तिवरे धरण फुटीप्रकरणी ठेकेदार, अधिकारी दोषी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiware-Dam
तिवरे धरण फुटीप्रकरणी ठेकेदार,अधिकारी दोषी

तिवरे धरण फुटीप्रकरणी ठेकेदार, अधिकारी दोषी

चिपळूण - तीन वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलेल्या तिवरे धरण फुटीस ठेकेदारासह अधिकारी कारणीभूत आहेत. त्यांच्यावर दोषारोप दाखल करून त्यांची विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात यावी, अशी सूचना राज्य सरकारने पुणे येथील अप्पर आयुक्त मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र यांना दिल्या आहेत. पुनर्विलोकन समितीच्या एका अहवालाद्वारे या सूचना केल्या आहेत. यामुळे धरणफुटीबाबत झालेल्या आरोपांना पुष्टीच मिळाली आहे.

तिवरे येथील धरणफुटीची भीषण दुर्घटना २ जुलै २०१९ ला घडली होती. त्यात २३ जणांचा नाहक बळी गेला होता. जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यानी पाठपुरावा केल्यानंतर जलसंधारण प्रधान सचिवांकडे हा अहवाल मिळाला, असे सांगून अहवालातील माहिती साळुंखे यांनी पत्रकारांना दिली. सरकारने याबाबत मौन पाळले आहे. सुरवातीला या दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती नेमली होती. त्यात काही आक्षेप नोंदवले गेल्याने पुनर्विलोकन समिती गठित केली होती. या समितीने नुकताच अहवाल सादर केला असून त्यामध्ये महत्वपूर्ण बाबींचा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे.

पुनर्विलोकन समितीच्या सुचनेनुसार, संबंधित ठेकेदारावर स्वीकृत निविदेच्या अटी-शर्तीनुसार कारवाई करण्यात यावी, धरणांच्या संकल्पनाची प्रचलित पद्धती व प्रत्यक्ष संकल्पन तपासून दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी, सिंचन विमोचकाचे प्रत्यक्ष काम सुरू असताना गुणनियंत्रण संबंधित शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांची प्रचलित शासन निर्देश, निविदा शर्तीच्या अनुषंगाने विभागीय चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी, असे नमूद केले आहे.

धरणाची गळती निदर्शनास आल्यापासून...
प्रथम धरणाची गळती निदर्शनास आल्यापासून धरणफुटीची घटना घडेपर्यंत, देखभाल व दुरुस्ती, वरिष्ठ स्तरावर उपाययोजनांबाबत अवगत न करणे, धरणाच्या खालील बाजूस असणारी लोकवस्ती न हटवणे, त्रुटीपूर्ण पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतरची तपासणी करण्यासाठी जबाबदार शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, संबंधित कार्यकारी अभियंता यांची तसेच महसूल विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, असेही या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे.

पाणी पातळीचा विचार करावा
तिवरे धरणात २ जुलै २०१९ ला सकाळी ९ वा. पाण्याची पातळी १३२ मीटर इतकी होती. सायंकाळ. ५ वा. धरण भरले असता, पाणीपातळी १३९ मीटर इतकी होती. त्यानंतरही पाणलोट क्षेत्रात पाऊस चालूच होता. दोषींवर कारवाई करताना या बाबींचा विचार करावा, असेही समितीने सूचित केले आहे.

पुनर्विलोकन समितीचा अहवाल मिळवण्यासाठी प्रथम जिल्हाधिकारी रत्नागिरी, त्यानंतर जलसंधारण रत्नागिरी, पुढे ठाणे येथील जलसंधारण कार्यालय व तेथून पुण्यातील मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक कार्यालय गाठले. या सर्वांकडे अहवाल मिळाला नाही. अप्पर आयुक्त कार्यालयाने जलसंधारण प्रधान सचिवांकडे जाण्याचा सल्ला दिला आणि तेथे समितीचा अहवाल माहिती अधिकारात उपलब्ध झाला. या प्रकरणात कारवाईबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ होताना दिसत आहे.
- विद्याधर साळुंखे, माहिती अधिकार कार्यकर्ते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66392 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top