
सिंधुदुर्गात अभिनव कार्यशाळा घेणार
L२९०९२
ओळ - बांदा ः येथे सिने कलावंत अनिल गवस व वैष्णवी कल्याणकर यांच्यासोबत नीलेश मोरजकर, प्रशांत गवस, जे. डी. पाटील व अन्य.
सिंधुदुर्गात अभिनव कार्यशाळा घेणार
गवस, कल्याणकर ः बांद्यात ''कलाकार आपल्या भेटीला'' उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः कोकणात गुणवत्ता ठासून भरलेली आहे; मात्र योग्य व्यासपीठ मिळत नसल्याने कलाकार मागे पडतात. झगमगत्या दुनियेत मोठी स्पर्धा असल्याने यात टिकून राहण्यासाठी नैसर्गिक अभिनयाबरोबरच वक्तृत्व शैली, संभाषण कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. यासाठी कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवोदित कलाकारांसाठी अभिनय कार्यशाळा घेण्याचा मानस असल्याचे मत ज्येष्ठ सिने अभिनेते अनिल गवस व ''देवमाणूस'' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांनी व्यक्त केले.येथील श्री बांदेश्वर सेवा सुविधा केंद्राच्या वतीने ''कलाकार आपल्या भेटीला'' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी गवस व कल्याणकर यांनी उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधला. केंद्र संचालक पत्रकार नीलेश मोरजकर, प्रशांत गवस, समीर परब यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
श्री. गवस म्हणाले, "अभिनय क्षेत्र हे आभासी आहे. नाटक सादर करताना नेहमीच अभिनयाचा कस लागतो. प्रेक्षकांसमोर कलाकाराला नेहमीच दक्ष राहावे लागते. सर्वसमावेशक भूमिका करतो, तोच खरा कलावंत आहे. त्यामुळे एकाच भूमिकेत न अडकता कलाकाराने नावीन्यपूर्व व आव्हानात्मक भूमिका साकारणे गरजेचे आहे. कलाकार हा देखील माणूस असल्याने तो २४ तास मनोरंजन करू शकत नाही. त्यामुळे कलाकाराने या आभासी जगात न जगता सर्वसामान्यांमध्ये मिसळून समाजाच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. कारण प्रेक्षक कलाकाराचे नेहमीच अनुकरण करत असतो. नवोदित कलाकारांना या क्षेत्रात खुप संधी आहे; मात्र यासाठी वाहिन्यांची व मराठी मालिकांची संख्या वाढणे गरजेचे आहे. सिनेसृष्टीत नाव कमवायचे असेल किंवा यशस्वी व्हायचे असेल, तर कलाकारने आपल्या भूमिकेच्या प्रेमात कधीच राहू नये." ''देवमाणूस-२'' मालिकेत ''सोनू''ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली येथील युवा अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिने प्रेक्षकांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. सुरुवातीला वेबसीरिजच्या माध्यमातून सामाज माध्यमावर सक्रिय असलेली वैष्णवीची ''देवमाणूस-२'' ही छोट्या पडद्यावरील पहिलीच मालिका आहे. या मालिकेतील भूमिकेने ती रातोरात स्टार झाली. वैष्णवी म्हणाली, "मराठी चित्रपटसृष्टी अनुभवासाठी खुप चांगली आहे. येथे शिकण्यासारखे बरेच काही आहे. प्रामाणिकपणे आपल्या मेहनत घेतल्यास निश्चितच यश आहे. घरात अभिनयाचा वारसा नसतानाही मी आपली आवडत जोपासली आहे. कोकणातील कलाकारांची मानसिकता वेगळी असल्याने येथील कलाकार या क्षेत्रापासून दूर आहेत. भविष्यात नवोदित कलाकारांसाठी मार्गदर्शन किंवा सहकार्य करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू."
यावेळी बांदा केंद्रशाळेचे उपशिक्षक जे. डी. पाटील, कास प्राथमिक शाळेच्या शिक्षिका स्वाती पाटील, भूषण सावंत, अक्षय मयेकर, प्रथमेश राणे, साई कल्याणकर, नैतिक मोरजकर आदी उपस्थित होते.
................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67753 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..