
टुडे पान तीन मेन-मालवणातील कचराप्रश्न सोडवा
L29255
मालवण ः येथील पालिकेत कामकाजाचा आढावा घेताना आमदार वैभव नाईक.
मालवणातील कचराप्रश्न सोडवा
वैभव नाईक ः पालिका प्रशासनास सूचना
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : शहरात रखडलेली गटार खोदाई, कचराप्रश्नी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार वैभव नाईक यांच्या समोर पालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला. गटार खोदाई करणाऱ्या ठेकेदाराला कामगार मिळत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगताच आमदार नाईक यांनी ''मी कामगार उपलब्ध करून देऊ का?'' असे सांगत कामगार उपलब्ध करणे ही काम घेतलेल्या ठेकेदाराची जबाबदारी आहे. कारणे नको, काम वेळेत पूर्ण करून घ्या. कचरा समस्याही सुटण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना आमदार नाईक पालिका प्रशासनास दिल्या.
आमदार नाईक यांनी आज पालिका कामांचा आढावा मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्याकडून घेतला. यावेळी पालिका अधिकारी यासह उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, उपशहर प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, यशवंत गावकर, संमेश परब, पंकज सादये, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, अमेय देसाई, सिद्धार्थ जाधव, नरेश हुले, प्रसाद आडवणकर, मनोज मोंडकर यासह अन्य उपस्थित होते.
पावसाळा आला तरी गटार खोदाई पूर्ण न झाल्याने तसेच ज्या ठिकाणी गटार खोदाई झाली, ते कामही योग्य न झाल्याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले की, टेंडर दोन वेळा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. आता जिल्हाबाहेरील ज्या ठेकेदार एजन्सीने टेंडर घेतले आहे, त्याला गटार खोदाईस कामगार मिळत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामगार नाहीत, हा ठेकेदाराचा प्रश्न आहे. काम वेळेत व योग्य पद्धतीने झाले पाहिजे, अशी भूमिका मांडली.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, "गतवर्षी गटार खोदाई वेळेत पूर्ण होण्यासाठी नगरसेवक यतीन खोत यांनी सहकार्य केले. कोरोना काळ असताना ठेकेदारास कामगार उपलब्ध केले; मात्र हे खोत यांचे काम नाही म्हणून नाहक चर्चा झाली. सहकार्य केले म्हणून बदनामी होणार असेल, तर कोण सहकार्य करण्यास पुढे येणार नाही, याचा विचार झाला पाहिजे. आता ठेकेदारास कामगार मिळत नाहीत, तर ते मी उपलब्ध करून देतो. पालिका प्रशासनाने लवकरात लवकर गटार खोदाई पूर्ण करून घ्यावी. तसेच कचरा समस्येतूनही शहरवासीयांची मुक्तता होण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे." शहरात वायरी गर्देरोड रस्ताकाम संबंधित ठेकेदाराने पूर्ण केले नाही. अन्य काही कामेही एका ठेकेदाराने पूर्ण केली नाहीत. याबाबत तपस्वी मयेकर, मंदार केणी यांनी तक्रार मांडली. यावर कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांची बिले पालिका प्रशासनाने मागे ठेवावीत, अशा सूचना आमदार नाईक यांनी दिल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68024 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..