
टुडे पान एक-127 शाळा दुरुस्त होणार
१२७ शाळा दुरुस्त होणार
निधी उपलब्ध ः पावणे दोन वर्षानी दुसरा हप्ता
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या १२७ शाळांच्या शाळा दुरुस्ती निधी अभावी रखडल्या होत्या. शासनाने तब्बल पावणेदोन वर्षांनी दुसऱ्या हप्त्याचा निधी उपलब्ध करून दिल्याने या शाळांचा दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील मोठ्या दुरुस्त्या आवश्यक असलेल्या १२९ शाळांना दुरुस्तीसाठी २०२०-२१ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. यातील दोन शाळांची दुरुस्ती अन्य योजनेतून झाल्याने त्या रद्द केल्या होत्या. उर्वरित १२७ शाळांच्या दुरुस्तीला मान्यता देण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला होता. त्यामुळे निधी अभावी दुरुस्त न होवू शकलेल्या शाळांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश झाला होता. यासाठी एकूण ४ कोटी २३ लाख ६७ हजार ५०० रुपये एवढा निधी मंजूर होता. यातील दोन कोटी ६५ लाख २० हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला होता. तो निधी ऑक्टोबर २०२० मध्ये वितरीत केला होता. त्या निधीतून शाळा दुरुस्तीची कामे सुरू झाली. बहुतांश दुरुस्तीचे काम पूर्ण झाले होते. मात्र, त्यानंतर शासनाकडून निधी प्राप्तच झाला नव्हता. त्यामुळे ठेकेदार अडचणीत आले होते. प्राथमिक शिक्षण विभागाकडून वारंवार यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता; परंतु निधी प्राप्त होत नव्हता. अखेर शासनाने नुकताच उर्वरित निधी प्राप्त करून दिला आहे. एक कोटी ५८ लाख ४७ हजार ५०० रुपये एवढा निधी प्राप्त करून दिला आहे. यामुळे रखडलेली दुरुस्ती पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
------------
चौकट
एवढा निधी वितरीत
१२७ शाळा दुरुस्ती मंजूर होती. पहिल्या हप्त्यात दोन कोटी ६५ लाख २० हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला होता. यातील पाच लाख रुपयांच्या वरील दुरुस्ती असलेल्या शाळांना ५० टक्के निधी वितरीत करण्यात आला होता. तर पाच लाखाच्या खालील दुरुस्ती असलेल्या शाळांना ७५ टक्के निधी देण्यात आला होता. दुरुस्तीच्या एकूण मूल्यांकनाच्या आधारे ही रक्कम देण्यात आली होती.
-------------
चौकट
पाच टक्के शिल्लक ठेवणार
याबाबत समग्र शिक्षा अभियानाच्या सहाय्यक उपक्रम अधिकारी स्मिता नलावडे यांना विचारले असता, ''शिल्लक एक कोटी ५८ लाख ४७ हजार ५०० रुपये एवढा निधी दुसऱ्या हप्त्यात प्राप्त झाला आहे. या प्राप्त निधीतून ज्यांची ५० टक्के रक्कम शिल्लक आहे त्यांना ४५ टक्के निधी देणार आहे. तर २५ टक्के शिल्लक निधीतील २० टक्के निधी देण्यात येणार आहे. शाळा दुरुस्तीचे १०० टक्के काम पूर्ण झाल्यावर उर्वरित पाच टक्के निधी वितरीत करण्यात येणार'' असल्याचे सांगितले.
--------------
कोट
दुसरा हप्ता थकल्याने शाळा व्यवस्थापन समिती व ठेकेदारांकडून झालेल्या कामांच्या पैशांची मागणी करण्यात येत होती; मात्र, शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याने बिले करता येत नव्हती. दुसरा हप्ता थकला तरी शाळा दुरुस्तीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. त्यामुळे आता निधी प्राप्त झाल्याने ही कामे तत्काळ पूर्ण होतील.
- महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67378 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..