संत कवयित्री मुक्ताई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत कवयित्री मुक्ताई
संत कवयित्री मुक्ताई

संत कवयित्री मुक्ताई

sakal_logo
By

swt१३३.jpg

सौ. वृंदा कांबळी


संत कवयित्री मुक्ताई

लीड
बहिण भावाचे प्रेम म्हटले की ज्ञानेश्वर मुक्ताईची बहीण भावाची जोडी समोर येते. संत मुक्ताई हिचे आयुष्य अवघे अठरा एकोणीस वर्षाचेच लाभले; पण इतक्या लहान वयात तिने मिळवलेले ज्ञान मोठमोठ्या योगी पुरूषानाही अचंबित करणारे होते. म्हणून चौदाशे वर्षे वयाच्या योगी चांगदेवानी तिला आपला गुरू मानले. मराठी वारकरी संप्रदायातील ही आद्य कवयित्री मानावी लागेल. सर्व संत मंडळीत ती वयाने सर्वात लहान असली तरी तिचा आध्यात्मिक अधिकार व तिचे ज्ञान खूप मोठे होते.
- सौ. वृंदा कांबळी
-----------
मुक्ताईच्या नावावर पन्नासच अभंगांची नोंद आहे. मुक्ताईचे अभंग विविध विषयावर आहेत. नामपर, संतमहात्म्यपर, उपदेशपर, पंढरी महात्म्यपर, कूटात्म, चांगदेव मुक्ताई संवादपर असे तिचे अभंग आहेत.
मुंगी उडाली आकाशी,
तिने गिळीले सूर्यासी
थोर नवलाव जाला,
वांझे पुत्र प्रसवला.
विंचू पाताळाशी जाय,
शेष माथावंदी पाय
माशी व्याली घार झाली
देखोनि मुक्ताई हासली.
हे मुक्ताईचे प्रसिद्ध कूट आहे. मुंगी म्हणजे एक सामान्य जीव. एक सामान्य स्त्री चिमुरडी मुक्ताई तिने विश्वात्मकतेला कवेत घेतले. मुंगी आकाशात उडते. सूर्याला गिळंकृत करते. माशीच्या पोटी घार जन्म घेते या सर्व कल्पना अघटीतच आहेत. त्याकडे पाहून मुक्ताई तटस्थपणे हसते. लौकीक जीवन जगत असतानाही त्यापासून तटस्थ होत गेलेली मुक्ताई विश्वातील विसंगतीतील समतोल मूळ रचनेत न्याहाळू पाहाते.
मुक्ताईचे ताटीचे अभंग प्रसिद्धच आहेत. एका चिमुरडीने ताटीच्या अमंगातून सांगितलेले तत्त्वज्ञान तिची आध्यात्मिक उंची दाखवून देते. जीवनाची वैय्यर्थता, इश्वराचे कर्तृत्व, अशक्याचे शक्यतेत होणारे रूपांतर या संदर्मात तिला जीवनाचे आकलन झालेले आहे, असे डॉ. उषा देशमुख म्हणतात.
"योगी पावन मनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असे आर्ततेने म्हणणारी मुक्ताई कणखर आहे. ती विश्वातील चमत्कारानी अतिशय कडवटपणे हसतेय. तिच्या हसण्यातून तिच्या भावंडांवरील अन्यायाची टोकदार बोच व आई-वडिलांना झालेल्या शिक्षेची ओली जखम आहे. तिच्या मनातील विकल वेदना त्यातून प्रकटते. अकालीच प्रौढ बनलेले ते एक स्त्री मन आहे. ताटीचे अभंग हे एका उत्कट भावनेने भरलेले आहेत. "योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा " येथून प्रारंभ होतो.
संत ज्ञानदेवांचे दुःख हे सामान्य माणसिचे क्षुद्र दुःख नव्हते. ती एक व्यापक वैश्विक वेदना होती. ज्ञानदेवांचे मन व्यथित झाले आहे ते मान अपमानाच्या वैयक्तिक नव्हे तर समष्टीरूप जाणिवेने. त्यांचे सांत्वन करण्यासाठी तेवढ्याच उंचीची गरज होती. संत ज्ञानेश्वरांच्या मानसिक व्यथेला समजून घेऊन त्याहीपेक्षा जास्त उंचीवर जाऊन त्यांचे सांत्वन करते. त्यांच्या जीवित कार्याचे स्मरण करून देते. समाज आणि संत यांच्यातील नात्याची उत्तमरितीने तिने उकल केली आहे.
"विश्वे रागे झाले वन्ही,
संती सुखे व्हावे पाणी.
संत तेचि जाण जगी,
दया क्षमा ज्यांचे अंगी.
जीभ दातानी चाविली,
कोणे बत्तीशी तोडिली?
तुम्ही तरून विश्व तारा
ताटी उघडा हो ज्ञानेश्वरा"
संतांची व्याख्या ती मार्मिकपणे करते. संत आणि समाज यांच्यातील समन्वयाचा फार मोठा सिद्धान्त ती सांगते. बालसुलभ निरागसता आणि प्रौढत्वातील विचार गांभीर्य यांचे अपूर्व संमिश्रण तिच्या मनात झालेले दिसते. सामान्य प्रापंचिक सुखदुःखाविषयी तटस्थ असणारे जनकल्याणाची आस्था बाळगणारे कमालीचे प्रगल्भ असे वंदनीय व्यक्तिमत्व आहे. परमार्थ हाच मुक्ताईचा प्रपंच.
मुक्ताईने विविध विषयांवर आणि विविध प्रकारची रचना केली. तिच्या ओव्यांमधून मूलभूत स्त्री जाणिवेचा अविष्कार दिसतो. सामान्यांच्या आकलनापलिकडचे विषय ती गीतातून पकडण्याचा प्रयत्न करते. एकूणच मराठी वाड़्मयात मुक्ताईचे काव्य लक्षणीय ठरते. इसवी सन १२९७ मध्ये तापी नदीवरील माणगाव येथे ती विद्युतरूपात अंतर्धान पावली असे म्हणतात. लौकीक दृष्टीने वीज कोसळून सद्गतीला गेली. मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे तिची समाधी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67382 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top