
पैज जिंकली पण...
KOP22L28501
जळगाव ः आमदार गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक अरविंद देशमुख यांना पैजेचा एक लाख रुपयांचा धनादेश देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल पाटील.
महाजनांचे पी.ए.
जिंकले लाखाची पैज
---
राष्ट्रवादी कार्यकर्त्याने दिला धनादेश; पण..
कैलास शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुकीवर जळगावात आमदार गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक अरविंद देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल पाटील यांच्यात एक लाख रुपयांची पैज लागली होती. भारतीय जनता पक्षाचे धनंजय महाडिक विजयी झाले आणि पैज हरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने एक लाखाचा धनादेश भाजप कार्यकर्त्याला आज दुपारी त्यांच्या कार्यालयात दिला; पण त्यांनी तो स्वीकार न करताच त्यांना परत केला आणि केवळ एक रुपया घेतला.
राज्यसभा निवडणुकीत भाजप नेते व आमदार गिरीश महाजन यांच्यावर तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने दिली होती. त्यानुसार ते कामालाही लागले होते. या वेळी त्यांनी भाजपचे तिसरे उमेदवार निवडून येईलच, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्याच बळावर जळगाव येथील आमदार महाजन यांचे स्वीय सहायक देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मोबाईलवर पैजेचे आवाहन केले होते. श्री. महाडिक निवडून येतील, अशी आपणास खात्री आहे. याबाबत आपण एक लाख रुपयांची पैज लावण्यास तयार आहोत. त्यांचे पैजेचे आव्हान प्रसिद्ध होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पाटील यांनी आव्हान स्वीकारले आणि महाविकास आघाडीचे संजय पवार विजयी होतील, असे सांगितले.
आज पहाटेच्या दरम्यान निवडणुकीचा निकाल लागला. महाविकास आघाडीचे संजय पवार पराभूत झाले आणि भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. देशमुख यांनी पैज जिंकली. दिलेल्या शब्दानुसार पाटील यांनी दुपारी एकला एक लाख रुपयांचा धनादेश आमदार गिरीश महाजन यांच्या कार्यालयात देशमुख यांना देण्यास आणला, मात्र देशमुख यांनी हा धनादेश न स्वीकारता त्यांना तो परत केला व पैजेचा केवळ एक रुपया घेतला. याबाबत देशमुख म्हणाले, की प्रश्न पैशांचा नव्हता, मात्र आमचे नेते गिरीश महाजन यांच्यावर आपला विश्वास होता. आणि तो खरा ठरला आहे; तर राहुल पाटील म्हणाले, की आपण भाजपचे अभिनंदन करीत आहोत. पैजेचा एक लाख रुपयांचा धनादेश दिला; परंतु देशमुख यांनी मोठ्या मनाने तो स्वीकारला नाही.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66967 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..