
पारपोलीच्या आरक्षणाबाबत प्रांताधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
पारपोलीच्या आरक्षणाबाबत
प्रांताधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
सावंतवाडी ः लवकरच होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत पारपोलीचे सरपंचपद सलग पाचव्यांदा महिला वर्गासाठी, तर ग्रामपंचायतीच्या सातपैकी पाच जागाही महिला वर्गासाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे या एकतर्फी आरक्षणाबाबत गावातील पुरुष वर्गामध्ये नाराजी असून, निवडणूक प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक शशिकांत परब आणि संभाजी सावंत यांनी केली आहे. तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना तसे निवेदनही दिले. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात परब यांनी म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये सर्वांना संधी मिळण्यासाठी आरक्षण ठेवले जाते; मात्र पारपोलीचे सरपंचपद सलग पंचवीस वर्षे महिला वर्गासाठी राखीव ठेवल्याने सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या पुरुष वर्गाची यावर्षीही संधी हुकली आहे. त्यात यावर्षी ग्रामपंचायतीच्या सातपैकी पाच जागाही महिला वर्गासाठी राखीव ठेवून पुरुष वर्गावर पुन्हा अन्याय केला आहे. सरपंच आणि पाठोपाठच्या सदस्य या एकतर्फी आरक्षणाबाबत पारपोलीवासीयांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे निवडणूक प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
-------
वजराट-होडावडा रस्त्याची चाळण
वेंगुर्ले ः बांधकाम खात्याअंतर्गत असलेल्या वजराट-होडावडा या सात किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. दोन दिवसांत खड्डे न बुजविल्यास रस्त्यावरील खड्यांमध्ये वृक्षारोपण करू, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी यांनी दिला आहे. याबाबत ज्या ठेकेदारास खड्डे मक्ता मिळाला, तो ठेकेदार समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे अनेकदा लक्ष वेधले आहे. येत्या पावसाळी हंगामापूर्वी खड्डे बुजविण्याचे काम झाले नाही, तर त्या रस्त्यावर अपघात होऊ शकतात. शाळा, कॉलेज आणि इतर कामाच्या निमित्ताने संबंधित रस्त्यावरून वाहतूक करताना मोठी कसरत होणार आहे. अशा वेळी काही अघटित घडल्यास संबंधित बांधकाम खाते आणि ठेकेदारांना जबाबदार धरू. शिवाय खड्यांमध्ये वृक्षारोपण करू.
------------
कणकवलीत पथदीपांचे लोकार्पण
कणकवली ः नवीन कुर्ली पुनर्वसन वसाहतीत विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. पैकी स्ट्रीटलाईट बसविणे कामाचा प्रारंभ बुधवारी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांच्या हस्ते झाला. पाटबंधारे विभागाचे गणेश आपकरे, ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष सूरज तावडे, खजिनदार रवींद्र नवाळे, हरेश पाटील, नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दळवी, कृष्णा परब, अमित दळवी, बाळकृष्ण चव्हाण, शिवराम पोवार, रमेश पाटील, अनंत दळवी, एकनाथ चव्हाण, वसंत कदम, शिवाजी चव्हाण, शांताराम साळसकर, अरुण पोवार, गणेश दळवी, विजय परब, दत्ताराम साळसकर, चंद्रकांत मर्गज आदी उपस्थित होते. मंडळाने २६ जानेवारी २०२१ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग दहा दिवस प्रलंबित मागण्यांसंदर्भात उपोषण केले होते. प्रकल्पग्रस्त, जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या बैठकीत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले होते. त्यानंतर मंडळाने मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करून नवीन कुर्ली पुनर्वसन वसाहतीत विविध विकासकामे मंजूर करून घेतली होती.
------------
वेंगुर्लेत उद्या शेतकऱ्यांची बैठक
वेंगुर्ले ः आंबा, काजू शास्त्रज्ञ विचार मंच वेंगुर्लेची बैठक सोमवारी (ता. १३) सकाळी अकराला फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेच्या सभागृहात आयोजित केली आहे. या बैठकीस आंबा, काजूच्या विविध समस्या, त्यावरील उपाययोजना यावर वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आंबा कर्ज, विमा, रत्नसिंधू योजना यावर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी फळसंशोधन केंद्राला मिळालेल्या सन्मानाबद्दल प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या बैठकीस विचार मंचच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी केले आहे.
-----------
तळवडेसाठी ४७ लाखाचा निधी
सावंतवाडी ः तळवडे बाजारपेठ या ठिकाणी तळवडे-नेमळे रस्त्यावर पाणी साचून ग्रामस्थांची मोठी अडचण होत होती. तळवडे बाजारपेठेत गटार दुरुस्ती आणि रस्ता दुरुस्तीसाठी ४७ लाखांचा निधी आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला. अर्थमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, आमदार केसरकरांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर झाल्यामुळे तळवडे गावातून समाधान व्यक्त होत आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून तळवडे-नेमळे रस्ता नूतनीकरणाचे काम मंजूर झाले. अनेक वर्षे बाजारपेठेत पाणी साचत असल्याने व्यापारी वर्गाची अडचण होत होती. बाजारपेठेमधील गटाराचे काम लवकरच केले जाणार असल्याची माहिती शिवसेना शाखाप्रमुख अनिल जाधव यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66808 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..