300 वर्ष जुन्या वृक्षाचे संवर्धन हेच वटपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

300 वर्ष जुन्या वृक्षाचे संवर्धन हेच वटपूजन
300 वर्ष जुन्या वृक्षाचे संवर्धन हेच वटपूजन

300 वर्ष जुन्या वृक्षाचे संवर्धन हेच वटपूजन

sakal_logo
By

काही सुखद ....... लोगो


rat14p18.jpg ः
२९११२

मालघर ः ३०० वर्षांहून अधिक जुन्या वटवृक्षाचे संवर्धन केले जाणार आहे.


३०० वर्ष जुन्या वृक्षाचे संवर्धन हेच वटपूजन

मालघरमधील साठे कुटुंब; बालवयातील भावबंधही

शिरीष दामले : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : वटपौर्णिमेचे माहात्म्य सांगताना सत्यवान सावित्रीची कथा आधुनिक काळाशी सुसंगत नसल्याने आता निसर्गसंवर्धन आणि वटसंवर्धन असे कारण दिले जाते; मात्र वडाच्या फांद्या तोडून पूजा करण्यातून वडाचे संवर्धन होत नाही. थोडीशी काटछाटच होते. हे ध्यानी घेऊन वडाचे संवर्धन, वडावर कुऱ्हाड पडण्यापासून तो वाचवणे हेच आधुनिक काळातील वटपूजन आहे, हा धडा चिपळूण तालुक्यातील मालघर गावातील माजी मुख्याध्यापिका संध्या साठे-जोशी व तिच्या कुटुंबाने घालून दिला आहे.
याबाबत माहिती देताना त्यानी सांगितले की, मालघर गावातील त्यांच्या बालपणीच्या भावविश्वात स्थान असलेल्या तीनशे वर्षांहून अधिक जुन्या वडाची आज पूजा केली. त्याच्यावर एरवी कुऱ्हाड पडण्याची शक्यताही होती; पण आता त्याच्याभोवती पूजेचे वलयही तयार झाले आणि आम्ही त्याचे संवर्धनही करणार.
बालपणात हा वड मनावर कोरला गेला आहे, हे सांगताना त्या म्हणाल्या, ‘वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आई नेहमीपेक्षा जास्तच गडबडीत; तरीही खूश दिसायची. दिवसचे दिवस तिला घराचा उंबरठा ओलांडायची वेळ यायची नाही. ठेवणीतल्या साड्यांना हवा लागायची वेळ यायची नाही. त्यामुळे वटपौर्णिमा हा तासभर तरी हक्काने घराबाहेर पडता येण्याचा दिवस. देवघरातील ठेवणीतली पितळेची निरांजनं, पळी-पंचपात्री, कचोळं, नैवेद्याच्या छोट्या छोट्या वाट्या, अंगठीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या हिरव्या प्लेन बांगड्या, काळ्या मण्यांचा गळेसर, फणी-करंडा अशा वाणाच्या वस्तू, त्यातून बाहेर निघायच्या. निरांजनं, पळी-पंचपात्री चिंचेने घासून चकचकीत केली जायची. कापसाच्या सूतपुतळ्या केल्या जायच्या. तुळशीच्या सुकलेल्या काड्या आणून काडवाती तयार व्हायच्या. वस्तू जसजशा तयार होतील तसतशा त्या एका मोठ्या ताटात विराजमान व्हायच्या. ताट झाकण्याकरिता जाळीचा रुमालही पेटीबाहेर यायचा. सकाळी उठल्यावर ताजं दूध, आंबे, फणस, जांभळं, करवंद, तोरणं आदी पाच फळं आणि पंचामृत एवढीच तयारी करायची.’
बदलत्या काळात गावातल्या सुनांची नवीन पिढी घरी फांदी आणून पूजा करायला लागली. त्यातच शेकडो वर्षांची जुनी झाडे कुऱ्हाडीला बळी पडतात; मात्र असा एक वड वाचवण्याचे भाग्य आम्हाला लाभलं. त्याच्याशी वर उल्लेखलेल्याप्रणाणे आमचं भावनिक नातं. तो वड असलेली जागा घेतल्यावर दोन दिवसांपूर्वी भाऊ म्हणाला, ‘तू आतापर्यंत वटपौर्णिमेला वड पूजलेला नाहीस; पण यावर्षी आपल्या या वडाची तू पूजा कर. धाकटा भाऊ पुत्रासमान आणि मोठा भाऊ पित्यासमान असतो, असं आपली संस्कृती सांगते. त्यामुळे आधी वडाकडे जायचा रस्ता आणि पार स्वच्छ करून घेतला आणि आज वडाची साग्रसंगीत पूजा केली. झाडांना भावभावना असतातच; पण पूजा झाल्यानंतर जेव्हा मी वडाकडे पाहिलं तेव्हा शेजारच्या पिंपळासारखाच तोही मला आनंदाने सळसळतांना दिसला.’

--------------
चौकट
धाकटी भावंडं वडावर जायचो
आईसोबत आम्ही धाकटी भावंडं वडावर जायचो. इतर काकवा, गुरुजी आलेले असायचे. मग साग्रसंगीत पूजा, ती आटपली की आम्हाला पंचामृत आणि गूळ-खोबरं मिळायचं. अनेकविध वासाच्या उदबत्या, अनेक रंग-वासांची फुलं, शेजारून वाहणारी नदी आणि अनेक पक्ष्यांचा किलबिलाट... पूजेनंतर तो नेहमीचा वडही वेगळा वाटायचा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67831 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top