मेनसाठी तीन बातम्या समोरासमोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेनसाठी तीन बातम्या समोरासमोर
मेनसाठी तीन बातम्या समोरासमोर

मेनसाठी तीन बातम्या समोरासमोर

sakal_logo
By

28972
कन्हैया पारकर


राणेंच्या हस्ते उद्यानाच्या
लोकार्पणाला विरोधच

पारकर ः खून खटल्‍यातील होते आरोपी

कणकवली, ता. १३ : कणकवली शहरातील श्रीधर नाईक उद्यानाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याहस्ते कोणत्‍याही परिस्थितीत होऊ नये. राणे हे श्रीधर नाईक यांच्या खून खटल्‍यातील आरोपी होते. ते या खटल्‍यातून निर्दोष सुटले आहेत; मात्र त्‍यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले तर ते राजकीय दहशतवादाला खतपाणी घातल्‍यासारखे होईल, अशी टीका शिवसेनेचे नगरसेवक कन्हैया पारकर यांनी आज केली.
येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पारकर बोलत होते. ते म्‍हणाले, ‘‘उद्यानाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात राजकारण येऊ नये याला आम्‍हीही सहमत आहोत; पण कणकवलीतील श्रीधर नाईक खुनाच्या जखमा अजूनही ताज्‍या आहेत. खून खटल्‍यात राणे हे आरोपी होते. ज्‍या आरोपींना या खटल्‍यात शिक्षा झाली आणि नंतर ते मुक्‍त झाले, ते आरोपी आता राणेंकडे कामाला आहेत. त्‍यामुळे उद्यानाचे भूमिपूजन राणे यांच्या हस्ते करणे ही बाब योग्‍य नाही. एक वेळ राणे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहिले तरी चालतील; पण त्‍यांच्या हस्ते उद्‌घाटन होऊ नये.’’
पारकर म्‍हणाले, ‘‘श्रीधर नाईक यांचा खून २२ जूनला झाला होता. त्‍याच दिवसाच्या औचित्‍यावर उद्यानाचे उद्‌घाटन होत आहे हा चांगला योग आहे. या दिवशी उद्यानाचे उद्‌घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर श्रीधर नाईक यांच्या पत्‍नी क्षमा नाईक यांच्या हस्ते व्हायला हवे. खरं तर २२ जून हा दहशतवादी दिवस जाहीर व्हायला हवा, अशी मागणी भाजपचे तत्‍कालीन जिल्‍हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनीही केली होती. त्‍यामुळे २२ जूनला राणेंच्या हस्ते उद्यानाचे उद्‌घाटन ही बाब मान्य नाही.’’
---------------
राणेंसोबत काँग्रेसमध्ये जाण्याची घोडचूक
राणेंनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्‍यानंतर आम्‍हीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खरं तर ही मोठी घोडचूक होती. राणेंसोबत गेल्‍याचा मोठा राजकीय फटका बसला. चूक लक्षात आल्‍यानंतर राणेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि ज्‍या दिवशी राणे भाजपमध्ये आले, त्‍याच दिवशी आम्‍ही भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केल्‍याचे पारकर म्‍हणाले.
------------------------
28973
शिशिर परुळेकर

राणेंकडून लाल दिवा
का घेतला? ः परुळेकर

वळचणीला बसलेल्‍या पारकरांच्या उलट्या बोंबा

कणकवली, ता. १३ : राणे काँग्रेसमध्ये असताना लाल दिव्याच्या लालसेपोटी पारकर बंधू काँग्रेसमध्ये आले. राणेंकडे भीक मागून त्‍यांनी महामंडळावरही वर्णी लावून घेतली. तीन वर्षे राणेंसोबत राहून सत्तेचा उपभोग घेतला. त्‍यावेळी पारकर बंधूंना राणेंचा दहशतवाद का दिसला नाही, अशी टीका भाजपचे नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी आज केली. राणेंच्या वळचणीला बसलेले पारकर आता उलट्या बोंबा का मारत आहेत असेही ते म्‍हणाले.
परुळेकर म्‍हणाले, ‘‘केवळ राजकीय लाभ मिळविण्यासाठी पारकर बंधूंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्‍यावेळी सर्व कणकवलीकरांचा विश्‍वासघात केला होता. या घटनेबाबत मनाची नाही; पण जनाची तरी लाज बाळगून कन्हैया पारकर यांनी श्रीधर नाईक उद्यानाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहू नये. त्‍यांनी थोडी तरी नैतिकता बाळगणे गरजेचे आहे.’’ ते म्‍हणाले, ‘‘कणकवलीचा विकास करताना कोणताही श्रेयवाद करत नाही. त्‍यामुळे २२ जूनला होणाऱ्या श्रीधर नाईक उद्‌यान लोकार्पण कार्यक्रमाचे आमंत्रण पालकमंत्र्याना दिले. एवढेच नव्हे तर त्‍यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये उद्यानाचे उद्‌घाटन होणार आहे. महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्‍या या उद्यानाच्या नूतनीकरणासाठी ७५ लाखांचा निधी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पाठपुरावा करून आणला होता. आता श्रीधर नाईक यांच्या स्मृतीदिनी या उद्यानाचे लोकार्पण होणार आहे. ही आम्‍ही श्रीधर नाईक यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. दरम्‍यान, श्रीधर नाईक उद्यानाचे नूतनीकरण करण्यापूर्वी शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक सुशांत नाईक यांच्याशीही चर्चा केली आहे.’’
----------
चौकट
‘अधीश’च्या पायऱ्या का झिजवल्‍या?
पारकर हे नेहमीच दहशतवादाच्या नावे ओरड मारून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्‍न करत आहेत. त्‍यांना राणेंचा दहशतवाद टोचत होता, तर त्‍यांनी महामंडळावर वर्णी लावण्यासाठी मुंबईतील राणेंच्या अधीश बंगल्‍याच्या पायऱ्या का झिजवल्‍या? एकवेळ आमदार वैभव नाईक नैतिकतेबाबत बोलू शकतात; पण सत्तेच्या लाभासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या पारकरांना नैतिकता ही बाब शोभत नाही, असे परुळेकर म्‍हणाले.
-----------

श्रीधर नाईक उद्यानाचे
बुधवारी लोकार्पण

समीर नलावडे : पालकमंत्र्यांची उपस्थिती

कणकवली, ता. १३ : शहरातील गडनदीलगत असलेल्‍या श्रीधर नाईक उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. २२ ला सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असल्‍याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
नलावडे म्‍हणाले, ‘‘महामार्ग चौपदरीकरणात शहरातील श्रीधर नाईक उद्यानाचा काही भाग बाधित झाला होता. त्‍यांनतर उर्वरीत क्षेत्रात नव्याने उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. या उद्यान सुशोभिकरणासाठी शासनाकडे आम्‍ही ७५ लाख रूपयांच्या निधीची मागणी केली होती. तसा ठरावही नगरपंचायतीच्या माध्यमातून पाठवला होता. या निधीला शासनाने मंजूरी दिली. त्‍यानंतर गेल्‍या तीन महिन्यात या उद्यानाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. उद्यानाचे उद्‌घाटन करण्याकरिता आम्‍ही सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आमंत्रण दिले आहे. यात पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले आहे. त्‍यांच्या उपस्थितीत २२ ला या उद्यानाचे लोकार्पण होईल.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67595 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top