रत्नागिरी ः प्लास्टिक बंदीची अपरिहार्यता...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः प्लास्टिक बंदीची अपरिहार्यता...!
रत्नागिरी ः प्लास्टिक बंदीची अपरिहार्यता...!

रत्नागिरी ः प्लास्टिक बंदीची अपरिहार्यता...!

sakal_logo
By

प्लास्टिक बंदीची अपरिहार्यता...!
२०११ सालच्या आकडेवारीनुसार, जगभरात एका मिनिटाला १० लाख प्लास्टिकच्या कॅरिबॅगचा वापर होत होता. पाण्याच्या आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्यांचे आकडे जोडल्यावर त्याचे गांभीर्य जाणवेल. सध्याचा आकडा काय असणार, याची कल्पनादेखील करवत नाही.आपण पर्यावरणासाठी किमान एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकचा वापर बंद करायला पाहिजे. यामुळे अर्धी समस्या मार्गी लागणार आहे. घरातही प्लास्टिकच्या वस्तू वापरणार नाही असे आपण ठरवले तर पारंपरिक व्यावसायिकांना व्यवसाय वाढवता येणार आहे. १ जुलैपासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी येत आहे. ही वेळ का आली याची नोंद येथे घेतली आहे.
- प्रशांत दैठणकर,जिल्हा माहिती कार्यालय,रत्नागिरी
--------------------------------------
प्लास्टिक हा शब्द पिलायबल अँड इझिली शेप्ड् अर्थात लवचिक आणि आकार देण्यास सोपा पदार्थ होय. भारतात १९५७ ला प्लास्टिकने प्रवेश केला. भारतात १९८० सालापर्यंत दुधासाठी काचेच्या बाटल्या आणि इतर पदार्थांसाठी स्टीलचे डबे, भाजीपालासाठी कापडी पिशव्या यांचा वापर होत होता; प्लास्टिक स्वस्त असल्याने मागणी वाढली. येथून प्रदुषणालाही सुरवात झाली. पूर्वी माती किंवा काचेचा वापर होत होता. माती पूर्णपणे मातीत सामावली जाते, विरघळते. काचेपासून पुन्हा काच बनवता येते. काच जमिनीवर अथवा पाण्यावर पडून राहिली तरीपर्यावरणास धोका नाही. प्लास्टिक हे कार्बन संयुगातून बनते आणि त्याचे विघटन होत नाही. मातीत वा पाण्यात प्लास्टिक पडून राहिले तर हळूहळू रासायनिक प्रक्रिया होऊन त्यातील रासायनिक घटक प्रथम जमिनीत व नंतर भूजलापर्यंत जातात. यात भूजलाचे प्रदूषण तर होतेच कालांतराने जमिनीची सुपिकतादेखील नष्ट होते.
१९६५ ला स्विडीश कंपनी सेलोप्लास्टमधील एक अभियंता स्टेन गुस्ताफ थुलीन याने प्लास्टिक वापरून पिशवी तयार केली. १९७९ ला अमेरिकन प्लास्टिक कंपन्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी एकाचवेळी (सिंगल युज) वापरायच्या प्लास्टिक बॅगचे मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग सुरू केले. अमेरिकेत १९८२ ला मोठी सुपर मार्केट असणाऱ्या सेफ वे आणि क्रोगर या दोन्ही कंपन्यांनी सर्व बाबीत प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर सुरू केला. अमेरिकेत ८० टक्के जागा प्लास्टिक बॅगांनी घेतली. सर्वच देशांनी याचा वापर वाढवत नेला. बाटलीबंद स्वरूपात पाणी उपलब्ध झाल्यानंतर याची गती झपाट्याने वाढली. भाजीपाला विक्रेतेदेखील स्वस्तातील कॅरिबॅग वापरायला लागले. प्लास्टिक कॅरिबॅग आणि पाण्याच्या बाटल्या यांचे ढीग जागोजागी दिसायला लागले. प्लास्टिकमध्ये अन्न टाकल्याने ते अन्न खाताना प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याचे प्रकार सुरू झाले. कॅरिबॅग आणि पाण्याच्या बाटल्यांमुळे नाल्या, नद्यांमध्ये तसेच तलावांमध्ये पाणी तुंबण्यापासून अशुद्ध होण्यापर्यंत प्रकार घडायला लागले. धोक्याची घंटा सर्वप्रथम आपला शेजारी देश असलेल्या बांग्लादेशाने वाजवली. नद्यांना आलेला पूर आणि प्लास्टिक कचरा साठल्याने पाण्याच्या निचऱ्याअभावी मोठे संकट कोसळल्यानंतर २००२ ला प्लास्टिक बंदीची जगात सर्वप्रथम घोषणा केली.
पाण्याच्या बाटल्या आणि कॅरिबॅग मोठ्या प्रमाणावर समुद्रात टाकल्यामुळे समुद्रात अनेक ठिकाणी प्लास्टिकचे मैलोनमैल पसरलेले साठे निर्माण झाले आहेत.या प्लास्टिकमुळे सूर्यप्रकाश पाण्यापर्यंत पोहोचत नसल्याने समुद्री जीवसाखळी बाधित झाली आहे. याचे समुद्री जीवनावर गंभीर परिणाम दिसून आले. माणसाने कचरा म्हणून टाकलेले हे प्लास्टिक आता पाण्याच्या स्त्रोतातून अतिसूक्ष्म कणांच्या रूपात मानवी शरीरात दाखल झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. ''प्लास्टिक नकोच'', अशी भूमिका नाही. बंदी आणावी लागली, याचा अर्थ आपल्याला आपल्या चुकांची जाणीवच नाही, असा होतो.

चौकट
आपण कोठे आहोत.
* प्रतिवर्षी देशभरात ३.५ दशलक्ष टन प्लास्टिक कचरा बनतो
* गेल्या पाच वर्षात यात दुप्पट वाढ झाली आहे.
* यापैकी ४३ टक्केचा पॅकिंगसाठी वापर, ते सिंगल यूज प्लास्टिक
* प्लास्टिक कचऱ्यापैकी २ ते २.३५ दशलक्ष टनांचेच रिसायकलिंग

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66529 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top