
गुहागर ः वाळूच्या कणांवरून सापडला चोर
28521ः संग्रहीत
...
वाळूच्या कणांवरून चोरट्याचा माग,
पाठलाग करत पकडला १० मिनिटांत!
शृंगारतळीतील नाट्य; गुहागर पोलिसांचे झाले कौतुक
गुहागर, ता. ११ ः फ्लॅटमध्ये सापडलेल्या वाळूच्या कणांवरून अवघ्या १० मिनिटांत पोलिस चोरापर्यंत पोचले. सुरवातीला आरोपी गुन्हा कबूल करत नव्हता; मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यावर या चोराने लपवलेला मालही पोलिसांच्या ताब्यात दिल्या. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे नाट्य शुक्रवारी (ता. १०) शृंगारतळीत घडले.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी रोशन मोहल्ला येथील स्टारसिटी बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर कुलसुंबी मुनाफ शिरगावकर (वय ४०) यांचे कुटुंब राहते. या बिल्डिंगमध्ये गेले तीन-चार दिवस बशीर समसुद्दीन गोटे (मूळ गाव वाघिवरे तांबेवाडी, ता. चिपळूण) हा आपल्या नातेवाइकांकडे राहण्यासाठी आला होता. त्याला शृंगारतळीमध्ये काम मिळाले होते. शुक्रवारी (ता. १०) कुलसुंबी शिरगावकर घरात एकट्या असल्याचे लक्षात आल्यावर बशीरने त्यांच्या सदनिकेत शिरून कुलसुंबी यांची पर्स चोरली. आपल्या घरात कोणीतरी येऊन गेल्याची चाहूल कुलसुंबी यांना लागली; परंतु त्यांना कोणीच दिसले नाही. घरातील कोणती वस्तू चोरीला गेली का, असा संशय येऊन त्यांनी घराची पाहणी केली. त्या वेळी आपली पर्स जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने कुलसुंबी यांनी घडला प्रकार पोलिसांना सांगितला. शृंगारतळीत कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहिते, पोलिस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ, प्रितेश रहाटे यांनी कुलसुंबी यांच्या घरी जाऊन पाहणी केली.
...
चौकट
पायावरील वाळूशी या कणांचे साम्य..
दरम्यान, पोलिसांनी स्टारसिटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची माहिती घेतली. त्या वेळी काही दिवसांपूर्वीच इमारतीमध्ये राहण्यास आलेल्या बशीर गोटेबद्दल त्यांना संशय आला. बशीरला बोलावून त्यांची चौकशी केली; मात्र बशीरने चोरीचे कृत्य केल्याचे नाकारले. म्हणून बशीरला घेऊन पोलिस पुन्हा कुलसुंबी यांच्या घरी गेले आणि सदनिकेत पर्स ठेवलेल्या ठिकाणापर्यंत पडलेले वाळूचे कण आणि पायांचे ठसे दाखवले. त्याच्या पायावरील वाळूशी या कणांचे साम्य असल्याचे दाखवून दिले. तरीही बशीर चोरी केल्याचे नाकारत होता. मग मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवला. अखेर बशीरने चोरलेली पर्स त्यातील १ हजार रुपयांसह पोलिसांच्या ताब्यात दिली. या घटनेचा गुन्हा गुहागर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.
--------
चौकट
सराईत चोरटा
दरम्यान, पोलिस चौकशीत बशीर गोटे हा सराईत चोर असून चिपळूण पोलिस ठाण्यात त्याच्यावर २००६ आणि २०१७ मध्ये दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. कुलसुंबी यांनी पोलिसांना चोरीची माहिती दिल्यानंतर अवघ्या १० मिनिटात पोलिसांनी चोर पकडला. याबद्दल गुहागर पोलिसांचे कौतुक होत आहे.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66975 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..