
रत्नागिरी ः मांडवी गटार गेले 1 कोटी 40 लाखावर
-rat9p31.jpg-
२८०६२
रत्नागिरी : मांडवीतील गटाराचे काम अर्धवट सोडल्याने नागरिक अनेक समस्यांनी हैराण झाले आहेत.
मांडवीत गटाराची वाहणार उलटी गंगा
कोटीच्या कोटी उड्डाणे; अर्धवट कामाने नागरिक हैराण
पॉईंटर
* सांडपाण्याचा प्रश्न सोडवताना दमछाक
* २० लाखांत होणारे गटार १ कोटी ४० लाखांवर
* ८० फुटीचे सर्व सांडपाणी मांडवीच्या गटारामध्ये
* तक्रारीकडे दुर्लक्ष, फक्त भाजपने उठवला आवाज
रत्नागिरी, ता ९ ः शहरातील ८० फुटी हायवेला असलेल्या काही अपार्टमेंटच्या सांडपाण्याचा प्रश्न सोडवताना पालिकेची आणि स्थानिक लोकप्रतिनिधीची दमछाक झाली. येथील गटार अवघ्या पंधरा ते वीस लाखांत होणार होते. गटाराचे पाणी थेट समुद्राला मिळणार होते. मात्र, हे गटार करण्यास विरोध झाला. परंतु, या विरोधामुळे मांडवीत गटाराची उलटी गंगा वाहणार आहे. ८० फुटीचे सर्व सांडपाणी मांडवीच्या गटारामध्ये सोडण्यासाठी भुतेनाका येथे रस्ता खोदून ठेवला आहे. आता हे काम १ कोटी ४० लाखांवर गेले आहे. हा सर्व प्रशासकीय आणि राजकीय घाट कोणासाठी, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. गटाराचे हे काम अर्धवट असल्याने स्थानिक नागरिक हैराण आहेत. भाजपने याविषयी आवाज उठवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या गटाराच्या उलट्या प्रवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. वास्तविक, समुद्राच्या दिशेने शहराला नैसर्गिक उतार लाभला आहे. त्यामुळे पावसात पाणी भरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परंतु, गटारे स्वच्छ नसल्याने अनेक वर्षांपासून शहरात पाणी भरण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता पावसाळ्याच्या तोंडावर अचानक ८० फुटी हायवेचे आणि मांडवी गटाराचे काम पालिका प्रशासनाने काढले आहे. हायवेला आता ७ मजली टॉवरचे कामसुद्धा सुरू झाले आहे. त्यामुळे त्याच्या सांडपाण्याचा प्रश्नदेखील आहे. महादेव अपार्टमेंट समोरून जाणाऱ्या गटाराला विरोध झाल्यामुळे तेथून सर्व पाणी उलट वळवून भुतेनाका येथे रस्ता फोडून ते मांडवीतून जाणाऱ्या गटाराला जोडले जाणार आहे. त्यासाठी मांडवी गटारही खोदून अर्धवट ठेवले आहे. गटारावरील स्लॅब गटारातच पडल्याने गटार तुंबून दुर्गंधी पसरली आहे. प्रचंड डासांचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. याबाबत स्थानिकांनी अनेक तक्रारी केल्या. बुधवारी (ता. ८) भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे; मात्र ठेकेदार काही हललेला नाही.
एवढ्या मोठ्या गटाराचे कामदेखील राजकीय नेत्याच्या जवळच्या लोकांनाच दिले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अनेकवेळा सांगूनसुद्धा ठेकेदाराने काम सुरू केलेले नाही. आता पावसाळा कधीही सुरू होईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुंबलेल्या गटारातून पाणी पुढे कसे जाणार असा यक्षप्रश्न नागरिकांपुढे आहे.
----------------------------
चौकट
साचून राहिलेले पाणी पाईपांपर्यंत
अनेक अपार्टमेंटच्या सांडपाण्याचे पाईप या गटारामध्ये सोडले आहेत. गटार तुंबल्याने साचून राहिलेले पाणी या पाईपांपर्यंत आले आहे. मोठा पाऊस झाला तर गटारातील हे पाणी या पाईपलाईनधून परत अपार्टमेंटमध्ये घुसण्याची भीती आहे. तसे झाल्यास तेथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने मेहेरबान ठेकेदाराला हलवावे, अशी मागणी होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66374 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..