
शाळा आजपासून पुन्हा गजबजणार
शाळा आजपासून पुन्हा गजबजणार
नवे शैक्षणिक वर्ष; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः नवे शैक्षणिक वर्ष १३ पासून सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळांची घंटा उद्यापासून (ता.१५) वाजत आहे. विद्यार्थी शाळेत दाखल होणार आहेत. विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी शाळास्तरावर उत्साही नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यावर्षी पहिलीमध्ये ७ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ हे १ मे रोजी संपले. २ मेपासून उन्हाळी सुटी सुरू झाली होती. तब्बल सव्वा महिन्याच्या दीर्घ सुटीनंतर शाळा पुन्हा भरत आहेत. उन्हाळी सुट्टी पडताना शाळा १३ पासून सुरू होईल, असे सांगण्यात आले होते; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शैक्षणिक वर्ष १३ पासून सुरू होईल; पण मुले १५ पासून दाखल होतील, असे जाहीर केले. या दोन दिवसांत शाळेची स्वच्छ्ता तसेच विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यासाठी वेळ दिला होता. त्यामुळे उद्यापासून प्रत्यक्ष शाळा गजबजणार आहेत. दोन दिवसांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांची स्वच्छ्ता करण्यात आली आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाबाधित शिक्षक किंवा विद्यार्थी शाळेत येवू नयेत, यासाठी नियोजन केले आहे. नव विद्यार्थ्याचे शाळेत प्रथमच आगमन होणार असल्याने त्यांना शाळेची ओढ लागावी, शाळेबद्दल त्यांच्यात आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यांना गोड खाऊ दिले जाणार आहे. यासाठी पालक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.
---------------
चौकट
साडे सात हजार मुले पहिलीत
नव्या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीमध्ये ७ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यावर्षी पहिली ते आठवीपर्यंत एकूण ६१ हजार ६१८ विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळास्तरावर प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
------------
चौकट
पुस्तके पोहोच
समग्र शिक्षा अभियानांतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या व खासगी अनुदानित अशा एकूण १६०६ शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २ लाख ९६ हजार २८३ पाठ्यपुस्तक संचाचे मोफत वितरण केल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
------------
कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती मुलगे- मुली तसेच दारिद्र्यरेषेखालील मुलगे अशा एकुण २४ हजार ५५६ विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी दोन गणवेश यासाठी ६०० रुपये याप्रमाणे एकुण १ कोटी ४७ लाख ३३ हजार ६०० रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहेत.
- महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67806 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..