
पान एक-प्रतिक्षा संपली; मान्सुनची सलामी
28319 किंवा 28318
सावंतवाडी ः तालुक्यात शुक्रवारी मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली.
मॉन्सूनची दमदार सलामी
वेंगुर्ले तालुक्यातून प्रवेश; सरीवर सरी
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १० ः गेल्या काही दिवसांपासून असलेली मॉन्सूनची प्रतीक्षा आज अखेर संपली असून जिल्ह्यात दमदार आगमन झाले. वेंगुर्ले तालुक्यातून प्रवेश केलेल्या मॉन्सूनने दिवसभरात जिल्ह्याचा बहुतांशी भाग व्यापला आहे. जिल्ह्यात सरीवर सरी कोसळत असून मॉन्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
केरळमध्ये तीन दिवस अगोदरच दाखल झालेला मॉन्सून राज्यात देखील वेळेआधी दाखल होईल, अशी अपेक्षा होती; परंतु त्यानंतर मॉन्सूनचा प्रवास मंदावला होता. गेले काही दिवस गोव्याच्या उबंरठ्यावरच मॉन्सून अडखळला. दरम्यान, कालपासून (ता. ९) पुन्हा एकदा मॉन्सून वाटचालीस अनुकूल वातावरण तयार झाले. मॉन्सूनने काल दिवसभरात गोव्याचा संपूर्ण भाग व्यापत आज सिंधुदुर्गात दमदार प्रवेश केला. वेंगुर्ले तालुक्यातून मॉन्सूनने जिल्ह्यात प्रवेश करीत दुपारपर्यत जिल्ह्याचा बहुतांशी भाग व्यापला. मॉन्सूनने दमदार सलामी दिली. जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या लखलखाटांसह पाऊस झाला. सायंकाळी उशिरापर्यत पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. या पावसामुळे वातावरण देखील बदलून गेले आहे.
दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, कणकवली, कुडाळ, वैभववाडी तालुक्यांमध्ये जोरदार सरी कोसळल्या. दोडामार्ग तालुक्यातील काही भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. याशिवाय अन्य काही ठिकाणी निचरा न झाल्यामुळे पाणी साचल्याचे चित्र होते. देवगड, मालवणमध्ये देखील दुपारनंतर सरी कोसळल्या. सायंकाळी सातनंतर पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले. काही भागात मात्र रिपरिप सुरू होती. नदीनाल्यांमध्ये देखील पाणी साचू लागले आहे.
मॉन्सूनच्या आगमनामुळे प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना देखील आता वेग येणार आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात ११ ते १५ जून या कालावधीत जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
खरिपाला प्रारंभ
जिल्ह्याच्या बहुतांशी भागात आज मॉन्सून बरसल्यामुळे उद्यापासून (ता. ११) खरीप हंगामाला प्रारंभ होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी पाच ते सहा दिवस उशिराने पेरण्यांना सुरूवात होणार आहे.
मॉन्सूनने संपूर्ण गोवा शुक्रवारी व्यापून तळकोकणात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे प्रवेशव्दार असलेल्या वेंगुर्लेमधून मॉन्सूनने संपूर्ण जिल्हा मॉन्सूनने व्यापला आहे. दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्राच्या आणखी भागात मॉन्सून दाखल होईल. सिंधुदुर्गात पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
- डॉ. यशवंत मुठाळ, ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66704 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..