अधिक पावसाच्या काळात परशुराम घाट बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parshuram Ghat
रत्नागिरी-अधिक पाऊसाच्या काळात परशुराम घाट बंद

रत्नागिरी : अधिक पाऊसाच्या काळात परशुराम घाट बंद

रत्नागिरी - अधिक पावसाचा अंदाज वर्तविला गेला तर परशुराम घाटात वाहतूक तात्पुरती बंद ठेवली जाणार आहे. पूर्ण पावसाळयात येथे दोन जेसीबी, सहा टिप्पर सज्ज असतील. दोन पथके देखील बारा-बारा तास लक्ष ठेवतील. घाटाचे काम नव्याने झालेले आहे. त्यामुळे पावसात माती रस्त्यावर येण्याची शक्यता गृहीत धरुन वेळीच रस्ता साफ करुन वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता ही व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि कंत्राटदार यांनी केली आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हातळण्यात आपण कुठेही कमी पडणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत दूरदृश्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आदी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲड. परब म्हणाले, गेल्या वर्षातील आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता यावर्षीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते असे गृहित धरुनच संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात आपली यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही याची प्रत्येकांनी खबरदारी घ्या. आपत्कालीन परिस्थितीत तेथील जनतेला तत्काळ मदत मिळण्याच्यादृष्टीने यंत्रणा तयार ठेवा. दामिनी सारख्या ॲपचा येथील जनतेकडून जास्तीत जास्त वापर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा.

दरड प्रवण क्षेत्रातील प्रत्येक गावात प्राथमिक अंदाजासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थिती हातळण्यासाठी पोलिस यंत्रणाही सक्षमपणे तयार आहे. सामाजिक संस्थांनाही आपत्कालीन परिस्थिती संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी सांगितले. यावर्षी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर ती सक्षमपणे हाताळू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिला.

दरड प्रवण गावांवर जास्त लक्ष ठेवा. दरड कोसळणे टाळण्यासाठी सरंक्षक भिंत सारखी उपाययोजना करा. शास्त्री नदीवरील पूल जुना असून नवीन पुलाच्या एका बाजूचा ॲप्रोच रस्ता झाला आहे. दुसऱ्या बाजूचा ॲप्रोच रस्ता तत्काळ तयार करून तो पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुरू करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66413 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top