
कुडाळात 15 पासून गणेशमूर्ती स्पर्धा
L29256
- कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना मनीष दळवी. सोबत श्री. काळसेकर, अनिरुद्ध देसाई, संध्या तेरसे, दादा साईल आदी. (छाया ः अजय सावंत)
कुडाळात १५ पासून गणेशमूर्ती स्पर्धा
मनीष दळवी ः १० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २०२२ साठी जिल्हास्तरीय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन १५ ते १७ जुलै या कालावधीत ओंकार डिलक्स हॉल, कुडाळ येथे केले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
आज एमआयडीसी विश्रामगृहावर श्री. दळवी यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष श्री. काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, नर्मदाआई औद्योगिक संस्थेच्या अध्यक्ष संध्या तेरसे, मार्केटिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष दादा साईल, मूर्तिकार संघाचे बापू सावंत, विलास माळगावकर, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, बंड्या सावंत, सेलेस्तिन शिरोडकर, रवी राऊळ आदी उपस्थित होते.
श्री. दळवी म्हणाले, "अनेक मूर्तिकारांनी व्यावसायिक स्वरुपात पुढे यावे. आपली कला सर्वत्र पोहोचावी, या उद्धेशाने ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेकरिता हाती घडवलेली तसेच साचामध्ये तयार केलेली मूर्ती आवश्यक आहे. तसेच प्रमाणबध्दता, सुबकता, कल्पकता, आवश्यक आहे. मूर्ती पूजनीय स्वरुपाची असावी. मूर्तीची उंची १८ ते ३६ इंच असावी. मूर्तीचे अलंकार व इतर कल्पक गोष्टी मातीच्याच असाव्यात. त्यात कृत्रिमता आणू नये." यावेळी मूर्तीचे लेखणी काम व गोमय गणेश तयार करणे याबाबतचे प्रात्यक्षिक तसेच रंग डिस्प्ले याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. मूर्तिकामाबाबत श्री. बेलवलकर, श्री. आनंद गोरे (बाल गणेश), किरण मांजरेकर (पेण येथील चित्रकार) तसेच आंगणेवाडी (ता. मालवण) येथील मूर्तिकार श्री. चव्हाण यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. चित्रकार अरुण दाभोलकर, श्री. बेलवलकर (देवरुख-रत्नागीरी) हे परीक्षक असणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय ७ हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ २,१०० रुपयांची दोन पारितोषिके, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, विशेष कौशल्यासाठी ११०० रुपयांची चार पारितोषिके, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र अशी आहेत. नावनोंदणी जिल्हा बॅंकेच्या कोणत्याही शाखेत १० जुलैपर्यंत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68025 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..