
रत्नागिरी-तिवरे धरण फुटीकरणी सरकारकडून अभय
L28800ः तिवरे धरण दुर्घटनेवेळचे संग्रहीत छायाचित्र.
..
तिवरे धरण फुटीप्रकरणी दोषींना अभय
नीलेश राणे यांचा राज्य सरकारवर निशाणा; गुन्हे दाखल झाले नाहीत तर न्यायालयात जाऊ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः तिवरे धरण दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या तत्कालीन ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात यावी, अशा सूचना एसआयटीने दिल्या आहेत. मात्र, सरकारकडून अभय दिले जात आहे. या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला आहे.
तिवरे येथील धरण फुटीची भीषण दुर्घटना २ जुलै २०१९ रोजी घडली होती. या घटनेत २३ जणांचा बळी गेला होता. या धरणाच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नदेखील खितपत आहे. सुरवातीला या दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती नेमली होती. चौकशी अहवाल समोर येत नव्हता. त्यामुळे दोषींवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात होता. नीलेश राणे यांनी धरणफुटी प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा इशारा त्यावेळी दिला होता.
या प्रकरणावर ट्विट करत नीलेश राणे म्हणाले, तिवरे धारण फुटीच्या घटनेला तीन वर्षे होत आली. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी दोन वेळा विशेष चौकशी समिती नेमली होती. त्यात काही आक्षेप नोंदवले गेल्याने पुनर्विलोकन समिती गठित केली होती. ती नेमकं काय करत होती, हे त्यांनाच माहिती. जलसंधारण विभागाने सांगितलं आहे की, पुनर्विलोकन समितीच्या सूचनेनुसार संबंधित तत्कालीन ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी, असे नमूद केले आहे.
....
चौकट
अधिकाऱ्यांना कसलीही नोटीस नाही..
नीलेश राणे पुढे म्हणाले, या प्रकरणी डिसेंबर २०२१ मध्ये आरटीआय टाकल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. हे आदेश होऊन आता सात महिने झाले आहेत. मात्र, सरकार कारवाई करत नाही. या धरणाच्या ठेकेदाराला अद्याप काळ्या यादीत टाकलेले नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांना कसलीही नोटीस दिलेली नाही. त्यामुळे सरकारकडून या लोकांना अभय देण्याचं काम सुरू आहे. हे आम्ही चालू देणार नाही. सगळ्या दोषींवर कारवाई होऊन शिक्षा झालीच पाहिजे. त्यांच्यावर फौजदारी प्रक्रिया झालीच पाहिजे, अशी आमची मागणी राहील.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67280 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..