्भात बारटक्के यांना विचारले असता त्या म्हणाल्या, "केंद्राने २०१७ ला मंजुरी दिलेल्या संकेश्वर ते बांदा या राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या दोन टप्प्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. हे काम संकेश्वरपासून आजरा फाट्यापर्यंत होणार आहे. हा रस्ता दुपदरीकरण आणि सिमेंट काँक्रिटचा असल्याने काम एकदा सुरू झाले की ते थांबणार नाही.
येत्या पंधरा दिवसांत या कामाची वर्कऑर्डर निघणार असून, पावसाळ्यातही काम सुरू राहणार आहे. मुळात यासाठी आवश्यक असलेली जागा संबंधित विभागाच्या ताब्यात असल्याने भूसंपादनाचा प्रश्न निर्माण झालेला नाही. ज्या ठिकाणी वळण आहे, ते मोडण्यासाठी काही जागेचे भूसंपादन होणार आहे. हा भाग केवळ दहा टक्के असल्याने त्याला मोठी आडकाठी येणार नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षांत आचरा फाट्यापर्यंत रस्ता पूर्णत्वास आणण्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाचा प्रयत्न राहणार आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "आजरा फाट्यापासून बांद्यापर्यंत अद्यापपर्यंत कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यात आलेला नाही. शासनाकडून त्यासंदर्भात आम्हाला मंजुरीही मिळालेली नाही. सद्यस्थितीत सुरू असलेले सर्वेक्षण आजऱ्यापासून संकेश्वर या दोन टप्प्यांच्या कामाचे आहे. येणाऱ्या वर्षाच्या आराखड्यामध्ये देवसू-दाणोलीपासून आजरा फाट्यापर्यंत प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार आहोत. त्याला मंजुरी मिळताच पुढे आंबोली घाटात वनविभागाच्या आवश्यक असलेल्या परवानगीबाबत संबंधितांशी पत्रव्यवहार करणार आहोत."
महामार्ग विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी एखाद्या प्रकल्पाचे गॅजेट होते, त्यात नंतर कोणताच बदल होत नाही. त्यामुळे बांदा-संकेश्वर हा मार्ग सावंतवाडीतून जाणार असला तरी त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तितकाच महत्त्वाचा आहे. गतवर्षीपासून महामार्ग विभाग हा रिपोर्ट बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे; मात्र त्याला शासनाकडून हिरवा कंदील मिळणे गरजेचे आहे. हे काम का अडकले, हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. एकदा प्रोजेक्ट तयार झाला की हा मार्ग सावंतवाडीतून कसा जाणार, यावर ठाम सांगता येऊ शकते. सध्यातरी या महामार्गाचे काम आचरा फाटा इथपर्यंत ६१ किलोमीटरचे होणार असून, त्याचे जोरदार सर्वेक्षणही सुरू झाले आहे.
सावंतवाडीतील रिंगरोडचा प्रश्न
बांदा-संकेश्वर मार्ग सावंतवाडीतून जाण्यासाठी येथील राजकीय पुढारी प्रयत्नशील आहेत; मात्र त्यांचा तो प्रयत्न शहराच्या बाहेरून गेलेल्या रिंगरोडच्या आधारावर आहे. रिंगरोडचा मुद्दाही सद्यस्थितीत वादात असल्याने रिंगरोडचा मार्ग सुखद होत नाही, तोपर्यत बांदा-संकेश्वर मार्ग सावंतवाडीतून जाण्याबाबत हालचाली होणे शक्य नाही.
सुरुवातीला वेंगुर्ले ते बेळगाव आणि रेडी ते संकेश्वर अशा दोन मार्गाचे सर्वेक्षण होऊन त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट झाला होता; परंतु या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गचा नंबर पडला नव्हता. आताच्या बांदा-सावंतवाडी-देवसू-आंबोली पुढे संकेश्वर या मार्गाला नंबर पडला तरी त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार नाही. हा मार्ग सावंतवाडी शहरातून न्यायचा की प्रस्तावित रिंगरोडकडून, यावर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यत तिसऱ्या टप्प्याच्या कामासंदर्भात काहीच बोलता येणार नाही.
- पी. जी. बारटक्के, उपअभियंता, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग, उपविभाग २.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66304 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..